शेतकरी, शेतमाल व्यापारी ते शहरी ग्राहक-गृहिणीच्या दैनंदिन जीवन-व्यवहाराचा कल ठरविणारा आवाका असलेल्या वस्तू बाजारपेठ आणि त्यातील क्रियाकलपांचा वेध घेणारे पाक्षिक सदर.

कमोडिटी मार्केट असा एकत्रित शब्दप्रयोग गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढला आहे. विशेषत: जीवनावश्यक जिनसांच्या किमतींबाबत जेव्हा जेव्हा चर्चा होते किंवा लेख लिहिले जातात, तेव्हा याचा उल्लेख अनिवार्य आणि ठरून येत असतो. म्हणजे जिनसांच्या किमती वाढलेल्या असताना ग्राहकांना त्याचे बसत असलेले चटके असोत अथवा किमती पडलेल्या असतील आणि शेतकरीवर्गाचे होणारे नुकसान असो, दोन्ही शक्यतांमध्ये कमोडिटी मार्केटमधील घडामोडींना जबाबदार धरले जाते. एकुणात, या बाजाराचे चित्र खलनायकाप्रमाणे रंगविले जाते.

बरे या टीकेत आघाडीवर कोण असतात? तर बहुतकरून राजकीय नेते आणि कथित विश्लेषक. ज्यांचा पक्ष आणि आनुषंगिक हित आधीच ठरलेला असतो, ते जपण्यालाच त्यांच्या लेखी अधिक महत्त्व असते. अगदी यातून या बाजारावर भवितव्य अवलंबून असलेल्या लाखो गरीब ग्राहक, शेतकरी किंवा अगदी व्यापाऱ्यांचे नुकसान झाले तरी त्याबाबत ते बेफिकीर असतात.

थोडक्यात सांगायचे तर या बाजाराबद्दलची राजकीय विश्लेषकांना पुरती जाण नसते आणि त्यातील व्यवहारांबाबत तर ते अनभिज्ञच असतात. असेही म्हणता येईल की, कमोडिटी बाजार हा एक हत्ती आहे आणि तथाकथित विशेषज्ञ हे या हत्तीचे कोणी पाय, तर कोणी शेपटी तर कोणी कान एवढेच पाहून काहीही ठोकून देणारे बडबडबाज! खरे तर या विशालतम बाजारपेठेचा समग्र वेध अवघडच. कायम वाढत जाणारा, कधी न संपणारा हा विषय त्यामुळे नित्य नवीन शिकवण देत असतो. तेव्हा दररोज अब्जावधी डॉलरची उलाढाल होणारा हा बाजार काय चीज आहे, हे समजून घेणे जरुरीचे आहे. म्हणजे प्रत्येकाला त्याची व्याप्ती, त्यातील संधी आणि आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यावर या बाजाराचा थेट परिणाम लक्षात येईल.

या बाजाराबद्दलची अनभिज्ञता  नेमकी किती आहे, हे स्पष्ट करण्यासाठी काही गोष्टी सांगता येतील.

अवघ्या महाराष्ट्राचा पसंतीचा खाद्यपदार्थ म्हणजे मिसळ. पण मिसळीसाठी वापरात येणाऱ्या वाटाण्यासाठी आपण कित्येक वर्षे कॅनडावर अवलंबून आहोत, याची जाणीव किती लोकांना आहे?

वरण-भात खाणाऱ्यांना खचितच माहिती नसणार की वरणातील तूरडाळ ही म्यानमार किंवा आफ्रिकन देशांमधून मोठय़ा प्रमाणावर येते. मूग, मसूर किंवा चवळी आणि चण्याबाबतही थोडीफार अशीच परिस्थिती आहे.

म्हणजे सामान्यांचे दररोजचे अन्न हे इम्पोर्टेड अर्थात आयात होऊन ताटात येते. याचा आपण अभिमान वाटून घ्यायचा की लाज बाळगायची हा ज्याचात्याचा प्रश्न आहे.  पण यामागे व्यापार आहे आणि त्याची सूत्रे ही कमोडिटी बाजारात ठरत असल्याने त्याचे सर्वालेखी महत्त्व आहे.

कृषीमालाचे क्षणभर बाजूला ठेवून, सोन्याचा किंवा चांदीसारख्या मौल्यवान धातूंचा विचार करू. परत एकदा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक देश आहे. वार्षिक हजार टन (अधिकृत रूपात) एवढी सोन्याची मागणी या देशाची आहे. ही मागणी पूर्णत: सोने आयात करून भागविली जाते. आपले देशांतर्गत सोन्याचे उत्पादन वार्षिक दोन-तीन टनांपल्याड नाही. सोन्याव्यतिरिक्त ६०००-६५०० टन चांदी ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आयात केली जाते. तेव्हा सराफ बाजार हा देशातील एक मुख्य कमोडिटी बाजार आहे.

या बाजाराला वस्तू बाजारही म्हणता येईल. मात्र कमोडिटी मार्केट या शब्दाला एक खासच वजन आहे. तर या बाजाराबद्दल या नियत सदरात लिहिताना कृषीमालावर मुख्यत: भर असेल. हाच या बाजाराचा आत्मा आहे हेही तितकेच खरे. भारतासारख्या कृषीप्रधान देशाबाबत तर हे बऱ्याच प्रमाणात खरे आहे.

जागतिकदृष्टय़ा विचार करता, प्रत्येक देशात जे पिकते अथवा निर्माण होते त्या सर्व जिनसा या बाजाराचा हिस्सा बनल्या आहेत. याला कारणही तसेच सबळ आहे. देशाची अर्थव्यवस्था ही त्या त्या देशात निर्मित सर्व वस्तूंवरच अवलंबून असते. त्यामुळे जागतिक स्तरावर कृषीमालाबरोबरच धातू, सोने, चांदी, नैसर्गिक वायू येथपासून ते अगदी डुकराच्या मांसापर्यंत सर्व वस्तू या बाजाराचा गाभा बनल्या आहेत. तथापि सर्वत्रच कच्चे तेल (क्रूड) हे वस्तू बाजाराच्या या गाभ्यावर प्रभाव गाजवत असल्याचे दिसून येते.

भारताबद्दल बोलायचे तर आपला देश जास्त प्रकारच्या शेतमालात आघाडीचा उत्पादन घेणारा म्हणून प्रसिद्ध आहे. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येला अजून २०-२५ वर्षे तरी अन्न सुरक्षा बहाल करण्याची क्षमता असणारा देश म्हणून जगाचे आपल्याकडे लक्ष लागून राहिले आहे. या पाश्र्वभूमीवर विकसित कृषी-उत्पन्न बाजारपेठ ही आपली प्रमुख गरज आणि सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचा प्राधान्यक्रम बनला आहे. कमोडिटी बाजाराला म्हणून किती महत्त्व आहे, हे यातून अधोरेखित होते.

या बाजाराच्या व्याप्तीबद्दल आणि अर्थव्यवस्थेतील त्याच्या महत्त्वाबद्दल एवढे लिहिल्याबद्दल वाचकांमध्ये निश्चितच उत्सुकता निर्माण झाली असेल. पाक्षिक स्वरूपात चालणाऱ्या या सदरामध्ये या बाजाराचे अनेक पैलू विस्तृतपणे मांडून त्यातून एक आर्थिक साक्षरता आणि एकूण अर्थमानाच्या जाणिवा वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे. यातून काहींना या उभारत्या क्षेत्राकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळेल, अशी खात्री आहे.

(लेखक वस्तू बाजार  विश्लेषक )

श्रीकांत कुवळेकर  ksrikant10@gmail.com