प्रामुख्याने आपल्या सर्वाना बँकेतील बचत खाते व चालू खाते याविषयी माहीत असते व त्याचा उपयोगही आपण आपल्या दैनंदिन जीवनात करीत असतो. आपण हेही जाणताच की, बचत खाते हे वैयक्तिक खाते म्हणून वापरले जाते व बचत खात्याचा व्याजदर सध्या वार्षिक ४ टक्के असा आहे. चालू खाते व्यावसायिक व्यवहारासाठी वापरण्यात येते व चालू खात्यातील जमा रकमेवर व्याज मिळत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुंतवणुकीच्या दृष्टीने वरील खात्यांवर आपण थोडा प्रकाश टाकू या.

१. बचत खाते उघडताना ते एकटय़ा व्यक्तीच्या नावाने न उघडता ते संयुक्तपणे Either or survivor उघडावे, म्हणजेच ‘कोणीही एक किंवा हयात असलेली व्यक्ती’ ते खाते वापरू शकते. जसे की, अ) पती व पत्नीचे खाते किंवा ब) पत्नी व पतीचे खाते. यात गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्व असे की, कोणाही एकाचा मृत्यू झाल्यास दुसरी व्यक्ती ते खाते चालू ठेवू शकते. त्यामुळे त्या खात्याशी निगडित असलेली गुंतवणूक अबाधित राहू शकते किंवा कुठल्याही गुंतवणुकीतून काही व्याज किंवा लाभांश येणे असल्यास त्यात अडथळा येत नाही; परंतु त्यासाठी बँकेत व गुंतवणुकीच्या ठिकाणी मृत व्यक्तीचे मृत्यूचे प्रमाणपत्र सादर करणे जरुरी असते.

२. दुसरा मुद्दा असा की, काही जणांचा असा प्रश्न असतो की, त्यात जमा होणारे व्याज हे कुणासाठी मिळकत म्हणून धरले जाईल? तर ज्या व्यक्तीचे नाव खात्यावर पहिले आहे ती त्याची मिळकत समजली जाते.

३. बचत खात्यात तसेच चालू खात्यात काही वेळेस अतिरिक्त रक्कम जमा होऊन बसते, ज्यावर व्याज जेमतेम वार्षिक ४ टक्के व चालू खात्यातील जमा रकमेवर व्याज मिळत नाही. ही रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडच्या ‘लिक्विड फंड’ यासारख्या पर्यायांमध्ये गुंतवू शकता. यात सध्या साधारणपणे वार्षिक ६ ते ७ टक्के इतका वाढीचा लाभ मिळविता येतो. शिवाय ही गुंतवणूक तुम्ही कधीही मोडू शकता व त्यावर काही अतिरिक्त शुल्क भरवे लागत नाही. कारण या गुंतवणुकीसाठी ठरावीक अशी मुदत नाही. तसेच गुंतवणूक मोडल्यानंतर लगेचच्या कामकाजाच्या दिवशी जितके दिवस गुंतवणूक होती तेवढय़ा दिवसाच्या वाढीचा लाभासहित ती रक्कम बँकेत जमा होते.

आपल्याला काळाबरोबर बदलणेही जरुरीचे आहे. निश्चलनीकरणानंतर बँकेच्या व्यवहारांमध्ये बरेच बदल घडले आहेत. रोकड व्यवहारांकडून ऑनलाइन पेमेंटकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. वेगवेगळे ऑनलाइन पर्याय येऊ  लागले आहेत. वेगवेगळे अ‍ॅप बाजारात आले आहेत. जे तुम्ही मोबाइलवरून कधीही कुठेही रक्कम देण्यासाठी वापरू शकता. यात सरकारही मागे नाही. त्यांनी ‘भीम’ अ‍ॅप बाजारात आणले आहे.

भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार अंतर्गत ‘भारत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन’ने ही एक हमी योजना सुरू केली आहे. भविष्यात, टेलिफोन किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी व्यवहार करण्यासाठी हे अ‍ॅप वापरले जाऊ  शकते.

भारत हा प्रगतिशील देश आहे. बदलत्या काळानुसार बदलत जाणाऱ्या गोष्टींचा आपण जितक्या लवकर स्वीकार करू तेवढा आपल्या स्वत:च्या प्रगतीसाठी तर हातभार लागेलच, शिवाय देशाच्या विकासासाठी आपण भागीदार बनू.

you are the embodiment of the information you choose to accept and act upon. To change the circumstances you need to change your thinking and subsequent actions. -Adlin Sinclair

मथितार्थ असा की, ‘तुम्ही जेव्हा बदल स्वीकारता तेव्हाच तुम्हाला बदल आत्मसात करता येतो. तुमचे विचार बदलल्यामुळे व बदलेले विचार अमलात आणल्यामुळे परिस्थिती नक्कीच बदलू शकते.’

kiran@fingenie.in

(लेखक आर्थिक नियोजनातील उाढ उट पात्रताधारक व सेबी नोंदणी )

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banking system and investment
First published on: 20-03-2017 at 01:01 IST