News Flash

फंड विश्लेषण : निवृत्तीपश्चात कोष निर्मितीसाठी!

बॅलेन्स्ड फंडांचा जोखीम संलग्न परताव्याचा दर डायव्हार्सिफाईड इक्विटी फंडांच्या तुलनेत नेहमीच सरस ठरतो.

फंड विश्लेषण : निवृत्तीपश्चात कोष निर्मितीसाठी!

बिर्ला सन लाइफ बॅलेन्स्ड ९५ फंड
arth5बॅलेन्स्ड फंडांचा जोखीम संलग्न परताव्याचा दर डायव्हार्सिफाईड इक्विटी फंडांच्या तुलनेत नेहमीच सरस ठरतो. बॅलेन्स्ड फंडांच्या या गुणधर्मामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाच्या स्रोतासाठी बॅलेन्स्ड फंड प्रकारातील गुंतवणुकीची प्राधान्याने शिफारस केली जाते.
बिर्ला सन लाइफ बॅलेन्स्ड ९५ फंड हा म्युच्युअल फंडांच्या बॅलेन्स्ड फंड गटातील एकवीस वर्षांपासून गुंतवणूकदारांसाठी संपत्तीची निर्मिती करणारा फंड आहे. या फंडाची पहिली एनएव्ही १० फेब्रुवारी १९९५ रोजी जाहीर झाली. १० रुपये ग्रोथ एनएव्हीचे, आज २६ मे २०१६ ५८०.९४ रुपये एनएव्ही झाली आहे. म्युच्युअल फंडाच्या बॅलेन्स्ड फंड गटात बिर्ला सन लाइफ बॅलेन्स्ड ९५ फंड हा २३ मे २०१६ या दिवशीच्या एनएव्हीनुसार सर्वाधिक परतावा देणारा फंड ठरला आहे. हा फंड बॅलेन्स्ड फंड प्रकारचा असल्याने फंडाचा ७० टक्के निधी समभागात व उर्वरित निधी स्थिर उत्पन्न देणाऱ्या रोख्यांत गुंतविला जातो. या फंडाचा परतावा अनेक डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांपेक्षा अधिक असल्याने ज्या गुंतवणूकदारांची क्षमता मध्यम स्वरूपाची जोखीम स्वीकारण्याची आहे अशा गुंतवणूकदारांसाठी हा फंड आदर्श गुंतवणूक ठरतो. सोबतच्या आलेखामध्ये फंडाच्या ‘सिप’ परताव्याचा दर दाखविला आहे.
सोबतच्याआलेखांवरून असा निष्कर्ष काढू शकतो की डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड प्रकाराच्या फंडांच्या व बॅलेन्स्ड फंडाच्या परताव्याच्या दरात जरी फारसा फरक नसला तरी गुंतवणुकीच्या जोखीम प्रकारात मात्र फरक आहे. बॅलेन्स्ड फंड प्रकारात ७० टक्के समभाग गुंतवणुकीतील असल्याने बॅलेन्स्ड फंड प्रकारच्या फंडात जोखीम ही कमी असते व या फंडांचे प्रमाणित विचलन (standard deviations) डायव्हार्सिफाईड इक्विटी फंडांच्या तुलनेत कमी असते. परिणामी बॅलेन्स्ड फंडांचा जोखीम संलग्न परताव्याचा दर सरस ठरतो. बॅलेन्स्ड फंडांच्या या गुणधर्मामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या उदरनिर्वाहासाठी जमा करावयाच्या निधीसाठी बॅलेन्स्ड फंड प्रकारातील गुंतवणुकीची प्राधान्याने शिफारस केली जाते. फंडाच्या तीन, पाच, १० वर्षे परताव्याचा दर अनुक्रमे ५.८ टक्के, १८.४ टक्के व १५.०३ टक्के असून याचा कालावधीतील वार्षिक प्रमाणित विचलन १२ ते १९ टक्के दरम्यान आहे. दीर्घकालीन जोखीम संलग्न परताव्याची सरासरीत ३ ते २० वर्षे कालावधीत या फंडाची कामगिरी अनेक लार्ज कॅप फंड प्रकारापेक्षा अव्वल ठरते. १ मे २००० रोजी सुरू केलेल्या १,००० रुपयांच्या सिप गुंतवणुकीच्या माध्यमातून फंडात गुंतविलेल्या १,८०,००० रुपयांचे २६ मे २०१६ रोजी ९,२३,४५०.१० रुपये झाले असून वार्षिक परताव्याचा दर १८.३२ टक्के आहे. याच कालावधीत ५,००० रुपये सिप गुंतवणुकीचे ३५ लाख रुपये झाले आहेत. या कालावधीतील गुंतवणूकदाराची फंडातील गुंतवणूक केवळ ९ लाखांची आहे. फंडाच्या २६ मेच्या ग्रोथ एनएव्हीनुसार फंडाने मागील १८ वर्षे सिप गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना १८.३६ टक्के दराने, १२ वर्षे सिप गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना १५.२९ टक्के दराने, १० वर्षे सिप गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना १५.०८ टक्के दराने आणि ७ वर्षे सिप गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना १२.६७ टक्के परतावा दिला आहे. बिर्ला फंडांच्या बॅलेन्स्ड ९५ या फंडाची कामगिरी अन्य फंडांच्या बॅलेन्स्ड फंडांपेक्षा फारच उजवी असल्याने तरुण किंवा मध्यम वयाच्या गुंतवणूकदरांनी दीर्घ मुदतीत सेवानिवृत्ती कोष निर्माण करण्यासाठी या फंडाची निवड करणे योग्य ठरते.
३० एप्रिलच्या फंडाच्या गुंतवणूक विवरणानुसार फंडाने ७३ टक्के गुंतवणूक समभागात केली असून उर्वरित गुंतवणूक रोख्यांत केली आहे. फंडाने गुंतवणूक मल्टी कॅप प्रकारे केली असून एकूण गुंतवणुकीच्या दोन-तृतीयांश गुंतवणूक लार्ज कॅप प्रकारच्या समभागात केली आहे. समभाग गुंतवणुकीत फंडाने सर्वाधिक गुंतवणूक बँकिंग उद्योगात केली असून त्या खालोखाल गुंतवणुकीची पसंती माहिती तंत्रज्ञान, तेल व वायू, औषध निर्माण, वाहन उद्योग यांना दिली आहे. फंडाच्या पहिल्या पाच गुंतवणुकांत अनुक्रमे एचडीएफसी बँक, इन्फोसिस, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक व रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश होतो. रोखे गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक केंद्र सरकारच्या रोख्यांत केली असून २०४५, २०३४, २०२९ व २०२३ मध्ये मुदतपूर्ती असणाऱ्या रोख्यांत गुंतवणूक असल्याने व्याज दरकपातीमुळे रोख्यांच्या किमतीत होणाऱ्या भांडवली लाभाचा फायदा करून घेण्याचे निधी व्यवस्थापकांचे धोरण आहे. फंडाने मागील २१ वर्षे सातत्याने लाभांश जाहीर केला आहे. मागील एका वर्षांपासून हा फंड त्रमासिक लाभांश जाहीर करीत असून फंडाने १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या म्युच्युअल फंडाच्या युनिटवर आजपर्यंत १०९ रुपये लाभांशापोटी वाटले आहेत.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलेन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड अनेक वरिष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्नाचे साधन म्हणून विकला गेला. बँक मुदत ठेवींपेक्षा एक टक्का अधिक व करमुक्त उत्पन्न अशी या फंडाची ओळख गुंतवणूकदारांना करून देण्यात आली. उत्तम मार्केटिंग साधल्याने या फंडाच्या मालमत्तेने १० हजार कोटींचा टप्पा पार के ला. १० सप्टेंबर २०१५ पासून ‘गँरंटीड मनी बॅक’ असे बिरुद मिळविणाऱ्या या फंडाने फेब्रुवारी महिन्यात म्हणजे ‘गॅरंटीड मनी बॅक’ योजना सुरू केल्यापासून पाचव्या महिन्यांत लाभांश जाहीर केला नाही. म्हणजे ही ‘गॅरंटी’ केवळ पाच महिन्यांसाठीच होती. लाभांशाचा दर ८ टक्के असूनसुद्धा नियमित लाभांश जाहीर करण्यात खंड पडल्याने या उत्पन्नावर विसंबून असणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांना त्रास झाला. एकूणच मासिक लाभांश जाहीर करणे फंड घराण्याला झेपले नाही. सध्या सर्वाधिक मालमत्ता व्यवस्थापन करणारे फंड घराणे असा बिरुद मिरविणाऱ्या फंड घराण्याकडून हे घडले हे विशेष.
arth3
फंडातील एकूण गुंतवणुकीच्या ६५ टक्क्यांपेक्षा अधिक समभाग गुंतवणूक असलेल्या बॅलेन्स्ड फंडातून १२ महिन्यांनतर काढून घेतलेली रक्कम करमुक्त असते. यातील रोखे गुंतवणूकदेखील समभाग गुंतवणुकीप्रमाणे समजून काढून घेतलेल्या रकमेवर झालेल्या नफ्यावर कर भरावा लागत नाही. म्हणूनच सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांना ‘एसटीपी’ हा कार्यक्षम पर्याय उपलब्ध आहे. योग्य बॅलेन्स्ड फंड हे सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्रोत कसा असू शकतात हे उदाहरणासहित पुढील भागात जाणून घेऊ.
वसंत माधव कुलकर्णी
shreeyachebaba
@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2016 12:22 am

Web Title: birla sun life balanced 95 fund
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : सातत्यपूर्ण कामगिरीचा धागा!
2 कर समाधान : कर परताव्यावरील व्याज लाभ करपात्र!
3 माझा पोर्टफोलियो : सद्यभावात सुयोग्य!
Just Now!
X