17 December 2017

News Flash

फंड वार्ता : जे न देखे एनएव्ही, ते देखे मुदत ठेवी!

मुदत ठेव आणि विमा योजना ही भारतीय गुंतवणूकदारांची आवडती गुंतवणूक साधने आहेत.

सुयोग काळे | Updated: September 18, 2017 3:02 AM

मुदत ठेवीतील गुंतवणूक म्हणजे एक सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी असते हे काही १०० टक्के खरे नाही. खासगी कंपन्याच नाही तर अनेक पतसंस्था आणि सहकारी बँकांतील घोटाळ्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांचा पैसा हा अशा मुदत ठेवींमध्ये अडकून पडला आहे. या उलट जर या गुंतवणूकदारांनी बॉण्ड फंडात पैसे गुंतविले असते तर त्यांना साधारण या मुदत ठेवीच्या व्याजदरांइतका परतावा मिळाला असता आणि त्यांच्या मुद्दलाचे नुकसानही झाले नसते.

मुदत ठेव आणि विमा योजना ही भारतीय गुंतवणूकदारांची आवडती गुंतवणूक साधने आहेत. सेवा निवृत्तीनंतर मिळालेली पूंजी ही बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा अर्धा ते एक टक्का अधिक व्याज दर असलेल्या गुंतवणूक साधनात गुंतविली की गुंतवणूकदारांचा आणि मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिकांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. निश्चित परतावा आणि एक लाखापर्यंतच्या बँक ठेवींना संरक्षण यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा हा बरेचदा मुदत ठेवीकडे असतो. पण खात्रीशीर परतावा आणि सुरक्षित मुद्दल ही धारणा वस्तुत: अपसमजातून तयार झालेली आहे. ठेवींसंबंधी या गैरसमजातूनच मग, अर्ध्या टक्क्यापासून ते दोन टक्क्यांपर्यंत अधिक व्याजदराच्या मोहापायी मुद्दल गमावण्याची वेळ अनेकदा या गुंतवणूकदारांवर येते. ज्या गुंतवणूकदारांनी पुणे शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुदत ठेव योजनेत गुंतविले त्यांना याचा अनुभव आला असेल. या ठेवींमध्ये पैसा गुंतविण्याचा उद्देश हाच होता की, बँकेपेक्षा दोन टक्के अधिक खात्रीशीर व्याज मिळेल. सुरुवातीची काही वर्षे ते मिळालेही. पण नंतर काही वर्षांनंतर या मुदत ठेवींवरचे व्याज मिळताना चालढकल सुरू झाली आणि मुद्दलही वेळेवर परत मिळेल की नाही याची शाश्वती राहिली नाही. ‘घरासाठी काडी काडी जमविलेल्या’ गुंतवणूकदारांची घरे पुण्यातील या बांधकाम व्यावसायिकाच्या घोटाळ्यापायी उद्ध्वस्त झाली आहेत. निश्चित गुंतवणुकीतील मुद्दलाची सुरक्षितता आणि रोकडसुलभता लक्षात न घेतल्यामुळे तथाकथित सुरक्षित गुंतवणुकीमागचा उद्देश फोल ठरला.

‘सेबी’च्या कठोर नियंत्रणाखाली असलेल्या म्युच्युअल फंडांना असुरक्षित समजणे आणि दिल्या शब्दाला जागण्याच्या या विकासकाच्या लौकिकाला भूललेल्या गुंतवणूकदारांना या निमित्ताने एक धडा मिळाला. अनुभवासारखा गुरू नसतो असे म्हणतात ते खरेच आहे.

या उदाहरणावरून एक निष्कर्ष नक्की निघतो की, मुदत ठेवीतील गुंतवणूक म्हणजे एक सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी असते हे काही १०० टक्के खरे नाही. खासगी कंपन्याच नाही तर अनेक पतसंस्था आणि सहकारी बँकांतील घोटाळ्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांचा पैसा हा अशा मुदत ठेवींमध्ये अडकून पडला आहे. या उलट जर या गुंतवणूकदारांनी बॉण्ड फंडात पैसे गुंतविले असते तर त्यांना साधारण या मुदत ठेवीच्या व्याजदरांइतका परतावा मिळाला असता आणि त्यांच्या मुद्दलाचे नुकसानही झाले नसते. पण आजही अनेक जणांच्या डोक्यात म्युच्युअल फंड म्हणजे जोखीम हे समीकरण अगदी पक्के बसले आहे. बॉण्ड फंडाचे व्यवस्थापक हे ‘सेबी’ने आखून दिलेल्या नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन करून अत्यंत पारदर्शकपणे सरकारी आणि खासगी कर्जरोख्यांत गुंतवणूक करतात. त्याचबरोबर आपला अनुभव, ज्ञान आणि कौशल्याचा वापर करून अतिरिक्त परतावा मिळवून देण्याचाही प्रयत्न करतात. अल्प आणि मध्यम मुदतीच्या बॉण्ड फंडाचा परतावा हा कमी-अधिक प्रमाणात मुदत ठेवीप्रमाणेच असतो. पण त्यात असलेली पारदर्शकता आणि रोकडसुलभता आणि कर कार्यक्षमता यामुळे बॉण्ड फंड मुदत ठेवीपेक्षा उजवे ठरतात.

फक्त पारदर्शकता आणि तरलता याच मुद्दय़ावर नाही तर कराच्या बाबतीत सुद्धा बॉण्ड फंडमधील गुंतवणूक फायद्याची ठरते. अशा प्रकारच्या फंडात रक्कम तीन किंवा त्याहून अधिक वर्षे गुंतविल्यास त्यातून मिळणाऱ्या परताव्यावर ‘लाँग टर्म कॅपिटल गेन’सह इंडेक्सेशनचा फायदा मिळतो आणि काही प्रमाणात कराचे ओझे कमी होते.

तात्पर्य : वरील दिलेल्या लेखामधून गुंतवणूकदारांनी मुदत ठेव सोडून फक्त बॉण्ड फंडांमध्येच गुंतवणूक करावी, असे काहीही सूचित करण्याचा उद्देश नाही. पण सुरुवातीला बॉण्ड फंडांत काही प्रमाणत गुंतवणूक करून आधी अनुभव घ्यावा आणि मग कालानुरूप आपली गुंतवणूक अन्य प्रकारच्या थोडी अधिक जोखीम, पण अधिक परतावा देणाऱ्या फंडात वळविण्यास काहीच हरकत नाही.

सुयोग काळे – contactsuyogk@gmail.com

First Published on September 18, 2017 1:22 am

Web Title: bond funds good investment option
टॅग Bond Funds