दोन राष्ट्रीय शेअर बाजार- बीएसई व एनएसई आणि भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ यांच्या रोखे लवादाकडे मोठय़ा प्रमाणावर तक्रारी दाखल होत असतात. या तक्रारी प्रामुख्याने मोठय़ा गुंतवणूकदारांकडून दाखल होत असल्या तरी वैयक्तिक गुंतवणूदारसुद्धा शेअर बाजारातील मध्यस्थाकडून आपली फसवणूक झाल्यास लवादाकडे तक्रार दाखल करू शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्काबाबतीत पुरेशी माहिती नसल्याने, झालेल्या अन्यायाविरुद्ध ते रोखे लवादाकडे दाद मागताना दिसत नाहीत. दोन्ही शेअर बाजारांच्या संकेतस्थळावर यासाठी सोय केलेली असून ज्या बाजाराकडे दलालाविरुद्ध तक्रार दाखल करायची असेल त्या बाजाराच्या संकेतस्थळावर विशिष्ट जागी टिचकी मारून तक्रार दाखल करता येते. एखाद्या फसवणुकी संदर्भातील तक्रारींचे २५ लाखांपेक्षा कमी व २५ लाखांपेक्षा अधिक अशी दोन गटात विभागणी केली गेली आहे.

गुंतवणूकदारांना खालील कारणांनी तक्रार दाखल करता येईल –
१. दलालांमार्फत विकल्या गेलेल्या समभागांच्या बदल्यात निधी न मिळणे अथवा विलंबाने मिळणे
२. खरेदी केलेले रोखे / समभाग न मिळणे अथवा मिळण्यास विलंब होणे.
३. खरेदी केलेले शेअर न मिळाल्यास त्या बदल्यात मिळणाऱ्या पैशासंबंधी (क्लोज आऊट) तक्रारी
४.अशिलाच्या संमतीशिवाय दलालाने परस्पर केलेले ‘अनधिकृत’ सौदे
५. चुकीची दलाली, व्याज किंवा दंड आकारणी
६.अन्य कुठल्याही प्रकारची चुकीची आकारणी
लवादाकडे दाखल होणाऱ्या सर्वाधिक तक्रारींमागे चौथ्या क्रमांकाचे कारण प्रामुख्याने असल्याचे आढळले आहे.
तक्रार नोंदविण्यासाठी संकेतस्थळांची माहिती :
* मुंबई शेअर बाजार – बीएसई http://www.bseindia.com/investors/arbitration_mechanism.asp
* राष्ट्रीय शेअर बाजार – एनएसई https://www.nseindia.com/invest/content/about_arbitration.htm
या व्यतिरिक्त भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ची तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत असून http://www.scores.gov.in या संकेतस्थळावर जाऊन गुंतवणूकदार तक्रार नोंदवू शकतो.

ज्या सौद्यात फसवणूक झाली आहे असे गुंतवणूकदारास वाटते त्या सौद्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत तक्रार दाखल करणे अपेक्षित आहे. १० लाखाच्या आतील तक्रार दाखल करण्यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागत नाही. तक्रार दाखल केल्यापासून सहा महिन्यांच्या आत या तक्रारीबाबत लवादाकडून निवाडा होणे बंधनकारक असल्याने न्यालालयात या बाबतचा खटला दाखल करण्यापेक्षा अधिक परिणामकारक असा हा पर्याय आहे. लवादाच्या निर्णयाविरुद्ध गुंतवणूदाराला अपील दाखल करण्याची मुभा आहे. या लवादासमोर गुंतवणूकदार स्वत:ची बाजू स्वत: मांडू शकतो किंवा आपली बाजू मांडण्यासाठी वकिलाची नेमणूक करता येते.
लवाद नेमण्याबाबत वर उल्लेख केलेल्या घटनांची कारणे शोधण्याचा प्रयत्न केल्यास ढोबळपणे जे निष्कर्ष निघतात ते या प्रमाणे आहेत.
१. अशिलाने दिलेल्या मुखत्यारपत्राचा दलाल किंवा उप-दलालाकडून होणारा गैरवापर
२. अशिलाचे आपल्या हक्कांबाबतचे अज्ञान
३. सुरुवातीला दलालांच्या कर्मचाऱ्याच्या गोड बोलण्याला भुलून व वास्तवात नसलेल्या नफ्याचा मोह पडल्याने अशील दलालाला आपल्या वतीने आपल्या खात्यात सौदे करण्यास संमती देतो. या व्यवहारात तोटा झाल्यावर सौदा करण्यासाठी दिलेली ठेव तोटय़ांच्या बदल्यात वळती होणे अथवा भागभांडारातील समभाग विकून तोटय़ाची वसुली केली जाते.
४. जे अशील दलाल अथवा उपदलालांना आपल्या वतीने सौदे करण्याची परवानगी देतात अशा अशिलांना (अनधिकृत सौद्यांची) माहिती त्यांना येणाऱ्या लघुसंदेशांनी अथवा त्यांचे समभाग त्यांच्या डिमॅट खात्याबाहेर जाताना येणाऱ्या लघुसंदेशांद्वारा प्राप्त होते.
५. अशिलाचे समभाग मुख्य दलालाच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. हे हस्तांतरण अशिलाच्या संमतीने होणे गरजेचे असते. हे हस्तांतरित समभाग भविष्यातील फ्युचर ऑप्शनच्या सौद्याकरिता मार्जिन/ठेवीच्या रूपाने वापरले जातात.
या पैकी सर्वाधिक बाबी क्रमांक तीनमध्ये उल्लेख केलेल्या कारणांनी होतात. दलाली पेढय़ांचे कर्मचारी स्वत:ला मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यांपायी गोड गोड बोलून विविध आमिषे दाखवतो. अधिक लाभाच्या मोहापायी या आमिषांना भुलून अशील स्वत:च्या खात्यात असे सौदे करण्यास परवानगी देतो. अशा परवानगी देलेल्या सौद्यात तोटा झाल्यास याची दाद लवादाकडे मागता येत नाही. परंतु अन्य बाबतीत लवाद नेमण्याची मागणी संबंधित शेअर बाजाराकडे करता येते. (चौकटीत संकेतस्थळ दिले आहेत)
गुंतवणूकदारांना या निमित्ताने बेंजामिन ग्रॅहम यांच्या वचनाची आठवण करून देणे जरुरीचे वाटते. ते म्हणत – In the short run, the market is a voting machine but in the long run, it is a weighing machine. बाजार हा सट्टय़ासाठी नसून दीर्घकाळ गुंतवणूक करून संपत्तीची निर्मिती करण्यासाठी आहे. हे लक्षात घेतले की, भलत्या मोहात पडून फसवणुकीची शक्यता मावळते आणि अर्थात तक्रार दाखल करण्याची आणि लवाद नेमण्याची गरजही निर्माण होणार नाही.
* लेखक सीडीएसएल या रोखे भांडाराच्या गुंतवणूकदार साक्षरता विभागाचे प्रमुख असून अर्थसाक्षरतेसाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्याशी ajitm@cdslindia.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.
अजित प्रभाकर मंजुरे