काही वाचकांनी मध्यमकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा कालावधी विचारला त्यांच्यासाठी..

  • मध्यमकालीन : एक ते तीन वर्षे
  • दीर्घकालीन : तीन ते पाच वर्षे

सेंच्युरी एन्काबद्दल जुन्याजाणत्या गुंतवणूकदारांना सांगण्याची काहीच गरज नाही. १९६५ मध्ये म्हणजे सुमारे ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेली सेंच्युरी एन्का एके  काळी बीएसईच्या सेन्सेक्समध्ये सामील समभागांपैकी एक कंपनी होती. वस्त्रोद्योगाला ओहोटी लागल्यानंतर बाजार मूल्य घसरून एन्काचा शेअर ‘ब’ गटात गेला. बिर्ला समूहाच्या या कंपनीचे दोन अद्ययावत कारखाने असून त्यातील एक पुणे तर दुसरा गुजरातेत भरुच येथे आहे. राजश्री पॉलिफिल या नावाने ओळखला जाणारा भरुच येथील प्रकल्प नायलॉन आणि पॉलिएस्टर फिलामेंट यार्नचे उत्पादन करतो. तर पुणे येथील प्रकल्पात पॉलिएस्टर इंडस्ट्रियल यार्न व टायर कॉर्डचे उत्पादन होते. या उत्पादनांचा मुख्य उपयोग टायर्स, कन्वेयर बेल्ट्स, व्ही बेल्ट्स, दोरखंड इ. अनेक उत्पादनांत होतो. नायलॉन तर वस्त्रोद्योगात मोठय़ा प्रमाणात वापरले जाते. यात मुख्यत्वे मोजे, स्लीपिंग बॅग, सुटिंग्ज आणि शर्टिग्ज, ओढण्या, मॅट्रेसेस, छत्र्या, रिबिन्स, बेड स्प्रेड, पॅराशूट, विंडचिटर, स्विमिंग सूट्स इ. विविध उत्पादनांचा समावेश होतो.

गेल्या आर्थिक वर्षांत उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या सेंच्युरी एन्काने यंदाच्या पहिल्या तिमाहीतही चांगली कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीच्या उलाढालीत १३ टक्के घट झाली असली (२६३.२ कोटी रुपये) तरीही नक्त नफ्यात २५ टक्के वाढ होऊन तो २२.५ कोटी रुपयांवर गेला आहे. मेक इन इंडिया तसेच नवीन वस्त्रोद्योग धोरण या दोहोंचा लाभ या कंपनीला आगामी कालावधीत अपेक्षित असल्याने पुस्तकी मूल्यापेक्षा कमी भावात उपलब्ध असलेला हा शेअर मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत सदरात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती एक टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कु ठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. या सदरातून वर्षभरात सुचविलेल्या कंपन्यांचा आढावा दर तिमाहीस प्रसिद्ध करण्यात येतो.

portfolio1

stocksandwealth@gmail.com