18 February 2019

News Flash

माझा पोर्टफोलियो : बदललेल्या बाजारकलात फायद्याची खरेदी!

शेअर बाजारातील प्रदीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक उत्तम परतावा देते हे सिद्ध झाले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भासध्याचे शेअर बाजारातील वातावरण कुठल्याही सामान्य गुंतवणूकदाराला गोंधळात टाकणारे आहे; परंतु सराईत गुंतवणूकदार अशा परिस्थितीचादेखील फायदा घेतानाच दिसतात. खरे तर प्रत्येक मंदीसदृश वातावरणात उत्तम कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी करायला हवी. आत्तापर्यंतचा इतिहास पाहता शेअर बाजारातील प्रदीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक उत्तम परतावा देते हे सिद्ध झाले आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी डगमगून न जाता चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदीचे धोरण चालू ठेवावे.

वर्ष १९८६ मध्ये रामप्रसाद रेड्डी आणि के. नित्यानंद रेड्डी यांनी पुड्डूचेरी येथे सेमी-सिन्थेटिक पेनिसिलिनचे उत्पादन करण्यासाठी ऑरोबिंदो फार्माची स्थापना केली होती. आज जवळपास ३२ वर्षांनंतर ऑरोबिंदो ही भारतातील पहिल्या मोठय़ा दहा औषधी कंपन्यांतील एक कंपनी असून ती जागतिक पातळीवरही एक मोठी कंपनी मानली जाते. न्यूरो सायन्स, कार्डिओ व्हॅसक्युलर, मधुमेह, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, सेफलोस्पोरिन इ. अनेक औषध क्षेत्रांत कंपनी अग्रगण्य मानली जाते. कंपनीची नऊ  एपीआय केंद्रे असून अत्याधुनिक सात फॉम्र्युलेशन केंद्रे आहेत. जगातील सुमारे १२५ देशांना आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या ऑरोबिंदोच्या एकूण उलाढालीपैकी सुमारे ७० टक्के उलाढाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या काही मोजक्या औषधी कंपन्यांपैकी ऑरोबिंदो ही एक कंपनी आहे. ‘यूएस एफडीए’मुळे तसेच ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून गेले वर्ष तसेच सध्याचा कालावधी औषधी कंपन्यांसाठी तितकासा उत्साहवर्धक नाही. त्याचाच परिणाम म्हणून ऑरोबिंदोसारख्या उत्तम कंपनीचा शेअरदेखील आकर्षक भावात उपलब्ध आहे. डिसेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २,६२०.३५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४४४.३२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात केवळ एक टक्काच फरक असला तरीही नऊ  महिन्यांची कामगिरी तुलनेत चांगली आहे. सध्या हा शेअर ५५० रुपयांच्या जवळपास उपलब्ध आहे. बाजाराचा कल पाहता हा शेअर अजूनही खाली जाऊ  शकतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने खरेदीचे धोरण अवलंबावे. येत्या दोन वर्षांत तुम्हाला ही गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देऊ  शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on March 26, 2018 1:29 am

Web Title: company profile for aurobindo pharma ltd