23 January 2018

News Flash

माझा पोर्टफोलियो : २२ ते २५ टक्के प्रगतिपथ नक्कीच!

बँको प्रॉडक्ट्सची स्थापना सुमारे ५६ वर्षांपूर्वी म्हणजे १९६१ मध्ये झाली.

अजय वाळिंबे | Updated: July 28, 2017 4:59 AM

बँको प्रॉडक्ट्सची स्थापना सुमारे ५६ वर्षांपूर्वी म्हणजे १९६१ मध्ये झाली. वाहनांसाठी आवश्यक असलेली इंजिन कूलिंग सिस्टम्स आणि इंजिन सिलिंग सिस्टम्स बनवणारी तो भारतातील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. सरकारमान्य तारांकित दर्जा असलेले निर्यातगृह असलेल्या बँको प्रॉडक्ट्सचे भारतात बडोदे येथे दोन, तर जमशेदपूर, रुद्रपूर, जहिराबाद आणि भरूच येथे अद्ययावत कारखाने/ उत्पादन केंद्रे आहेत. बडोदे येथील युनिट १०० टक्के निर्यातप्रधान प्रकल्प आहे. कायम संशोधन आणि गुणवत्तेवर भर देणाऱ्या या कंपनीने २०१० मध्ये नेदरलँडमधील एनआरएफ ही कंपनी ताब्यात घेऊन युरोपमध्ये पाय रोवले. १९२७ पासून अ‍ॅल्युमिनियम आणि तांब्याचे रेडिएटर बनवणारी ही कंपनी जगभरात आपल्या ‘एनआरएफ’ या नाममुद्रेने प्रसिद्ध आहे. एनआरएफचे युरोपमध्ये तीन कारखाने असून युरोप आणि अमेरिकेत ११ गोदामे आणि वितरण केंद्रेदेखील आहेत. बँको आणि एनआरएफ या दोन महत्त्वाच्या ब्रॅण्ड्समुळे ओळखली जाणारी बँको प्रॉडक्ट्स अनेक देशांत आपल्या उत्पादनांची निर्यात करते. केवळ वाहन उद्योगच नव्हे तर इतर औद्योगिक आणि इंजिनीयरिंग उत्पादनांसाठी कंपनी आपली उत्पादने पुरविते. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांत अशोक लेलँड, बीईएमएल, भारतीय रेल्वे, कॅटरपिलर, कमिन्स, आयशर, एस्कॉर्ट, गोदरेज, टाटा, टीव्हीएस, मित्सुबिशी, फोर्स मोटर्स, किर्लोस्कर, जॉन डीअर, महिंद्र, हार्ली डेव्हिडसन, जेसीबी इ. नामवंत कंपन्यांचा समावेश करता येईल. मार्च २०१७ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने ५०२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०७.२५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ३१ टक्क्य़ांनी अधिक आहे. कंपनीचे यंदाच्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर होतील. मात्र सध्या वाहन क्षेत्राला बरे दिवस आहेत तसेच आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कायम उत्तम कामगिरी करून दाखवणारी तसेच जवळपास कसलेही कर्ज नसलेली बँको प्रॉडक्ट्स वार्षिक २२ ते २५ टक्के वाढ दाखवून प्रगतिपथावर राहणार हे नक्की असल्याने गुंतवणूकदारांनी प्रत्येक पडझडीला खरेदीचे धोरण ठेवावे आणि हे शेअर्स जमा करत राहावेत.

बँको प्रॉडक्ट्स (इंडिया) लिमिटेड

(बीएसई कोड – ५०००३९)

स्मॉल कॅप समभाग

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                                  ६७.८८

परदेशी गुंतवणूकदार            ०.४०

बँक/ म्यु. फंड / सरकार        ४.३३

इतर                                      २७.३९

 

बाजारभाव (रु.)                                           २३४.४५

उत्पादन/ व्यवसाय                                       वाहनपूरक

भरणा झालेले भागभांडवल (रु.)                     १४.३० कोटी

पुस्तकी मूल्य (रु.)                                         ७३.५

दर्शनी मूल्य (रु.)                                            २/-

लाभांश (%)                                                    ४५० %

प्रति समभाग उत्पन्न (रु.)                              १५

पी/ई गुणोत्तर                                                  १६.१

समग्र पी/ई गुणोत्तर                                        ४२.४

डेट/इक्विटी गुणोत्तर                                        ०.०५

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर                                  ७३

रिटर्न ऑन नेटवर्थ (%)                                      १९.०६

बीटा                                                                  १.४

बाजार भांडवल (कोटी रु.)                                  १७२६

५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.)          २५६/१४७

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on July 24, 2017 1:00 am

Web Title: company profile for banco products india ltd
  1. No Comments.