जीएचसीएल ऊर्फ गुजरात हेवी केमिकल्स लिमिटेड ही सुमारे ३५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली कंपनी आज केमिकल्स, टेक्सटाइल आणि इतर ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करते. केमिकल्स क्षेत्रात सोडा अ‍ॅशचे उत्पादन करणारी ही भारतातील एक प्रमुख आणि मोठी कंपनी आहे. काच आणि डिर्टजटसाठी सोडा अ‍ॅश कच्चा माल म्हणून वापरला जातो. सोडा अ‍ॅशच्या भारतीय बाजारपेठेतील सुमारे २५ टक्के हिस्सा जीएचसीएलचा आहे. टाटा केमिकल्स आणि निरमा या दोन कंपन्या जीएचसीएलच्या प्रमुख स्पर्धक आहेत. गेली १० वर्षे सोडा अ‍ॅशला वार्षिक मागणी सरासरी केवळ ४.७ टक्के आहे. मात्र काच उद्योगाच्या वाढत्या मागणीमुळे तसेच एकंदरीत भारतातील वाढती बाजारपेठ पाहता आगामी कालावधीत या मागणीचा ओघ वाढून तो सरासरी वार्षिक १० टक्क्य़ांपर्यंत जाईल अशी आशा आहे. सध्या कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ५८ टक्के उलाढाल सोडा अ‍ॅशची आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने आपला कर्जभार कमी केला असून कंपनी व्यवस्थापनानेदेखील कंपनीचे कामकाज सुधारण्याच्या दृष्टिकोनातून स्वागतार्ह पावले उचलली आहेत. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने विस्तारीकरण योजना आखली असून, २०१९च्या पहिल्या तिमाहीत कंपनीची उत्पादन क्षमता १.२५ लाख मेट्रिक टनाने वाढेल. तसेच २०२२ पर्यंत कंपनी गुजरातेत ३,००० कोटी रुपयांचा ग्रीन फिल्ड प्रकल्प सुरू करत आहे. या प्रकल्पाद्वारे कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता पाच लाख मेट्रिक टनाने वाढेल. कंपनीच्या टेक्सटाइल मिल्स वापी आणि मदुराई येथे असून एकूण उत्पादनापैकी सुमारे ६५ टक्के उत्पादन अमेरिकेत निर्यात होते. परंतु सध्या अमेरिकेत ऑनलाइन शॉपिंगचे महत्त्व वाढल्याने कंपनीचा हा विभाग फायद्यात भर घालू शकलेला नाही. डिसेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ७१७.८५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७१.१७ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो १२ टक्क्य़ांनी कमी आहे. मात्र आपली खरेदी दीर्घ कालावधीसाठी असल्याने जीएचसीएलची निवड पोर्टफोलियोमध्ये करायला हरकत नाही. येत्या दोन वर्षांत या गुंतवणुकीतून किमान ३० टक्के परतावा अपेक्षित आहे.

जीएचसीएल लिमिटेड   (बीएसई कोड – ५००१७१)

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.