जागतिक स्तरावर ज्या काही थोडय़ा भारतीय कंपन्या आहेत त्यातील एक म्हणून हायकलचे नाव घेता येईल. १९८८ मध्ये स्थापन झाल्यापासून गेल्या तीस वर्षांत कंपनीने अनेक क्षेत्रात प्रवेश करून मानाचे स्थान प्राप्त केले आहे. हायकल ही केवळ रसायनिक कंपनी नसून ती स्पेशालिटी केमिकल्स, एपीआय, बल्क ड्रग्स, बायोटेक, पशू संवर्धन, क्रॉप प्रोटेक्शन आणि जागतिक स्तरावर संशोधन करणारी कंपनी आहे. महाराष्ट्रात तळोजा आणि महाड, गुजरातेत पानोली तर कर्नाटकांत जिगणी येथे कंपनीचे उत्पादन प्रकल्प असून पुण्यामध्ये संशोधन आणि विकास केंद्र आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पेटंटेड उत्पादंनाच्या संशोधन आणि उत्पादनासाठी हायकल कंत्राट घेते. सध्या कंपनीचे असे सुमारे २५ ग्राहक असून त्यात बायर आणि फायझर सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीने स्वत:च्या संशोधन केंद्रात विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे आता एपीआयच्या उत्पादन प्रक्रियेत बदल केला असून त्यामुळे कंपनीच्या उत्पादन खर्चात बचत होईल. कंपनीचे बंगळुरूमधील एपीआय उत्पादन केंद्र अत्याधुनिक असून त्याला अमेरिकन एफडीएची मान्यता आहे. या केंद्रात एकाच वेळी चार एपीआयचे उत्पादन होते. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनीने युरोप आणि जपानमधील काही कंपन्यांबरोबर दीर्घकालीन करार केले असून त्याचा फायदा कंपनीला होईल. डिसेंबर २०१७ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २४६.६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २३.२४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ६८ टक्क्यांनी अधिक आहे. यंदाच्या तसेच पुढील आर्थिक वर्षांत देखील कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हायकल तुमच्या पोर्टफोलियोत जरूर ठेवा.

# गेल्या वर्षी बलरामपूर चिनी मिल्स हा शेअर सुचविला होता. या शेअयरचा भाव बऱ्यापैकी पडला आहे. मात्र सुदैवाने कंपनीने ‘बाय बॅक ऑफर’ १५० रुपये प्रति शेअर किमतीला आणली आहे. या शेअरमधून बाहेर पडायची ही चांगली संधी आहे.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.