arth05arth04सुप्रसिद्ध आयनॉक्स समूहाची आयनॉक्स विण्ड लिमिटेड ही शेअर बाजारात सूचिबद्ध झालेली तिसरी कंपनी. या समूहाच्या गुजरात फ्लुरो केमिकल्स आणि आयनॉक्स लेझर या दोन कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. साधारण १५ महिन्यांपूर्वी गुजरात फ्लुरो केमिकल्स या कंपनीने आयनॉक्स विण्डचा आयपीओ बाजारात आणला. ३२५ रुपयांना दिलेला हा शेअर सध्या बऱ्यापैकी सवलतीत उपलब्ध आहे. कंपनीचे भारतात ब्लेड्स आणि टय़ुबुलर टॉवर्सचे दोन उत्पादन प्रकल्प असून त्यापैकी एक हिमाचल प्रदेशमध्ये ऊना येथे तर दुसरा रोहिका येथे, गुजरातमध्ये आहे. आयनॉक्स विण्डची दोन प्रमुख बिझनेस मॉडेल्स आहेत. पहिल्या प्रकारात कंपनी पवनचक्की उभारण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करते. यामध्ये जमीन अधिग्रहणापासून आवश्यक त्या सर्व संमती मिळवणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, पवनचक्की उभारणे आणि तिची देखभाल करणे आदींचा समावेश आहे, तर दुसऱ्या प्रकारात पवनचक्की उभारण्यासाठी आवश्यक साधनसामग्री पुरवणे, पवनचक्कीची देखभाल करणे, डब्ल्यूटीजी (विण्ड टर्बाइन जनरेटर) पुरवणे इ. समावेश होतो. आयनॉक्सचा डब्ल्यूटीजी प्रकल्प हा एएमएससी या ऑस्ट्रियाच्या विकसित तंत्रज्ञानावर आधारित असून कंपनीची दोन्ही उत्पादन केंद्रे जागतिक अत्याधुनिक दर्जाची आहेत. गेल्या आर्थिक वर्षांसाठी कंपनीने ३,८७२.३४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४८१.२९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ४६ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचा मध्य प्रदेशातील ब्लेड उत्पादन प्रकल्प कार्यान्वित झाला असून उत्पादन क्षमतेत (१,६०० मेगावॉट) दुप्पट वाढ केल्याचे सकारात्मक परिणाम यंदा दिसून येतील, अशी कंपनी व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे आवश्यक जमीन अधिग्रहण केल्यानंतर कंपनी आता दक्षिणेत जमीन अधिग्रहण करीत आहे. आंध्र प्रदेशात किफायतशीर भावात जमीन खरेदी केल्याचा कंपनीचा दावा आहे. सध्या २३० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर दीड-दोन वर्षांत उत्तम परतावा देऊ शकेल.
अजय वाळिंबे -stocksandwealth @gmail.com

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.