21 February 2019

News Flash

माझा  पोर्टफोलियो : मल्टी ब्रॅण्ड आणि मल्टी प्रॉडक्ट!

अपेक्षेप्रमाणे डिसेंबर २०१७ अखेर समाप्त तिमाहीसाठी कंपनीने उत्कृष्ट निकाल जाहीर केले

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे १९८३ मध्ये एम पी रामचंद्रन यांनी केवळ ५,००० रुपये गाठीशी असताना सुरू केलेली ज्योथी लॅबोरेटरीज आज १,६०० कोटी रुपयांची उलाढाल करणारी एक मोठी मल्टी ब्रॅण्ड आणि मल्टी प्रॉडक्ट कंपनी बनली आहे. सुरुवातीला उजाला हा ब्रॅण्ड प्रस्थापित केल्यानंतर कंपनीने काही ब्रॅण्ड विकत घेऊन तर काही नवीन उत्पादन वर्गवारीत स्वत:चे ब्रॅण्ड प्रस्थापित केले आहेत. विस्तारीकरणाच्या योजना राबवताना कंपनीने टाटा केमिकल्सचा मध्य प्रदेशमधील पीथमपुर येथील प्रकल्प ताब्यात घेतला तर २०११ मध्ये हेंकेल इंडिया कंपनी आपल्या आधिपत्याखाली घेतली. आज कंपनीकडे हेंको, मोर लाइट, न्यू सुपर चेक, मिस्टर व्हाइट आणि उजाला या डिर्टजटखेरीज एक्सो, मॅक्सो, प्रिल, मार्गो, नीम असे विविध उत्पादनांचे प्रसिद्ध ब्रॅण्ड आहेत. कंपनीच्या उलाढालींपैकी ४२ टक्के उलाढाल फॅब्रिक केअरची असून ३१ टक्के उलाढाल डिश वॉशिंग उत्पादनांची आहे. उरलेली उलाढाल कीटकनाशके (मॅक्सो), साबण व इतर उत्पादनांची आहे.

अपेक्षेप्रमाणे डिसेंबर २०१७ अखेर समाप्त तिमाहीसाठी कंपनीने उत्कृष्ट निकाल जाहीर केले असून ‘जीएसटी’चा विपरीत परिणाम न झाल्याचे सिद्ध केले आहे. या कालावधीत कंपनीने १६३१.९६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३२.२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो ९७ टक्क्य़ांनी अधिक आहे. अर्थसंकल्प कसाही असला तरीही एफएमसीजी कंपन्यांना दिवस चांगलेच राहणारच हे स्पष्ट आहे. उत्तम व्यवस्थापन, अनुभवी प्रवर्तक आणि दर्जेदार उत्पादने यांच्या जोडीला कंपनीने आपले ब्रॅण्ड यशस्वीरीत्या प्रस्थापित केले आहेत. केवळ १८.१८ कोटीचे भागभांडवल असलेला, सध्या ३५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीस योग्य वाटतो. यंदाचे कंपनीचे २५ वे वर्ष असल्याने ‘बोनस भागां’ची अपेक्षा करायला हरकत नाही.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on February 12, 2018 1:06 am

Web Title: company profile for jyothy laboratories ltd