News Flash

माझा पोर्टफोलियो : काळाच्या पुढे दृष्टी

महिंद्र अॅकण्ड महिंद्र लि. काही कंपन्यांबद्दल जास्त सांगावे लागत नाही. गेली अनेक वर्षे या कंपन्या आपल्या देशाच्या उन्नतीला, जीडीपीला आणि प्रगतीला हातभार लावत आहेत. टाटा,

(संग्रहित छायाचित्र)

महिंद्र अॅकण्ड महिंद्र लि.

काही कंपन्यांबद्दल जास्त सांगावे लागत नाही. गेली अनेक वर्षे या कंपन्या आपल्या देशाच्या उन्नतीला, जीडीपीला आणि प्रगतीला हातभार लावत आहेत. टाटा, बिर्ला, रिलायन्स अशा मोठय़ा उद्योग समूहाप्रमाणेच महिंद्र समूह आज वाहन, शेती अवजारे, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स, बिगर वित्तीय बँकिंग, पर्यटन इ. विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र ही या समूहाची फ्लॅगशिप कंपनी.

१९५५ मध्ये स्थापन झालेली महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र आज केवळ भारतातच नव्हे तर जगातील काही मोठय़ा कंपन्यांपैकी एक आहे. १००हून अधिक देशांत आपले स्थान पक्के करणाऱ्या महिंद्र समूहात दोन लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. जगात सर्वात जास्त ट्रॅक्टरचे उत्पादन करणाऱ्या महिंद्रने गेल्या वीस वर्षांत अनेक क्षेत्रांत यशस्वी पदार्पण केले आहे. एसयूव्ही श्रेणीत भारतात मक्तेदारी असलेल्या या कंपनीची वाहन श्रेणीदेखील दुचाकीपासून मोठय़ा वाणिज्य वाहनांपर्यंत (एचसीव्ही) पोहोचली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत एचसीव्हीच्या उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. काळाची पावले ओळखून कंपनीने इलेक्ट्रिक कार उत्पादन आधीच चालू केले आहे. महिंद्र समूहाच्या वाहन उद्योगाव्यतिरिक्त अनेक व्यवसायांबद्दल आणि कंपनीच्या यशस्वी वाटचालीबद्दल समग्र माहितीसाठी कंपनीची वेबसाइट पाहणे योग्य ठरेल.

आपल्या भागधारकांना नुकतेच १:१ बक्षीस समभाग दिल्यानंतर कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे जाहीर झालेले निकाल अपेक्षेप्रमाणे आहेत. डिसेंबर २०१७ अखेर समाप्त तिमाहीसाठी कंपनीने १,११७.५७ कोटी रुपयांच्या तुलनेत १,३०२.४३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षांतील याच तिमाहीच्या तुलनेत तो १७ टक्क्यांनी जास्त आहे. चाकण येथे उभारलेली महिंद्र व्हेइकल्स मॅन्युफॅक्चरर लिमिटेड ही १०० टक्के उपकंपनी उत्तम कामगिरी करीत असून आगामी कालावधीत त्याचा सकारात्मक प्रभाव कंपनीच्या कामगिरीवर दिसून येईल. महिंद्रचा शेअर ७२५ रुपयांच्या आसपास उपलब्ध असून सध्याच्या अनिश्चित वातावरणात पोर्टफोलियो बळकटीसाठी महिंद्रसारखे शेअर्स टप्प्या टप्प्याने खरेदी करायला हरकत नाही.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 1:03 am

Web Title: company profile for mahindra and mahindra ltd
Next Stories
1 फंड विश्लेषण : जेथे सागरा धरणी मिळते
2 गुंतवणुकीत समतोल राखणे महत्त्वाचे!
3 क.. कमोडिटीचा : अस्सल राष्ट्रीय बाजारपेठेची घडण
Just Now!
X