News Flash

माझा पोर्टफोलियो : कायापालटाच्या वळणावर..

गेली काही वर्ष तोटय़ात असलेल्या सेलचे यंदाच्या तिमाहीचे निकाल उत्साहवर्धक आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

काही कंपन्यांबद्दल जास्त सांगावे लागत नाही. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अथवा सेल ही सरकारी कंपनी त्यापैकीच एक. भारतातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक असलेली सेल ही भारत सरकारच्या सात महारत्नांपैकी एक. कंपनीचे भारतामध्ये पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंड येथे स्टील उत्पादनाचे अद्ययावत असे पाच कारखाने असून तीन स्पेशल स्टील प्लांट्स आहेत. गेली पाच वर्षे पोलाद क्षेत्र मंदीत आहे. त्यातून सेलची उत्पादनक्षमतादेखील गेली पाच वर्षे १.२ कोटी टनांपर्यंत मर्यादित राहिली आहे. मात्र लवकरच कंपनीने सुमारे ६३,००० कोटी रुपये गुंतवून केलेले विस्तारीकरण पूर्ण होईल. त्यामुळे सध्या १.४३ कोटी टनांची क्षमता येत्या दोन वर्षांत २.१४ कोटी टनांपर्यंत जाईल. यामुळे प्रती टन उत्पादन खर्चात मोठीच बचत होईल.

गेली दोन वर्ष आपण पायाभूत सुविधांवर भर देत आहोत. सरकारी पातळीवर देखील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित होत आहेत. यात प्रामुख्याने पायाभूत सुविधांबरोबरच महामार्ग, सर्वासाठी घरे, रेल्वे विस्तारीकरण, बुलेट ट्रेन, स्वयंभूत संरक्षण क्षेत्र, स्मार्ट सिटी आदींचा समावेश आहे. त्यामुळेच पायाभूत आणि पोलाद क्षेत्राला उभारी येण्याची शक्यता प्रबळ आहे. गेली काही वर्ष तोटय़ात असलेल्या सेलचे यंदाच्या तिमाहीचे निकाल उत्साहवर्धक आहेत. कंपनीने सप्टेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी १३,६१७.४२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २४१.५२ कोटी रुपयांचा तोटा केला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ५६ टक्क्य़ांनी कमी आहे. गेल्या वर्षभरात सेलचा शेअर दुपटीहून वर गेला आहे. सध्या ५२ आठवडय़ांच्या उच्चांकावर असलेला हा २.१ बीटा असलेला शेअर गेल्या दोन वर्षांची आर्थिक कामगिरी पाहता कदाचित महाग वाटू शकेल. मात्र एक टर्नअराऊंड स्टोरी म्हणून सेलमधील दोन-तीन वर्षांची गुंतवणूक फायद्याची ठरू शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 2:00 am

Web Title: company profile for steel authority of india ltd
Next Stories
1 नियोजन भान.. : समारोपाची फेरउजळणी
2 कर  समाधान : आरोग्य विमा आणि  प्राप्तिकर कायदा
3 फंड विश्लेषण : रंगला वर्खाचा विडा..
Just Now!
X