फंडाविषयक विवरण
फंड प्रकार    :    समभाग केंद्रित बॅलेन्स्ड फंड
जोखीम प्रकार     :    समभाग गुंतवणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
गुंतवणूक    :     हा फंड  ६५ ते ७५ टक्के गुंतवणूक समभाग व उर्वरीत गुंतवणूक रोखे व रोकड सममूल्य असलेल्या अल्प मुदतीच्या रोख्यात करणारा फंड आहे. क्रिसिल बॅलेन्स्ड फंड निर्देशांक हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. गुंतवणूक केल्यापासून वर्षांआत बाहेर पडल्यास एक टक्का निर्गमन शुल्क लागू.
फंड गंगाजळी    :     फंडाची मालमत्ता ८८७.४९ कोटी रु. ३०/०६/२०१५ रोजी
व्यवस्थापन    :    विनीत सांबरे हे समभाग गुंतवणूक निधी व्यवस्थापक तर धवल दलाल हे रोखे गुंतवणूक निधी व्यवस्थापक आहेत. विनीत सांबरे मिड कॅप व मायक्रो कॅप गुंतवणुकतज्ज्ञ आहेत. जुल २००७ पासून ते डीएसपी ब्लॅकरॉक या फंड घराण्याच्या म्युच्युअल फंड योजनांचे निधी व्यवस्थापक म्हणून काम करीत आहेत. धवल दलाल हे कार्यकारी उपाध्यक्ष व स्थिर उत्पन्न योजनांचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. त्यांनी अमेरिकेतील डलास विद्यापीठातून व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून भारतात परतण्यापूर्वी मेरिल िलचच्या अमेरिकेतील वॉलस्ट्रीटवरील असलेल्या कार्यालयात रोखे गुंतवणूक निधी व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड)
अन्य माहिती    :    फंड घराण्याच्या http://www.dspblackrock.com वेबस्थळावरून किंवा पसंतीच्या वितरका कडून किमान पाच हजार एका वेळेस किंवा अथवा किमान एक हजाराच्या एसआयपीने या फंडात गुंतवणूक करता येते.
av-06डीएसपी ब्लॅकरॉक बॅलेन्स्ड फंडाची पहिली एनएव्ही २७ मे १९९९ रोजी जाहीर झाली. अर्थात या फंडाने सरलेल्या मे महिन्यांत १५ वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. या १५ वर्षांच्या कालावधीत फंडाने परताव्याच्या दराचे चढ-उतार पाहिले आहेत. वर्ष- दीड वर्षांपूर्वी अव्वल कामगिरी बजावणाऱ्या फंडाच्या क्रमवारीत पहिल्या पाचांत स्थान नसलेल्या या फंडाने अलीकडच्या तीन तिमाहीत बॅलेन्स्ड फंडांच्या क्रमवारीत पहिल्या पाचांत मुसंडी मारली आणि ३० सप्टेंबर २०१५ रोजी संपलेल्या तिमाहीत पहिला क्रमांकही पटकावला आहे. या फंडाच्या ३० सप्टेंबरच्या गुंतवणूक तपशिलानुसार, एकूण गुंतवणुकीच्या ६९ टक्के गुंतवणूक समभागांत, २५ टक्के रोख्यांमध्ये आणि सहा टक्के सीबीएलओ (Collateralized Borrowing And Lending Obligation) प्रकारच्या गुंतवणूक साधनांत केली आहे. दीड वर्षांपूर्वी बदललेल्या गुंतवणूक धोरणाचे हे फलित आहे. समभाग गुंतवणुकीत लार्ज कॅप समभागांचे प्रमाण कमी करून मिड व स्मॉल कॅप समभागांचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय फंड व्यवस्थापनाने घेतला. ब्रिटानिया, ग्लेनमार्क, एसआरएफ, स्ट्राइड अर्कोलॅब या सारख्या आधीपासून गुंतवणूक असलेल्या कंपन्यांच्या समभागांचे प्रमाण वाढवत, एकूण समभाग गुंतवणुकीच्या ३० टक्क्य़ांपर्यंत नेण्यात आला. याचाच परिणाम म्हणून फंडाच्या वार्षिक परताव्याचा दर १६.५२ टक्के इतका (१६ ऑक्टोबरच्या एनएव्हीप्रमाणे) आज झाला आहे. एक वर्षांपूर्वी हाच परताव्याचा दर ११.७ टक्के होता. योग्य वेळी योग्य त्या समभागांत केलेली गुंतवणूक परताव्याच्या दरात सुधारणेस कारणीभूत ठरली. गुंतवणुकीचा बदललेला कल असाच ठेवून परताव्याचा दर थोडय़ाफार फरकाने कायम राहील, असा फंड व्यवस्थापनाचा प्रयत्न राहील. स्मॉल कॅप व मिड कॅप यांचे प्रमाण वाढल्याने हा फंड बॅलेन्स्ड फंड गटात अधिक धोका पत्करून जास्त परतावा देणारा फंड बनला आहे. त्यामुळे अधिक जोखीम घेऊन चांगला परतावा मिळविण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांनी या फंडात गुंतवणुकीचा जरूर विचार करावा.
mutualfund.arthvruttant@gmail.com