या प्रकारच्या आर्थिक व्यक्तिमत्त्वात मोडणाऱ्यांची स्वभाववैशिष्टय़े :

जगातील सर्वात मोठय़ा आकाराचा शहामृग पक्षी. उडता येत नसले तरी तो पक्षी. तर शहामृगाच्या वर्तनाची एक पद्धत आहे. त्याला कधीही धोका वाटला की, तो मातीत तोंड खुपसून बसतो. तोंड मातीत खुपसल्यामुळे डोळ्यासमोर अंधार येतो. त्याला काहीच दिसत नसते पण त्याला असे वाटते की, आपल्याला कोणीच पाहू शकत नाही. त्यामुळे ज्या गोष्टीमुळे त्याला धोका किंवा भीती वाटते त्या गोष्टीपासून आपण सुरक्षित आहोत, असे त्याला वाटत राहते. त्याच्या याच वर्तनाचा फायदा घेऊन त्याला पकडले जाते. त्याची शिकार करताना त्याचा जीपने किंवा चारचाकी गाडीने पाठलाग केला जातो त्याला दमेपर्यंत किंवा घाबरेपर्यंत पळवून पाठलाग केला जातो. मग तो घाबरला की मातीत डोके खुपसून बसतो व त्याला वाटते आपण सुरक्षित आहोत. आपल्याला कोणी बघू शकत नाही या त्याच्या सुरक्षिततेच्या भावनेमुळे त्याच्या मानेभोवती, डोळ्याभोवती काळे कापड गुंडाळले जाते. त्याला उचलून जीपमध्ये टाकतात, पुढे पिंजऱ्यात टाकतात, मग ही पट्टी काढली जाते. आपण पकडले गेलो आहोत हे तेव्हा त्याला लक्षात येते. या त्याच्या सुरक्षिततेच्या भ्रमात राहण्याच्या वर्तनाची किंमत त्याला शिकार बनून किंवा पिंजऱ्यात राहून मोजावी लागते.

आर्थिक शहामृगी वृत्ती (financial Ostracism) म्हणजे आर्थिक बाबींपासून पळून जाण्याचे, टाळण्याचे, वगळण्याचे, दुर्लक्ष करण्याचे, दूर ठेवण्याचे, मनातून काढून टाकण्याचे असे कोणतेही कृत्य. याच आर्थिक सुरक्षिततेच्या भ्रमात राहणारे व्यक्तिमत्त्वाविषयी आज आपण पाहणार आहोत.

  • आर्थिक जबाबदाऱ्या नेहमी टाळतात किंवा त्यापासून दूर राहतात.
  • आर्थिक चर्चापासून दूर पळतात.
  • किंमत ठरवताना त्यांना घासाघीस किंवा किंमत कमी करणे जमत नाही.
  • पैसे मिळविण्याच्या संधी हे लोक सोडून देतात.
  • बँकेत जाण्यासाठी सुद्धा त्यांना उत्साह नसतो.
  • कोणाला दिलेले पैसेसुद्धा मागायला घाबरतात, बहुतेकदा मागतही नाहीत.
  • बऱ्याचदा मिळालेले धनादेश वटवत नाहीत आणि प्रसंगी हरवूनही बसतात.
  • अत्यंत गरजेची आर्थिक बाब किंवा जेव्हा पर्यायच नसतो फक्त अशाच वेळी ते आर्थिक निर्णय घेतात.
  • कुटुंबातील व्यक्तींनी आर्थिक बाबी जास्त विचारल्यावर हे लोक खूप चिडतात.
  • जास्त आर्थिक प्रश्न विचारणारे त्यांना शत्रू वाटतात.
  • वीज बिल, फोन बील, क्रेडिट कार्ड बिल स्वत:कडे पैसे असले तरी ते दंड भरून उशिरा चुकवतात.
  • कर्ज, बचत किंवा गुंतवणूक या गोष्टींचा ते जास्त विचार करत नाहीत.
  • आर्थिक आणि व्यावहारिक संकल्पनांच्या बाबतीत ते अज्ञानी असतात.
  • भविष्याविषयी आर्थिक तरतुदी कधीच करत नाहीत.
  • आर्थिक व्यावहारिक ज्ञान मिळवण्याबाबत ते नेहमी निरुत्साही असतात.
  • आर्थिक संदर्भात गरजेच्या बाबतीत मार्गदर्शन घेण्याबाबतीत त्यांना खूप मानसिक तयारी करावी लागते.
  • जमा खर्च लिहिणे यांना अजिबात आवडत नाही.
  • आर्थिक बाबतीत जाणकार असलेल्या लोकांशी मैत्री टाळतात.
  • आर्थिक बाबतीतील कोणत्याही गोष्टी म्हणजे धोका असल्यासारखे वाटते व त्या टाळल्या की त्यांना सुरक्षित वाटते.
  • आर्थिक निर्णयांच्या बाबतीत ते लगेच दुसऱ्यावर विश्वास ठेवून आर्थिक नियंत्रण दुसऱ्यावर सोपवतात.

 

या प्रवृत्तीमागील मनोवैज्ञानिक कारणे :

  • लहानपणीच्या आर्थिक नकारात्मक वातावरणामुळे त्यांना आर्थिक उदासीनता आलेली असते.
  • लहानपणी आर्थिक निर्णयाच्या संधी मिळालेल्या नसतात. त्यामुळे आर्थिक निर्णयक्षमतेबाबत न्यूनगंड मोठे होईपर्यंत कायम असतो.
  • आर्थिक निर्णय त्यांच्यात मानसिक ताण आणि भीती निर्माण करते.
  • आर्थिक अज्ञान ही शरमेची बाब मानल्यामुळे व आत्मसन्मान राखण्याच्या नादात ते आर्थिक बाबी टाळतात.
  • काही नाही केले तरी सर्व काही व्यवस्थित होईल अशा भ्रमात ते असतात.
  • बऱ्याच मोठय़ा आर्थिक निर्णयाच्या अपयशामुळे छोटे छोटे आर्थिक निर्णय घेतानाही जुन्या निर्णयाच्या तीव्र नकारात्मक भावना उफाळून येतात. त्यामुळे अशा परिस्थितीपासून दूर पळतात.

 

यावर उपाय कोणते?

  • आपल्या आर्थिक व्यक्तिमत्त्वाबद्दल जागरूकता येणे गरजेचे असते. या जाणिवेतून त्रुटी-उणिवांत बदल करणे सोपे जाते.
  • जागरूकपणे छोटे छोटे आर्थिक निर्णय घेणे.
  • जमा-खर्च लिहिण्याची स्वत:ला सवय लावणे.
  • अर्थसाक्षर बनण्यासाठी विश्वसनीय सल्लागारांचे मार्गदर्शन घेणे.
  • गुंतवणूक पर्यायांचा अभ्यास करणे.
  • आर्थिक चर्चासत्रे कार्यशाळा व कार्यक्रमात सहभागी होणे.
  • आर्थिक बाबतीत जागरूक लोकांशी मैत्री व चर्चा करणे.
  • एका दिवसात बदल होत नसतो हे समजून घेऊन संयम ठेवून ज्ञान वाढवावे.
  • आर्थिक निर्णयाच्या वेळी तयार होणाऱ्या नकारात्मक भावनांच्या बाबतीत जागरूक होऊन निर्णय घेण्याची सवय लावावी.
  • स्वत:साठी व कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करणे.
  • निवृत्तीपश्चात जीवन व वृद्धापकाळासाठी आर्थिक तजवीज करून ठेवणे.
  • पैशाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे.

आर्थिक शहामृगी वृत्तीअसणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या नेमक्या समस्या

  • त्यांना आपली आर्थिक प्रगती करता येत नाही.
  • आर्थिक आत्मविश्वास ते गमावून बसतात.
  • क्षमता, पात्रता व संधी असतानाही भीतीमुळे हे लोक संधी सोडून देतात.
  • संकटकाळी त्यांचे स्वत:साठी किंवा कुटुंबीयांसाठी काहीच नियोजन नसते.
  • सतत आर्थिक नुकसान करून घेतात.
  • स्वत:च्या हक्काच्या आर्थिक बाबींचा ते वापर किंवा उपयोग करून घेत नाहीत.
  • धूर्त, लबाड लोक आर्थिक बाबतीत त्यांना फसवतात.
  • आर्थिक निर्णयाच्या बाबतीत नातेवाईक किंवा मित्रपरिवार त्यांना टाळतात.
  • त्यांच्या वागण्याची शिक्षा त्यांना व त्यांच्या कुटुंबाला भोगावी लागते.

kiranslalsangi@gmail.com

लेखक पुणेस्थित समुपदेशक आहेत.