वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

* मला नुकतीच नोकरी लागली आहे. माझ्यासारख्या तरुण कमावत्यांनी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करावी ?       – अजिंक्य तेली

उत्तर : कोणतीही गुंतवणूक वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केली तर मोठय़ा कालावधीपर्यंत ती सुरू राहिल्याने अधिक लाभदायी ठरते. तुम्ही तरूण आणि कमावते आहात तसेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छित आहात, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. लवकर सुरुवात केल्याने मोठय़ा कालावधीत थोडय़ाशा पण नियमित सुरू राहिलेल्या गुंतवणुकीतून कल्पनाही करता येणार नाही, इतकी मोठी रक्कम तुम्ही मिळवू शकाल. म्युच्युअल फंडाबाबत नियमित पद्धतशीर गुंतवणुकीचे ‘एसआयपी’सारखे उत्तम माध्यम उपलब्ध आहे. नजीकच्या  व  मध्यम काळातील उद्दिष्ट (विवाह,  स्वमालकीचे घर, दुचाकी/चारचाकी खरेदी वगैरे)  यासाठी एक वा दोन चांगल्या फंडात एसआयपी सुरू करावी. गुंतवणूकयोग्य शिलकीतील किमान १० ते १५ टक्के हिस्सा हा रिटायरमेंट फंडातही गुंतविले जायला हवेत. उत्पन्न वाढेल तसे या गुंतवणूक रकमेतही वाढ करीत राहा.

*  म्युच्युअल फंडाच्या क्षेत्रात सध्या अनेक कंपन्या व त्यांच्या कित्येक योजना आहेत. नेमकी योजना कशी निवडावी ? – सोनाली सावंत

उत्तर : उत्पन्न आणि जोखीम पेलण्याची क्षमता जोखून, कोणताही गुंतवणूक निर्णय घेतला जायला हवा. बरोबरीनेच ही गुंतवणूक आपण कशासाठी करीत आहोत, हे सांगणाऱ्या आर्थिक उद्दिष्टांचा पैलूही गुंतवणुकीला हवा. आर्थिक उद्दिष्ट ठरल्यानंतर, म्हणजे किती कालावधीत किती रक्कम हवी आहे याचा हिशेब लावून साजेशा फंडाची निवड करणे सोपे जाते. गुंतवणुकीची धारणा, अत्यल्प, अल्प, मध्यम, दीर्घ यापैकी कोणत्याही कालावधीची असल्यास, त्यानुरूप म्युच्युअल फंडांचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंडांकडून त्यांच्या विविध योजनांची कामगिरी कालावधीनिहाय जाहीर केली जात असते. (दर पंधरवडय़ाला प्रसिद्ध होणारी ‘लोकसत्ता – अर्थवृत्तान्त’ कर्ते म्युच्युअल फंडांची यादीही संदर्भासाठी आहेच) तसेच माध्यमांमध्ये  विश्लेषकांकडून फंडांच्या कामगिरीचा आलेख प्रसिद्ध होत असतो. फंडांच्या विद्यमान एनएव्हीबरोबरच, पूर्व परतावा कामगिरीही लक्षात घेतली जावी. जोखीम क्षमता, कर कार्यक्षमता आदी निकषांवर वेगवेगळ्या उत्पन्न गटाकरिता वेगवेगळे फंड पर्याय उपलब्ध आहेत.

* म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करायवयाची झाल्यास मोठी रक्कम एकदम गुंतवावी काय ? – सुरेश गवळी

उत्तर : कोणत्याही एकाच पर्यायात शक्यतो एकरकमी गुंतवणूक करू नये. गुंतवणुकीत वैविध्य (डायव्हर्सिफिकेशन) हा जोखीमहरणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. मोठी रक्कम हाती असेल, तर म्युच्युअल फंडांसह विविध गुंतवणूक पर्यायात त्याची विभागणी केली जावी. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी ‘सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लान – एसटीपी’ ही  एक खूपच चांगली संकल्पना आहे (पाहा, ‘अर्थ वृत्तान्त,’ १० जुलै २०१७).  गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम हाती असल्यास, ती लिक्विड फंडात गुंतवून, त्याच फंड घराण्याच्या इक्विटी म्युच्युअल फंडात दैनंदिन, साप्ताहिक अथवा मासिक तत्त्वावर  ‘एसटीपी’ करण्याचा मार्ग अनुसरल्यास, या गुंतवणुकीची जोखीम नक्कीच कमी होईल. विशेषत: सध्या बाजार निर्देशांक शिखराच्या जवळ असताना घसरणीचा धोका टाळण्यासाठी ‘एसटीपी’चा वापर हिताचा ठरेल.

फंड गुरू