वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

* मी ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’ची नियमित वाचक आहे. मला असे कळले की म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे ‘रेग्युलर’ आणि ‘डायरेक्ट’ असे दोन पर्याय आहेत. या दोन पर्यायांमध्ये फरक काय आणि यापैकी कुठला पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य ठरेल? – सीमा कुलकर्णी, हडपसर, पुणे.

– ‘सेबी’ने २०१० मध्ये मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना आपल्या योजना ‘डायरेक्ट’ आणि ‘रेग्युलर’ पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. ‘डायरेक्ट’ म्हणजे मध्यस्थांशिवाय खरेदी करता येऊ शकणाऱ्या योजना आणि रेग्युलर म्हणजे मध्यस्थांमार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या योजना आहेत. म्युच्युअल फंड योजनेच्या गुंतवणुकीचा हेतू, पोर्टफोलिओ वगैरे बाबी दोन्ही प्रकारात सारख्याच असतात. डायरेक्ट प्लानमध्ये वितरकाला दिले जाणारे कमिशन, ट्रेल फी, व्यवहाराचा खर्च आदींचा समावेश नसतो. गुंतवणूकदार मध्यस्थाशिवाय म्युच्युअल फंड घराण्याकडून थेट खरेदी करू शकतो. प्रत्येक योजनेचा मालमत्ता व्यवस्थापनाचा विशिष्ट खर्च असतो. हा खर्च रेग्युलर प्लानसाठी २.५ टक्क्य़ांदरम्यान असतो, तर डायरेक्ट प्लानचा खर्च रेग्युलर प्लानपेक्षा ०.५ ते १.५ टक्के कमी असतो. त्यामुळे एकाच योजनेच्या या दोन्हीपैकी डायरेक्ट प्लानची ‘एनएव्ही’ अधिक असते.

असे समजा की, म्युच्युअल फंडाच्या एखाद्या योजनेत तुम्ही १० लाखाची गुंतवणूक १० वर्षांसाठी केलीत व त्या योजनेचा सर्व व्यवस्थापन खर्च (ळएफ) २.५ टक्के आहे. या योजनेला दहा वर्षांत सरासरी१५ टक्के दराने नफा झाला, तर तुमचा परतावा १२.५ टक्के असेल. १० वर्षांसाठी हा नफा ३२.५० लाख रुपये असेल. समजा याच योजनेच्या डायरेक्ट प्लानचा खर्च १.५ टक्के असेल तर तुमचा नफा ३५.५० लाख रुपये असेल. मालमत्ता व्यवस्थापन खर्चाची कमाल मर्यादा साप्ताहिक सरासरी मालमत्तेच्या २.५ टक्के सेबीने निश्चित केली आहे. फंडाची मालमत्ता जशी वाढते तसा फंडाचा व्यवस्थापन खर्च कमी होतो. एखाद्या २००० कोटी रुपये मालमत्ता असलेल्या योजनेचा खर्च १.८ ते १.९ टक्क्य़ांदरम्यान असतो. यापैकी १.४० टक्के हा विक्री आणि वितरण खर्च असतो. तर ०.४० टक्के हा प्रत्यक्ष व्यवस्थापन खर्च असून सर्वसाधारणपणे एक टक्का विक्रेत्याला कमिशन मिळते. ज्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावा अधिक असावा असे वाटते ते गुंतवणूकदार डायरेक्ट प्लानचा विचार करतात.

फंडात गुंतवणूक करण्यासाठी ‘केवायसी’ करणे, वेळोवेळी फंडाची स्टेटमेंट मिळविणे, इत्यादी गोष्टी ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक करणाऱ्याला स्वत: कराव्या लागतात. एक टक्का अधिक परतावा मिळविण्यासाठी मुद्दल पणाला लावणे योग्य नक्कीच नाही. जोखिमेबाबत सजग व सक्रिय असाल आणि सर्व माहितीने युक्त असाल तर डायरेक्ट फंडाचा नक्की विचार करा.

*  मी वयाची ३३ वर्षे पूर्ण केली. वित्तीय नियोजन करण्याच्या दृष्टीने मी आणि पत्नीने एका ‘सीएफपी’ पात्रताधारक व सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराची भेट घेतली. सल्लागाराने गुंतवणुकीसाठी काही म्युच्युअल फंडाची शिफारस केली आहे. माझ्या गुंतवणुकीत मिड कॅप, लार्ज कॅप, बॅलन्स्ड फंडांचे प्रमाण किती असावे ? – मयुरेश कुलकर्णी, सिंहगड रस्ता, पुणे

– गुंतवणुकीत मिड कॅप, लार्ज कॅप, बॅलन्स्ड फंडांचे प्रमाण किती असावे हे अनेक गोष्टींवर ठरते. पहिली गोष्ट तुमचे वित्तीय ध्येय गाठण्यासाठी शिल्लक असलेला कालावधी, दुसरी गोष्ट तुमची जोखीम निश्चिती (रिस्क प्रोफाइल), जोखीम सहन करण्याची क्षमता (रिस्क कॅपॅसिटी), जोखीम सहिष्णुता (रिस्क टॉलरन्स.) यापैकी काही गोष्टी उपजत असतात तर काही गोष्टींत बदल घडविता येतो. तुमची अन्य कोणत्या गुंतवणूक साधनांत पैसा गुंतविला आहे यावर सुद्धा हे अवलंबून असते.

तुमच्या गुंतवणुकीत मिड कॅप, लार्ज कॅप, बॅलन्स्ड फंडांचे प्रमाण किती असावे, हा प्रश्न विचारताना लिक्विड फंड व शॉर्ट टर्म फंडात किती पैसे असावेत, हे विचारायला कदाचित विसरला असाल.

सर्वप्रथम तुमच्या रोजच्या खर्चाच्या तरतुदीसाठी आवश्यक असलेले पैसे वगळता उर्वरित पैसे तुम्ही लिक्विड फंडात गुंतवावेत. आणीबाणीच्या खर्चासाठी सहा महिन्यांच्या मासिक खर्चाइतके पैसे शॉर्ट टर्म फंडात ठेवणे गरजेचे असते. तुमची वित्तीय ध्येये जर दूरची असतील तर मिड कॅप फंड तुमच्या गुंतवणुकीचा भाग असावेत. तीन ते पाच वर्षांनंतरच्या वित्तीय ध्येयांसाठी लार्ज कॅप फंडांची निवड करावी. तीन ते पाच वर्षांसाठी बॅलन्स्ड फंड चांगले परतावा देतील व एका वर्षांनंतरच्या परंतु तीन वर्षांच्या आतल्या वित्तीय ध्येयांसाठी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम्स तुमच्या गुंतवणुकीचा भाग असावा.

तुमच्या गुंतवणूक सल्लागाराने तुमचे रिस्क प्रोफायलिंग केले असेल. या चाचणीतील तुमचे गुण हा तुमचा ‘रिस्क स्कोअर’ आहे. रिस्क स्कोअरच्या प्रमाणानुसार एक आदर्श पोर्टफोलिओ असतो. या आदर्श पोर्टफोलिओनुसार लिक्विड फंड ते मायक्रो कॅप फंड यांचे प्रमाण ठरत असते. तुमच्या गुंतवणुकीत मिड कॅप, लार्ज कॅप, बॅलन्स्ड फंडांचे प्रमाण तुमच्या रिस्क स्कोअरला साजेसे असावे असेच सांगता येईल.

*  फंड गुरू

आपलेही म्युच्युअल फंडविषयक काही प्रश्न असतील तर, आम्हाला पाठवा: arthmanas@expressindia.com