05 March 2021

News Flash

बँकेत ‘एफडी’, नकोच रे बाबा!

सामान्य भारतीयाची गुंतवणूक म्हणाल तर ती बँकेतील मुदत ठेवी (एफडी) इतपरच सीमित असल्याचे आजही सर्रास जाणवते.

भले आजवर हा तुमच्यासाठी गुंतवणुकीचा सर्वाधिक पसंतीचा, सोयीचा व सुलभ पर्याय राहिला असेल.. पण यापुढे तरी बँकातील मुदत ठेवींबाबतचे तुमचे सगळे भ्रम दूर व्हायलाच हवेत. अन्यथा तुमच्या आर्थिक नियोजनाचा डोलारा कोसळल्याचे दुर्दैवाने तुम्हाला पाहावे लागेल.
सामान्य भारतीयाची गुंतवणूक म्हणाल तर ती बँकेतील मुदत ठेवी (एफडी) इतपरच सीमित असल्याचे आजही सर्रास जाणवते. याला कारणीभूत काही घटकही आहेत. जसे की, बँकेतील ठेवीत गुंतवणूक तुलनेने खूपच सोपी व कुणालाही सहज शक्य असते. शिवाय ठरलेल्या मुदतीनंतर इतकी रक्कम खात्रीने मिळणार हे माहीत असल्याने ही गुंतवणूक सुरक्षितही मानली गेली आहे. ज्या गोष्टी कळायला सोप्या त्या चांगल्या व सुरक्षितही असे बेगडी गृहीतक यामागे आहे. वरवर पाहता यात काही वावगे नाही आणि त्याबाबत नाके मुरडण्याचे काही कारण नाही, असे अनेकांना वाटेलही. पण थोडे बारकाईने व खोलात जाऊन पाहिले तर आपणच आपल्या बचतीची क्रियाशीलता मारून तिला खुजी-कुपोषित बनवत आहोत, हे ध्यानात येईल.
हे कसे? तर सर्वप्रथम पैसा आणि पुंजी म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे. या संकल्पनांचे खरे अर्थ जाणून घेतले पाहिजेत. लौकिकार्थाने पैसा हे केवळ विनिमयाचे माध्यम, ज्यायोगे आपण आपल्या गरजेच्या वस्तू व सेवांचा उपभोग मिळवीत असतो. म्हणजे पुंजी आणि पैशाचा सरळ संबंध आपल्या क्रयशक्ती (खरेदी क्षमतेशी) आहे. म्हणजे जेव्हा आपण आपल्या पैसा-बचतीच्या सुरक्षिततेची गोष्ट करतो, तेव्हा त्याचा अर्थ आपण आपल्या क्रयशक्तीला सुरक्षित करीत आहोत असाच असायला हवा.
जर पैशाची सुरक्षितता ही जर आपल्या क्रयशक्तीची सुरक्षितता असे आपण मानले, तर या सुरक्षेला सर्वात मोठा धोका हा वस्तूंच्या वाढत्या किमतींचा आहे. अर्थात महागाई ही आपल्या पैशाची सर्वात मोठी शत्रू ठरते. त्यामुळे या शत्रूपासून आपल्या पैशाचा/बचतीचा बचाव करावयाचा तर तो योग्य त्या ठिकाणी गुंतविला जायला हवा. जेणेकरून किमतीतील वाढीच्या दरापेक्षा अथवा महागाई दराहून अधिक परतावा आपल्याला मिळविता येईल. हा असा अपेक्षित परतावा येत नसेल तर आपण जमविलेली पुंजी, बचत धोक्यात लोटत आहोत, असेच मग म्हटले जाईल.
ही बाब दोन सोप्या उदाहरणांतून समजून घेऊ या. आजच्या घडीला जर तुमच्याकडे पाच लाख रुपये आहेत आणि कुटुंबासाठी एक कार घेण्याचे तुमचे स्वप्न आहे. परंतु तडकाफडकी काही निर्णय घेण्याऐवजी तुम्ही थोडे थांबण्याचा विचार करता. तोवर जमविलेले पाच लाख बँकेच्या मुदत ठेवीत तीन वर्षांसाठी तुम्ही ठेवता. तीन वर्षांनंतर मुदत ठेवीतील पाच लाखांचे सर्व कर चुकते करून ५.९० लाख रुपये झाले. म्हणजे तीन वर्षांत जवळपास १८ टक्क्य़ांचा परतावा तुम्ही मिळविला. परंतु याच तीन वर्षांत तुम्ही पसंत केलेल्या कारची किंमत मात्र ३० टक्क्य़ांनी वधारल्याचे तुमच्या ध्यानात येते. जी कार तीन वर्षांपूर्वी पाच लाखांमध्ये मिळत होती आणि तुम्ही खरेदीही करू शकत होता, तीच आता ६.५० लाख रुपयांच्या खाली मिळणे अवघड बनले आहे. तुम्ही साठविलेला पैसा गुंतवूनही तो याकामी कमीच सिद्ध पडला आहे. तर मग बँकेतील मुदत ठेवीत तुमचा पैसा सुरक्षित राहिला असे खरेच म्हणता येईल?
दुसरे उदाहरण पाहू या. तुमचे वय ३५ वर्षे आहे आणि दरमहा मिळकत ५०,००० रुपये आहे. महिन्याकाठी घरखर्च म्हणून २५,००० रुपये जातात आणि दरमहा २५,००० रुपये तुम्ही बचत करीत आहात. वर्ष सरत गेले तसे दरसाल तुमच्या मिळकतीत १० टक्के वाढ होत गेली, तर खर्चाची रक्कम ८ टक्के दराने वाढत आली आहे. म्हणून तुम्ही तुमची बचत वार्षिक ८ टक्के दराने परतावा देणाऱ्या ठेवीत गुंतविली. तुमचे कुटुंब विस्तारत गेले. दोन मुले, त्यांचे शिक्षण, भविष्यासाठी तरतूद वगैरे खर्च वाढत गेले. २५ वर्षांच्या सेवेपश्चात तुम्ही निवृत्ती स्वीकारली. तोवर तुम्ही सर्व बचत बँकेच्या मुदत ठेवीतच केली आहे. निवृत्तीपश्चात वयाच्या साठीत तुमचे सर्व उत्तर आयुष्य आजवर केलेल्या या गुंतवणुकीवरच निर्भर आहे. परंतु दुर्दैवाने लक्षात येते की, कमावत्या वयात मुदत ठेवीत गुंतविलेला सर्व पैसा पुढील सात-आठ वर्षांत वय वर्षे ६७-६८ सालातच संपुष्टात आला.
दोन्ही उदाहरणे काही विरळा नाहीत. अनेकांनी व्यावहारिक जीवनात घेतलेला सुज्ञ निर्णय हा प्रत्यक्षात ‘सुरक्षित’ वाटत असला, तरी तो प्रसंगी कसा घात करतो, त्याचा नमुना म्हणून ती केवळ दिली आहेत. बँकेतील मुदत ठेवी या दीर्घ मुदतीच्या आर्थिक नियोजनाचा विचकाच करतात, हाच मथितार्थ यातून सुचवायचा आहे. जर तुमच्या कष्टार्जित पैशाने खरोखरच तुमच्यासाठी मेहनत घेऊन तुम्ही दूरच्या पल्ल्यासाठी निश्चित केलेले ध्येय पूर्ण करणारे फळ द्यावे असे वाटत असेल. तर दीर्घावधीची समभागांतील गुंतवणूक आणि तीही नियत पद्धतीने अर्थात ‘एसआयपी’ धाटणीने म्युच्युअल फंडामार्फत करीत राहणे हाच योग्य पर्याय ठरेल. सुरक्षितता आणि संपत्ती निर्माणाचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
(लेखक हे निर्मल बंग सिक्युरिटीज या गुंतवणूक पेढीचे सल्लागार आहेत)
‘अर्थ वृत्तान्त’संबंधी अभिप्राय/प्रतिक्रिया कळवा:arthmanas@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2015 1:05 am

Web Title: fd in banks say no
Next Stories
1 मध्यमकालीन आरोग्यवर्धक गुंतवणूक
2 संध्याछाया भिवविती हृदया..
3 कर-बोध- व्यावसायिकांसाठी कर मात्रा?
Just Now!
X