News Flash

वळवून अक्षरांना केले तुला शहाणे

अमृताने वयाच्या २५-२६व्या वर्षी शुद्ध विमा घेतलेला नसणे ही वित्तीय गलथानपणाची परिसीमा आहे.

आर्थिक स्वावलंबन मिळविलेला प्रत्येक जण अर्थसाक्षर असतोच असे नाही. एका आईला म्हणून आपल्या एकुलत्या एक लेकीला तिने कमावलेल्या पैशाच्या विनियोगाबाबत सक्षमतेने निर्णय घेता यावेत असे शिक्षण गरजेचे वाटते. येत्या गुरुवारी येणाऱ्या महिला दिनाच्या निमित्ताने एका महिलेने दुसऱ्या महिलेला अर्थसाक्षर करण्याच्या या प्रयत्नाचा वेध..

स्वाती पिंगे या ‘लोकसत्ता’च्या पुण्याच्या वाचक आहेत. स्वाती या राष्ट्रीयीकृत बँकेत साहाय्यक महाव्यवस्थापक असून येत्या एप्रिल महिन्यांत सेवानिवृत्त होतील. त्यांची एकुलती एक मुलगी अमृता पिंगे हिचे डिसेंबर महिन्यांत लग्न झाले. स्वाती यांनी ‘लोकसत्ता’ला ई-मेल लिहिली आहे. त्या लिहितात, ‘माझ्या मुलीला आजपर्यंत अर्थार्जनासाठी सक्षम होण्यासाठी शिक्षण दिले. कमावलेल्या पैशाचा नेमका विनियोग कसा करावा हे शिक्षण आता तिला देण्याची गरज आहे. आमची अमृता एकुलती एक असल्याने एक आई म्हणून मला तिची काळजी वाटत असते. आजची पिढी उत्पन्नाऐवजी खर्चाचे नियोजन करीत असते. लग्नानंतर नव्याचे नऊ  दिवस संपले असून या गोष्टीकडे लक्ष देण्याची हीच योग्य वेळ आहे. अर्थसाक्षरतेचा श्रीगणेशा करण्यासाठी नेमकी सुरुवात कशी करायची ते सांगा.’

आपली मुले वयाने मोठी झाली तरी आपले निर्णय घेण्यास सक्षम झाली असे क्वचितच आई-वडिलांना वाटत असते. ‘वळवून अक्षरांना केले तुला शहाणे, जातो सुखावुनी मी त्या गोड आठवाने’ हे शब्द शंभर टक्के खरे आहेत. मुलगा असो वा मुलगी ‘माझ्या नंतर याचे कसे होणार,’ याची चिंता न वाटणारे आई-वडील खचितच पाहायला मिळतात. याच भावनेतून स्वाती यांनी ही ई-मेल लिहिली आहे. येत्या गुरुवारी असलेल्या महिला दिनाच्या निमित्ताने महिलेने दुसऱ्या महिलेला अर्थसाक्षर करण्याचा हा प्रयत्न विशेष महत्त्वाचा वाटल्याने या ई-मेलची या सदरासाठी निवड केली. अमृता (३२) आणि आशीष (३४) नोकरी निमित्ताने बंगळूरु येथे भाडय़ाच्या घरात राहतात. दोघांच्या पैशाने घर घेणे ही त्यांची प्राथमिकता आहे.

आशीष आणि अमृता यांच्या सध्याच्या वित्तीय स्थितीकडे लक्ष दिल्यास त्यांच्याकडे शुद्ध विम्याऐवजी विमा आणि गुंतवणूक असलेला विमा खरेदी करणे, गुंतवणुकीतील जोखीम पत्करण्याच्या वयात पीपीएफ आणि विम्यासारख्या जोखीम नसलेल्या गुंतवणूक साधनांची निवड करणे या गोष्टी ठळकपणे आढळल्या. या सदरातून कमावण्यास सुरुवात केल्यानंतर एका चांगल्या वित्तीय सल्लागाराची भेट घेऊन वित्तीय नियोजन करण्याचा सल्ला दिला जातो. अमृताने आणि आशीषने वयाच्या २४ व्या वर्षी कमावण्यास सुरुवात करूनसुद्धा त्या त्या वयात उद्भवणाऱ्या आपल्या वित्तीय गरजांसाठी पुरेशी रोकडसुलभता नसल्याने त्यांच्याइतके दुर्दैवी दुसरे कोणी नसेल. केवळ वित्तीय जाणिवा बोथट असलेल्या कुटुंबातून आलेला आशीषच नव्हे तर आई राष्ट्रीयीकृत बँकेत व्यवस्थापक असलेल्या अमृताची परिस्थिती फारशी वेगळी नाही. स्वाती पिंगे बँकेच्या गृहकर्जदाराला मॉर्गेज रिडम्प्शन इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा आग्रह धरतात, परंतु अमृताने वयाच्या २५-२६व्या वर्षी शुद्ध विमा घेतलेला नसणे ही वित्तीय गलथानपणाची परिसीमा आहे. मॉर्गेज रिडम्प्शन इन्शुरन्स पॉलिसी गृहकर्जदाराला सक्तीची आहे म्हणून नव्हे तर ही पॉलिसी खरेदी करण्यात वित्तीय शहाणपण आहे. अमृता आणि आशीष यांनी तातडीने मुदतीचा विमा खरेदी करावा. अमृता यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार त्यांना १.७५ कोटीचे विमा छत्र मिळविता येईल. यासाठी त्यांना वार्षिक १४ हजार ते १६ हजार पर्यंत हप्ता भरावा लागेल. त्यांनी पाच वर्षांपूर्वी इतक्याच मुदतीचा आणि याच विमा छत्राचा विमा खरेदी केला असता तर १२ हजार ते १४ हजारांदरम्यान हप्ता भरावा लागला असता. विमा पॉलिसी कधीही ३० वर्षे वय पूर्ण होण्याआधी खरेदी करणे हिताचे असते. आशीष यांना वार्षिक उत्पन्नानुसार त्यांना १.२५ कोटीचे विमा छत्र मिळविता येईल. कुटुंबाच्या वित्तीय जबाबदाऱ्या पाहता हे विमा छत्र पुरेसे नाही एक वित्तीय नियोजक या नात्याने आशीष यांनी ५० लाखांचा अपघाती विमा खरेदी करणे आवश्यक वाटते.

 

आता अमृता आणि आशीष यांच्या गुंतवणुकीच्या बाबतीतील निरीक्षणे पुढीलप्रमाणे. अनेकदा मुद्दल गमावण्याच्या भीतीने जोखीम टाळली जाते. परिणामी, रोकड सुलभता गमावण्यात होते. वेगवेगळ्या कौटुंबिक पाश्र्वभूमीतून आलेल्या अमृता आणि आशीष यांनी नेमकी हीच चूक केली. तरुणपणात जोखीम स्वीकारून संपत्तीची निर्मिती करायची असते. संपत्तीची निर्मिती करायची तर चांगला सल्लागार असणे आवश्यक असते. अमृता यांच्या तथाकथित गुंतवणुकीवर मिळणारा परतावा ६.२५ टक्के तर आणि आशीष यांनी पूर्ण कालावधीसाठी विमा योजनेचे हप्ते भरले तर त्यांचा परतावा ४.५८ टक्के आहे. जोखीम टाळण्याच्या आणि अति सुरक्षित गुंतवणूक करण्याच्या उद्दिष्टांमुळे या दोघांनी महागाईचा धोका पत्करला आहे. मुद्दल गमावण्याच्या धोक्याइतकाच बचतीचे क्रय मूल्य गमावणे धोक्याचे आहे.

प्रत्येक कमावत्या व्यक्तीचे लिक्विड फंड खातेसुद्धा महत्त्वाचे आहे. जमा झालेला पगार प्रथम लिक्विड फंडात जमा होणे गरजेचे आहे. अमृता आणि आशीष यांनी त्यांच्या वित्तीय सल्लागाराच्या मदतीने लिक्विड फंड खाते आणि व्यवहार करण्यासाठी त्या फंड घराण्याचे अ‍ॅप डाऊनलोड करून गुंतवणुकीला आजच सुरुवात करावी.

संपत्तीनिर्मितीला आपल्या संस्कृतीत महत्त्व दिले आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या क्रमाने पुरुषार्थ सांगितले आहेत. भारतीय हे बचतकर्ते आहेत, पण संपत्तीच्या निर्मितीला महत्त्व देत नाहीत. संपत्तीची निर्मिती हासुद्धा एक पुरुषार्थ आहे. तरुण पिढीने संपत्तीच्या निर्मितीला महत्त्व देणे गरजेचे आहे. संपत्तीनिर्मितीचा विचार करताना या बाबतीत वॉरेन बफे यांच्या एका वाक्याची आठवण येते. बफे म्हणतात, हं’’ Wall Street is the only place that people ride to in a Rolls Royce to get advice from those who take the subway. रोल्स रॉईसमधून प्रवास करणारे यशस्वी  व्यावसायिकही गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मिती करण्याबाबत अनभिज्ञ असतात, असे बफे यांना सूचित करावयाचे आहे.

अमृता आणि आशीष बचतीचा विनियोग करण्यासाठी निवडलेली विमा छत्र आणि लाभ देणारी मनी बॅक पॉलिसी तसेच पीएफ ही साधने या वयात चुकीची आहेत. मागील सात वर्षांचा डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांचा सरासरी परतावा तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडाच्या सात वर्षांचा ‘एसआयपी’ परतावा २९ टक्के आहे. सात वर्षांपूर्वी अमृता आणि आशीष यांनी दरमहा प्रत्येकी पाच हजार रुपयांची एसआयपी म्युच्युअल फंडात केली असती तर दोघांकडे मिळून किमान २० लाखांची रक्कम जमा झाली असती. आज ही रक्कम त्यांना घर घेण्यास नक्कीच उपयोगी पडली असती. बचतीचा सर्वाधिक दर हा अर्थार्जनाला सुरुवात केल्यानंतर असतो, जो या दोघांनी वाया घालविला. तरी त्यांच्या बचतीचे आदर्श नियोजन सोबतच्या तक्त्यात दिले आहे.

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 6:09 am

Web Title: financial independence financial literacy in women
Next Stories
1 फंड जिज्ञासा : म्युच्युअल फंड गुंतवणूक दीर्घावधीसाठीच हवी!
2 फंड विश्लेषण : वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले..  
3 माझा पोर्टफोलियो : गुणवत्तेची जागतिक कीर्तीं
Just Now!
X