20 January 2019

News Flash

अर्थ..मशागत : आर्थिक कक्षा रुंदावणारे वर्ष

तरुण पिढी सिपच्या माध्यमातून गुंतवणूक करून बाजाराकडे वळत आहे.

गुंतवणूकदारांसाठी २०१७ हे एक महत्त्वपूर्ण वर्ष ठरले. या वर्षांत काही उल्लेखनीय सुधारणा शेअर बाजारात घडल्या. देशातील डिमॅट खात्यांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा ओलांडला, तर म्युच्युअल फंड युनिटधारकांच्या संख्येने ५.५ कोटी फोलिओचा आकडा पार केला. म्युच्युअल फंडातील वार्षिक गुंतवणुकीने वीस हजार कोटींचा टप्पा ओलांडला तर ‘सिप’ (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)मधील गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. म्युच्युअल फंड सिपधारकांची फोलिओ संख्या आता १.८० कोटीवर पोहोचली आहे. किरकोळ गुंतवणूकदार बँकेतील मुदत ठेवी आणि सोने किंवा जमीन यांच्यातील गुंतवणूक कमी करून, शेअर बाजारात नवीन कंपनीच्या भागभांडवलाद्वारे (आयपीओ) येत असून, तरुण पिढी सिपच्या माध्यमातून गुंतवणूक करून बाजाराकडे वळत आहे.

‘ई-केवायसी’च्या माध्यमातून तसेच आधार कार्डाचा उपयोग करून शेअर बाजारात गुंतवणूक करणे अधिक सोपे झाले आहे. वर्तमान सरकारचा डिजिटल भारत बनवण्याचा प्रयत्न स्तुत्य असून सर्व गुंतवणुकींसाठी एकच डिमॅट खाते असावे असे सरकारचे मत आहे. त्या दृष्टीने योग्य ती पावले सरकार टाकत आहे. सध्या शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स हे डिमॅट खात्यात एकत्र दिसू शकतात. या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांच्या बँकेमधील मुदत ठेवी, पोष्टामधील गुंतवणुका, विमा पॉलिसी, नॅशनल पेन्शन स्कीममधील ठेवी असे सर्व जर एका खात्यात दिसू लागले तर त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. यासाठी विविध गुंतवणूक पर्यायांसाठी असलेली नियामक मंडळे एकत्र येऊन डिमॅटच्या स्वरूपात ही माहिती देण्यासाठी जेव्हा आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देईल तेव्हा हे शक्य होईल. गुंतवणूकदारांना आपली स्वत:ची गुंतवणूक बघण्यासाठी विविध संकेतस्थळांवर जाऊन वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवून बघण्याची गरज उरणार नाही. आधार कार्डाची माहिती वापरून डिमॅट तसेच ट्रेडिंग खाते उघडण्याची वेळ आता १५ ते २० मिनिटांवर आली आहे.

वर्ष २०१४ च्या बजेटमध्ये सरकारने १) सर्व गुंतवणूक साधनांसाठी एकच केवायसी तसेच २) सर्व गुंतवणूक साधनांसाठी एकच डिमॅट खाते अशी घोषणा केली होती. एफएसडीसी (फायनान्शियल स्टेबिलिटी आणि डेव्हलेपमेंट कौन्सिल) यांना हे काम सोपवण्यात आले होते. या मंडळाने इंटर्नल रेग्युलेटरी टेक्निकल ग्रुप (आयआरटीजी) यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे ज्यायोगे सर्व नियामक मंडळ अशा प्रकारच्या पोषक वातावरणासाठी प्रयत्न करतील. ज्याचा सर्व गुंतवणूकदारांना फायदा होईल. या सुधारणेमुळे होणाऱ्या अनेक फायद्यांपैकी काही ठळक फायदे असे आहेत.

  • खर्चातील बचत : गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या गुंतवणुकीसाठी अनेक खाती उघडण्याची गरज राहणार नाही. यामुळे एएमसी (वार्षिक खाते चालू ठेवायचे मूल्य) यात बचत होईल.
  • एकच ‘केवायसी’ केल्याने सध्या फक्त भांडवली बाजारातील गुंतवणुकीबरोबर इतर गुंतवणुकीसाठी पुन्हा पुन्हा ओळखपत्र देण्याची जरूर राहणार नाही. यामुळे एखाद्याने जागा बदलली तर त्याला फक्त एकाच ठिकाणी नवीन जागेची माहिती दिल्यास आपल्या खात्यात पत्ता बदल करून घेता येईल.
  • मृत्युपश्चात संपत्तीची वाटणी तसेच होणाऱ्या दाव्यांची पूर्तता : गुंतवणूकदाराच्या मृत्युपश्चात त्याच्या विविध ठिकाणी असलेली गुंतवणुकीची माहिती त्याच्या वारसदारांना समजून ती हस्तांतरित करणे सुलभ होईल. जर अशा सर्व गुंतवणुका एकाच डिमॅट खात्यात असतील, तर सध्या विना दावा ज्या गुंतवणुका पडून राहतात त्यांचे प्रमाण खूपच कमी होईल.
  • डिमॅट सेवा पुरवणाऱ्या ३०,०००हून अधिक ठिकाणी, सर्व गुंतवणूक साधनांची माहिती देणे सोपे होईल तसेच नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) सारख्या योजना आम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी डीपींचे विस्तृत जाळे उपयोगी पडू शकेल.
  • सर्व गुंतवणुका डिजिटल स्वरूपात आल्याने कागदविरहित वातावरण असेल. त्या अर्थी कागद स्वरूपात गुंतवणुकांचे धोके -जळणे, फाटणे, चोरी होणे इ. टळतील.
  • बँक मुदत ठेवींवर फक्त स्वत:च्या बँकेतून कर्ज मिळण्याची सोय आहे, वरील सामाईक सुविधेतून इतर बँकांमधूनही कर्ज मिळू शकेल.
  • डिपॉझटरीचा या क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता त्यांना सर्व गुंतवणुका एकाच डिमॅट खात्यात ठेवणे शक्य होणार असून, असे झाल्यास डिमॅट खात्याच्या संख्येतसुद्धा लक्षणीय भर पडेल.

प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात बरेचसे विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारात विक्री करून बाजाराला दक्षिण दिशा दाखवत असत. परंतु या वर्षी त्यांनी सपाटून विक्री करूनसुद्धा शेअर बाजारातील तेजी कमी होताना दिसलेली नाही. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक आता बाजारात तेजी राखण्यासाठी सक्षम आहे असे चित्र दिसू लागले आहे. वर्षभरात लेखामधून किरकोळ गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करत असताना अतिशय चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. या पैकी सुयोग्य सल्लागार काळाची गरज, गरज अर्थसाक्षरतेची, मरणाचे स्मरण असावे, समृद्धीची कास यासारख्या लेखांना बरीच पत्रे लिहून वाचकांनी आपली पसंती कळवली. वाचकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना,  त्यांची गुंतवणूक उद्दिष्टे आणि आर्थिक स्वप्ने पूर्ण होवोत ही सदिच्छा! (समाप्त)

AjitM@cdslindia.com

लेखक सीडीएसएलच्या गुंतवणूक साक्षरता विभागाचे प्रमुख आहेत.

First Published on December 25, 2017 12:35 am

Web Title: financial investment sip investment mutual fund