24 November 2017

News Flash

अर्थसाक्षरता महत्त्वाचीच!

आपल्या लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही संस्थात्मक वित्तीय सेवांच्या परिघाबाहेर आहे.

विजय बालकृष्णन | Updated: August 14, 2017 1:05 AM

(संग्रहित छायाचित्र)

निरोगी व जोखीममुक्त गुंतवणुकीच्या संधीसाठी काय करावे आणि काय करू नये याचे ज्ञान आणि त्यांचे कर्जाचे सापळे आणि बेईमान सावकारांद्वारे निर्दय शोषण होण्यापासून संरक्षण, हे आर्थिक साक्षरता कार्यक्रमांचे पहिले उद्दिष्ट ठरते.

आपल्या लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही संस्थात्मक वित्तीय सेवांच्या परिघाबाहेर आहे. साधे बँकेत खाते जेथे नाही तेथे, वित्तीय सेवांमध्ये त्यांचा सहभाग दूरचाच. आर्थिकदृष्टय़ा वंचित घटकांची आर्थिक साक्षरता हे भारतात परिणामकारक आर्थिक समावेशकतेच्या दृष्टीने पहिले पाऊल ठरेल. एक लघुवित्त बँक प्रामुख्याने याच वंचित आणि परिघाबाहेरच्या क्षेत्राला सेवा पुरवीत असताना, आपल्या या ग्राहकांच्या आर्थिक साक्षरतेवर लक्ष केंद्रित करणे ही तिच्यासाठी प्राथमिक महत्त्वाची बाब असायला हवी.

अल्प उत्पन्न कुटुंबांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम हे त्यांना बचत करणे, आर्थिक जोखीम कमी करणे आणि  वित्तीय निर्णय पूर्ण माहितीनिशी घेणे सोपे करणारे आवश्यक ज्ञान आणि माहिती देणारे साधन असेल. तथापि अपेक्षित परिणामांसाठी तळच्या माणसापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक आहे आणि अशा कार्यक्रमांसाठी मोठा खर्च, त्यात व्यापकता आणि गतिमानता आणणे अवघड आहे, हेही तितकेच खरे.

आर्थिक साक्षरता कार्यक्रम (एफएलपी) किंवा वित्तीय प्रशिक्षण उपक्रम (एफसीपी) हे मुख्यत: कार्यप्रवण उत्तेजन प्रदान करण्याचे उद्दिष्ट राखते, जे इच्छित ग्राहकांमध्ये कायमस्वरूपी बचतीच्या सवयी निर्माण करणे, बचतीचे उत्तम व्यवस्थापन करणे आणि भविष्यात आर्थिकदृष्टय़ा सक्षम नागरिक बनण्यासाठी त्यांना आवश्यक ते शिक्षण देते. अर्थात शिक्षण हे चांगल्या जीवनमानाची पायाभरणी करते.  मात्र आर्थिकदृष्टय़ा सक्रिय परंतु तरीही अभावग्रस्त विभागांमध्ये चांगले आर्थिक शिक्षण हे त्यांच्यात बचतीच्या चांगल्या सवयी विकसित करू शकेल. जेणेकरून, आर्थिक सुरक्षिततेसह घरातील मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळविण्यास हातभार लावला जाईल.

एक विरोधाभास किंवा दुर्दैवी योगायोग म्हणा, परंतु परतफेडीबाबत टाळाटाळीची सर्वात कमी शक्यता असलेल्या असलेल्या ग्राहकांनाच आज सर्वाधिक व्याजदराने कर्जउचल करावी लागत आहे. यामागे औपचारिक आणि परवडणाऱ्या बँकिंग प्रणालीपासून ते कैक योजने दूर असणे हे कारण आहे. बँका आपल्यासाठी नाहीत ही चुकीची धारणा किंवा अशा प्रकारच्या संस्थांमध्ये आपला पैसा ठेवावा हे आजवरच्या आर्थिकदृष्टय़ा भेदभावाच्या गृहीत भावनेने त्यांच्यात निर्माण झालेली अनिच्छाही यामागे आहे. परिणामी ते आपला कष्टार्जित पैसा धोकादायक असंघटित संस्थांकडे ठेवतात. फसव्या चिटफंडांना बळी पडतात. संपूर्ण बचत रातोरात गमावण्याचा जोखीमेत अडकतात.

निरोगी व जोखीममुक्त गुंतवणुकीच्या संधीसाठी काय करावे आणि काय करू नये याचे ज्ञान आणि त्यांचे कर्जाचे सापळे आणि बेईमान सावकारांद्वारे निर्दय शोषण होण्यापासून संरक्षण, हे आर्थिक साक्षरता कार्यक्रमांचे प्रधान उद्दिष्ट ठरते.

भीती, मिथके आणि पूर्वग्रह अशा वर्तणुकीशी संबंधित आणि गहन मानसिक मुद्दय़ांना सर्वप्रथम हाताळले गेले पाहिजे. आजवर परिघाबाहेर राहिलेल्या बऱ्याच ग्राहकांमध्ये आर्थिक संस्था आणि बँकांबद्दल चुकीची धारणा आहे. त्यांना असे वाटते की, श्रीमंत, उच्चभ्रू आणि सुशिक्षित लोकांसाठीच बँका असतात आणि जमा करण्यासाठी मुबलक पैसा नसल्याने त्यांचे बँकेत स्वागत केले जाणार नाही. म्हणूनच अर्थसाक्षरता म्हणजे, त्यांची ही मानसिकता बदलण्याची मोठी संधी असे पाहिले जायला हवे. हा मनोधारणेतील बदल घडवण्याच्या मूलभूत धोरणांपैकी एक म्हणजे धोकादायक, असंघटित क्षेत्रांतून सुकर, सुरक्षित आणि विश्वसनीय संस्थांमध्ये त्यांच्या थोडय़ाथोडक्या बचतीला वळण लावणे. लघुवित्त बँकांच्या (एसएफबी) साहाय्यित बँकिंग आणि सेवांचे मॉडेल यासंबंधाने नेमका उपाय प्रस्तुत करते. बँकेमध्ये अशा ग्राहकांचे सहर्ष स्वागत करतानाच, वित्तीय सेवा आणि उत्पादनांच्या संपूर्ण फायदा मिळविण्यासाठी त्यांना सुशिक्षित व सुसज्ज करणारे हे मॉडेल म्हणजे पहिले पाऊल आहे. बचत खाते, मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवीच केवळ नाहीत तर बायोमेट्रिक एटीएम आणि निधी हस्तांतरण (रेमिटन्स) सेवा कशा वापराव्यात याबद्दलही त्यांना विस्ताराने सांगितले जाते.

औपचारिक शालेय शिक्षण आणि अर्थसाक्षरता यांचा अर्थाअर्थी संबंध नसला तरी, लोकसंख्येच्या मोठय़ा भागात एकंदर साक्षरतेचे प्रमाण निम्न असलेल्या भारतात, अर्थसाक्षरता आणि परिणामाने आर्थिक समावेशकतेला आणखी मोठे महत्त्व प्राप्त होते, हेही खरेच. रिझव्‍‌र्ह बँकेने म्हणूनच ‘प्रोजेक्ट फायनान्शियल लिटरसी’ नावाचा एक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा उद्देश विविध सुशिक्षित-अशिक्षित ग्राहक विभागांमध्ये सामान्य बँकिंगच्या संकल्पनेसंबंधी माहितीचा प्रसार करणे आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक साक्षरता आठवडय़ात, आर्थिक साक्षरता केंद्राद्वारे विशेष शिबीरे आयोजित करणे, बँक शाखांच्या परिसरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी स्थानिक भाषेतून माहितीपर पोस्टर प्रदर्शन करणे; हे संदेश बँकांच्या वेबस्थळांवर प्रदर्शित करणे; ग्रामीण बँक शाखांद्वारे आर्थिक साक्षरता शिबिरांचे आयोजन; आणि आर्थिक साक्षरतेबद्दल रस आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रश्नमंजुषेसारखे जेथे शक्य आहे तेथे आयोजन करण्याच्या सूचना रिझव्‍‌र्ह बँकेकडून देण्यात आल्या होत्या.

सुरक्षितता, विश्वास, प्रवेश सुलभता, सुविधा आणि सहयोग हे असे पाच स्तंभ आहेत जे ग्राहकांमध्ये वित्तीय संस्थांबद्दल सकारात्मक भावना निर्माण करतात आणि या स्तंभांना जोडणारा दुवा म्हणजे आर्थिक साक्षरतेचे वेगवेगळे व सातत्यपूर्ण कार्यक्रम होय.  जर या पाच निकषांभोवती फेर धरणारे कार्यक्रम निरंतर घेतले गेल्यास, ग्राहकांच्या बचतीला अपेक्षित सकारात्मक वळण देणारा दृढविश्वास आणि आस्था निर्माण केली जाऊ  शकते.

आर्थिक साक्षरतेमुळे समाजातील मोठय़ा वंचित विभागास माहितीपूर्ण वित्तीय निर्णय घेता येतील. ही बाब या लोकांना आर्थिक व्यवहार हाताळण्यास सक्षम बनवेल आणि पर्यायाने त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदतकारक ठरेल. इतकेच नव्हे तर एकंदर आर्थिक प्रणालीसाठी आणि अर्थव्यवस्थेच्या कामगिरीलाही यातून महत्त्वपूर्ण योगदान दिले जाईल. ग्राहक ‘आर्थिक साक्षर’ बनला तर तो उद्याचा ‘आर्थिक स्मार्ट’ नागरिक बनेल, हा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक वित्तीय संस्था आणि बँकांनी काम करण्याची आवश्यकता आहे.

विजय बालकृष्णन

(प्रस्तुत लेखक हे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे लेखक मुख्य विपणन अधिकारी आहेत. उज्जीवन ही भारतातील सर्वात मोठी मायक्रोफायनान्स संस्थांपैकी एक होती आणि अलीकडेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवान्यानंतर तिचे स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतर झाले आहे.)

First Published on August 14, 2017 1:05 am

Web Title: financial literacy and its importance
टॅग Financial Literacy