23 October 2018

News Flash

वाटा गुंतवणुकीच्या : मागोवा : आर्थिक नियोजनाचा

बचतवृद्धीचा उपयोग ध्येयपूर्तीच्या गुंतवणुकीसाठी करता येऊ  शकतो.

 

कोणतीही गुंतवणूक ही सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी नसते. प्रत्येक गुंतवणुकीत काही ना काही जोखीम असते. ती कोणती हे जाणून घेतले पाहिजेच, प्रत्यक्षात तुम्ही गुंतवणूक कशासाठी करता आहात, ते उद्दिष्ट सुस्पष्ट हवे. ते ठरविले गेले तर कोणत्या जोखीमीची गुंतवणूक करायची आणि कोणती नाही, हेही ठरते. हे सर्व ठरविणारा आराखडा म्हणजेच आर्थिक नियोजन.. ते सर्वात आधी हवे!

आजवर आपण वेगवेगळी आर्थिक उत्पादने कशा प्रकारे वापरावीत हे पाहिले. त्यामुळे वाचकांकडून आलेले अनेक प्रश्न व शंका यांचे निरसन लेखांमधून करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या सर्वाचा एकसूत्र आढावा आज आपण येथे पाहू.

  • सुरुवातीला, रोकड रकमेशिवाय व्यवहार करण्याचे इतर पर्याय याची माहिती आपण घेतली, जसे डेबिट कार्ड, नेट बँकिंग, पेमेंट वॉलेट इत्यादी. यातून केलेल्या खर्चाचे स्टेटमेंट उपलब्ध असल्यामुळे आपण केलेल्या खर्चाचा आढावा आपण सहज घेऊ शकतो. त्या करवी होणाऱ्या खर्चाचा पाठपुरावा केल्यास बचतवृद्धीही करता येऊ  शकते. या बचतवृद्धीचा उपयोग ध्येयपूर्तीच्या गुंतवणुकीसाठी करता येऊ  शकतो.
  • ‘सी केवायसी’ करणे आवश्यक आहे. तुमचे पुरावे- पॅन कार्ड, निवासाचा दाखला, ई मेल, मोबाइल नंबर ही माहिती केंद्रीय केवायसीमार्फत त्यांच्या डेटाबेसमध्ये सुरक्षित ठेवली जाते. महत्त्वाचे म्हणजे नवीन सी-केवायसी तुम्ही कुठल्याही एका संस्थेमध्ये अद्ययावत केल्यास पुन्हा दुसरीकडे करण्याची गरज नाही. जसे बँकेत जर तुम्ही सी-केवायसी अद्ययावत केल्यास तुमच्या पॅन किंवा आधार कार्डनंबरमार्फत तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणूक संस्थांकडे ती माहिती पोहोचविली जाईल.
  • म्युच्युअल फंडाच्या ‘लिक्विड फंडा’सारख्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करून त्यात गुंतवणूक केल्यास नुसते काही दिवस बँकेत पडून असलेले पैसेसुद्धा थोडा अधिक मोबदला देतील. तसेच ही गुंतवणूक तुम्ही कधीही मोडू शकता व त्यावर काही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. कारण या गुंतवणुकीसाठी ठरावीक अशी मुदत नाही. तसेच गुंतवणूक मोडल्यानंतर लगेचच्या कामकाजाच्या दिवशी जितके दिवस गुंतवणूक होती तेवढय़ा दिवसाच्या वाढीचा लाभासहित ती रक्कम बँकेत जमा होते.
  • मुलांच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद करताना आपल्याला भविष्यात येणाऱ्या खर्चाचा आढावा घेऊन तसेच शैक्षणिक भाववाढीचा दर लक्षात घेऊन मगच योग्य ती गुंतवणूक करणे केव्हाही चांगले. भारतात शैक्षणिक भाववाढ ही खूप अधिक प्रमाणात आहे. तो साधारण १२ ते १५ टक्के इतका आहे. त्यामुळे शैक्षणिक खर्चासाठी लागणारा निधीसुद्धा आजच्या मानाने बराच मोठा असण्याची गरज असेल. अशी गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांमध्येच करायला हवी, जसे इक्विटी म्युच्युअल फंड. यात तुम्ही ‘एसआयपी’द्वारे हळूहळू गुंतवणूक करून मोठा निधी उभा करू शकता.
  • बाजाराचे मूल्यांकन बरेच वाढले असताना गुंतवणूक कशा प्रकारे करावी? तर अशा बाजारभावात ठोक रक्कम दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडामधील लिक्विड फंड किंवा शॉर्ट टर्म फंडामध्ये गुंतवून हळूहळू सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लान (एसटीपी)द्वारे इक्विटी फंडामध्ये गुंतवू शकता. कारण उच्चांक गाठलेल्या बाजारामध्ये मूल्यांकन अजून किती वाढेल किंवा कधी खाली येईल, याचा आपण अंदाज बांधू शकत नाही.
  • केलेल्या अर्थ नियोजनाच्या वेळोवेळी पुनरावलोकन करणे जरुरीचे असते. कारण पगारवाढ, बोनस किंवा भत्तावाढ असे काही झाले असल्यास, या वाढीव मिळकतीचा समावेश चालू असलेल्या आर्थिक नियोजन आराखडय़ात करता येतो. कुटुंबात लग्न, जन्म किंवा मृत्यू यामुळे होणाऱ्या बदलांमुळे कुटुंबातील मिळकत आणि खर्चामध्ये बरेच बदल होतात, आर्थिक ध्येयांमध्ये बदल होतात. अशा बदलांचा समावेश आपल्या आर्थिक नियोजनात करणे अतिशय महत्त्वाचे असते. काही र्वष गुंतवणूक केल्यामुळे स्वानुभवातून आलेले ज्ञान या सर्वामुळे जोखीम घेण्याच्या क्षमतेत बरेच बदल घडून येतात. बदललेल्या जोखीम क्षमतेप्रमाणे आर्थिक नियोजनात गरजेनुसार कमी-जास्त बदल करता येऊ शकतात. बाजारातील चढ-उताराप्रमाणे गुंतवणुकीत झालेल्या नफा किंवा तोटय़ाचा समतोल साधण्यासाठी तसेच शासकीय निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत दरवर्षीच काही ना काही फेरफार करण्यात येतात. त्याप्रमाणे त्याचा समावेश आपल्या आर्थिक नियोजनात करून घ्यायला हवा.
  • ‘क्रेडिट स्कोअर’ चांगला राहण्यासाठी वेळेवर कर्जाचे हप्ते भरा. तुमच्या आर्थिक स्थितीचे अवलोकन करीत राहा. कर्जाच्या हप्त्यावर लक्ष असू द्या. वेळेवर कर्जाची परतफेड करा.
  • या वर्षअखेरीस महत्त्वाचे म्हणजे सर्व गुंतवणुकींमध्ये तसेच बँक खात्यास, मोबाइल क्रमांकास आधार क्रमांक लवकरात लवकर जोडून घेणे.

(समाप्त)

लेखक आर्थिक नियोजनातील सीएफपीपात्रताधारक व सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांचा संपर्क ई-मेल kiran@fingenie.in

First Published on December 25, 2017 12:36 am

Web Title: financial planning financial investment