12 December 2017

News Flash

नवविवाहितांचे अर्थनियोजन आणि म्युच्युअल फंड

योग्य लिक्विड फंडात तात्पुरता ठेवलेला पैसासुद्धा बँकेच्या बचत खात्यापेक्षा अधिक लाभ मिळवून देतो.

व्यापार प्रतिनिधी | Updated: October 2, 2017 1:15 AM

प्रियांका आणि विश्वास हासे

वित्तीय नियोजनासंबंधी प्रश्न विचारणाऱ्या ई-मेल्सचा ओघ ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’कडे सतत सुरू असतो. या आर्थिक नियोजनासाठी ई-मेल्सद्वारे आलेल्या प्रश्नांमधून विश्वास हसे यांचे पत्र उत्तरासाठी निवड करावेसे वाटले. विश्वास हसे लिहितात, ‘‘मी सांगली जिल्ह्य़ातील वाळवा तालुक्यातील असून, माझे २८ वर्षे आहे. माझा मे २०१७ मध्ये विवाह झाला असून पत्नी गृहिणी आहे. माझ्या सध्याच्या अंदाजपत्रकानुसार ३५,००० रुपये दरमहा बचत करू शकतो. ही बचत नेमकी कशी आणि कोणत्या गुंतवणूक साधनांमध्ये करावी याचे मार्गदर्शन करावे.’’

संसाराला नवीन सुरुवात केल्यानंतर लगेचच नियोजनाबाबत विश्वास हसे यांनी आर्थिक नियोजनाबद्दल दाखविलेले गांभीर्य हे नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्याने (म्हणजे ज्या विम्यात गुंतवणूक समाविष्ट नसते असे टर्म इन्शुरन्स) करणे योग्य असते. या प्रकारचा विमाच खऱ्या अर्थाने कमी विमा हप्त्यांमध्ये मोठे विमा संरक्षण देत असतो. विमा विक्रेत्याने शुद्ध विमा खरेदी न करण्याची काहीबाही कारणे सांगितली तरी शुद्ध विमा खरेदी करण्याचा आग्रह सोडू नये. वयाच्या तिशीच्या आत आणि तिशीनंतर खरेदी केलेल्या विमा हप्त्यांमध्ये मोठा फरक पडतो. विमा कंपन्या तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या २० पट विमाछत्र देतात. तुमचे वेतन जसे वाढत जाईल तसे हे विमाछत्र वाढविणे आवश्यक आहे. शुद्ध विम्याच्या बंद झालेल्या पॉलिसीचे नूतनीकरण होत नसल्याने ही पॉलिसी कधीही (तुमच्या वयाच्या साठीपर्यंत)  बंद होणार नाही याची काळजी घ्यावी. शुद्ध विम्याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही विमा उत्पादनाला गुंतवणुकीत थारा देऊ नये.

विमाछत्रानंतर आरोग्य विमा ही वित्तीय नियोजनाची दुसरी पायरी आहे. विश्वास, तुमची सध्याची जीवनराहणी पाहता तुम्हा दोघांना मिळून १० लाख अथवा त्याहून अधिकचे आरोग्य विमाछत्र देणाऱ्या आरोग्य विम्याचे कवच आवश्यक ठरेल. आरोग्य विमा काढला म्हणजे सर्व खर्च विमा कंपनी करते असे नाही. उपचाराच्या एकूण खर्चापैकी साधारण ८० टक्के खर्च विमा कंपनी, तर २० टक्के खर्च विमाधारकाला करावा लागतो हे लक्षात असू द्यावे.

या दोन गोष्टींची पूर्तता केल्यानंतर, तुमच्या भावी जीवनासाठी ठोस वित्तीय ध्येय निश्चित केली जायला हवीत. या वित्तीय ध्येयांची विभागणी नजीकच्या, मध्यम काळातील आणि दूरची अशी विभागणी करावी लागेल.

तुमच्या अंदाजपत्रकानुसार, जीवन विमा आणि आरोग्य विम्यावर खर्च केल्यानंतर, २५,००० रुपये गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे उरणार आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तुम्हाला तुमची वित्तीय ध्येये साध्य करण्यास मदतकारक ठरेल. दरमहा वेतन बँक खात्यात जमा झाल्याबरोबर, तातडीच्या खर्चापुरते पैसै खात्यात शिल्लक ठेऊन, उर्वरित पैसे ‘लिक्विड फंडा’त जमा करण्याची सवय अंगी बाणवणे हितावह ठरेल. ‘लिक्विड फंड’ हे तुमचे आधुनिक युगातील बचत खाते आहे. (याच सदरात ७ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध झालेला ‘लिक्विड फंडा’विषयीचा लेख जरूर वाचावा)  या खात्यातून केव्हाही ५० हजार किंवा एकूण गुंतवणुकीपैकी ९५ टक्के रक्कम काढता येते. अडीअडचाणींना हे पैसे कामाला येतील.

योग्य लिक्विड फंडात तात्पुरता ठेवलेला पैसासुद्धा बँकेच्या बचत खात्यापेक्षा अधिक लाभ मिळवून देतो. आज तुमचे वय २८ वर्षे असून पुढील ३२ वर्षे तुम्ही कमावते राहणार आहात. विश्वास, सध्या तुम्ही खासगी क्षेत्रात नोकरी करीत आहात. साहजिकच सेवानिवृत्तीपश्चात कराव्या लागणाऱ्या निधीची तरतूद तुमची तुम्हालाच करायची आहे. जेव्हा कधी तुमची इच्छा असेल तेव्हा तुमच्या कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन होईल. एक मुलाला पदवीपर्यंत शिकवायला किमान ३०-३५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खर्च येतो. कुटुंबात नवीन सदस्य म्हणजे खर्च यासाठी किमान ५० हजारांची तरतूद केल्यानंतरच पहिले मूल होऊ देण्याचा विचार करावा. विश्वास, पुढील ३२ वर्षांत तुमचे उत्पन्न आणि खर्च दोन्ही वाढत जाणार आहेत. तुमची पत्नी प्रियांका यासुद्धा अर्थार्जन करून संसाराला हातभार लावण्याच्या विचारात आहेत. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधावा लागेल. आज तुमच्या एकूण उत्पन्नाच्या २५ टक्के तुम्ही बचत करीत आहात. वाढत्या कुटुंबाचा खर्चसुद्धा वाढत जाणार आहे. ऋण काढून सण साजरा करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे हिताचे आहे. नजीकच्या वित्तीय ध्येयांसाठी आणि आणीबाणीप्रसंगी लागणाऱ्या तातडीच्या निधीची तरतूद तुम्ही लिक्विड फंडातून करणार आहात.

तुम्ही निश्चित केलेल्या मध्यम तसेच दीर्घ मुदतीच्या वित्तीय ध्येयांच्या पूर्ततेसाठीदेखील म्युच्युअल फंडातील गुंतवणूकच तुम्हाला सहाय्यभूत ठरणार आहे. बचतीची क्रयशक्ती टिकवायची असेल तर महागाईवर मात करणे गरजेचे आहे. तुमच्या बचतीवरील परतावा महागाईपेक्षा अधिक असेल तरच तुम्ही तुमच्या बचतीची क्रयशक्ती टिकवून ठेवू शकाल. मुलांचे शिक्षण इत्यादी मध्यम मुदतीच्या वित्तीय ध्येयांसाठी ‘बॅलन्स्ड फंड’ आणि ‘लार्ज कॅप इक्विटी’ फंडात गुंतवणूक करणे योग्य ठरेल.  १० हजाराची रक्कम मध्यम आणि नजीकच्या काळातील वित्तीय ध्येयांसाठी एक लार्ज कॅप फंड आणि टॅक्स सेव्हर फंडात नियोजनबद्ध पद्धतीने (एसआयपी) गुंतविणे हिताचे आहे. तर दूरच्या उद्दिष्टांसाठी एका बॅलन्स्ड फंडात आणि मिड कॅप फंडात १० हजार रुपये दरमहा नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवावेत. उर्वरित पाच हजार रुपये लिक्विड फंडात तातडीच्या खर्चासाठी ठेवावेत. ही रक्कम वाढत जाऊन लाखभर रूपये झाल्यानंतर, दरमहा गुंतवणुकीसाठी उरणाऱ्या पाच हजारांचा विनियोग कसा करायचा हे नंतर ठरविता येईल.

दूरच्या आर्थिक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे सेवानिवृत्ती पश्चात चरितार्थासाठी आर्थिक तरतूद होय. तुम्ही आज गुंतवणुकीला सुरुवात केलीत तर दरमहा १० हजारांप्रमाणे पुढील ३२ वर्षांत ३८.४० लाख रुपयांची बचत होईल. या ३८.४० लाखांच्या बचतीवर १२ टक्के दराने ४.३२ कोटी रुपयांचा निधी तुम्ही वयाच्या साठीला जमवू शकाल. हा निर्णय दोन वर्षांनी घेतलात तर वयाच्या तिशीनंतर पुढील ३० वर्षे दरमहा १०,००० रुपये बचत केली आणि या बचतीवर वार्षिक १० टक्के परतावा मिळाला तरी ३६ लाखांच्या गुंतवणुकीचे ३.५२ कोटी रुपये होतील. तुम्ही गुंतवणूक ३५ व्या वर्षी सुरू केलीत तर ३० लाखांच्या रकमेवर १.८९ कोटींचा निधी तुम्हाला जमविता येईल. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल तितकी अधिक रक्कम जमवू शकाल. एका बाजूला व्याजदर कमी होत असताना पुढील ३२ वर्षांत १० ते १२ टक्के परतावा फक्त समभाग गुंतवणूकच देऊ शकेल. निश्चित उत्पन्न देणाऱ्या बँक मुदत ठेवी, विमा आणि गुंतवणूक असलेल्या योजनांपासून स्वत:ला दूर ठेवणे हिताचे आहे.

भविष्यात कर वजावटीसाठी नियोजन म्हणून गुंतवणुकीत लार्ज कॅप आणि मिड कॅप यांचे योग्य प्रमाण राखणे गरजेचे असते. लार्ज कॅप गुंतवणुकीला स्थैर्य, तर मिड कॅप वृद्धी देतात. प्रत्येक फंड व्यवस्थापनाची लार्ज कॅप फंडाची वेगवेगळी व्याख्या असते. साधारणपणे १० हजार कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्या लार्ज कॅप गटात मोडतात. या कंपन्या त्या त्या उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या कंपन्या असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी समभाग संशोधन करणे गरजेचे असते. या कंपन्यांबद्दल पुरेशी माहिती असल्याने गुंतवणुकीतील धोक्यांची जाणीव असते. त्यामुळे लार्ज कॅप प्रकारच्या सभागांच्या किमतीत वेगाने चढउतार होत नाहीत. साहजिकच लार्ज कॅप गुंतवणूक असलेल्या म्युच्युअल फंडाची ‘एनएव्ही’ अर्थात प्रति युनिट मूल्य हेसुद्धा वेगाने कमी अधिक होत नाही. मिड कॅप हे उभरत्या कंपन्यांचे समभाग होत. गुंतवणुकीचा वृद्धीदर वाढविण्याचे काम मिड कॅप करतात. या कंपन्या तुलनेने लहान आणि त्यामुळे पुरेसे संशोधन नसलेल्या असल्याने या प्रकारच्या गुंतवणुकीत धोका अधिक असला तरी मिड कॅप गुंतवणुकीवर दीर्घकालीन परतावा अधिक असल्याने गुंतवणुकीपैकी कमी अधिक वाटा मिड कॅप गुंतवणुकीत असायला हवा. तुमच्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार एकूण गुंतवणुकीपैकी किती वाटा मिड कॅप गुंतवणुकीत ठेवायचा हे ठरत असते. तुमची जोखीम क्षमता मध्यम असल्याने तुम्हाला हे प्रमाण सुचविले आहे, भविष्यात हे प्रमाण वाढू शकेल. आर्थिक नियोजनात सातत्य आणि शिस्तीने संपत्तीची निर्मिती करता येऊ  शकेल असा विश्वास बाळगा.

व्यापार प्रतिनिधी arthmanas@expressindia.com

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully

First Published on October 2, 2017 1:15 am

Web Title: financial planning for newly married couple and mutual funds
टॅग Financial Planning