खर्चाचा मोह आवरत, जमा पुंजीतून केलेल्या अनेक निरनिराळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिकाधिक वाढत जाणारी धनवृद्धी शक्य आहे. गुंतवणुकीमागील उद्दिष्टे, गुंतवणुकीचा काळ, जोखीम सोसण्याची क्षमता, सातत्याने ठेवलेले लक्ष, तरलता, सरलता, करविषयक कार्यक्षमता, व्यवहाराविषयी जागरूकता या नुसार उपयुक्त गुंतवणूक पर्याय मात्र निवडला गेला पाहिजे..

भारत देश. बचतीचे अनन्यसाधारण महत्त्व असणारा आपला देश. की जिथे घरोघरी प्रामुख्याने शिकविले जाते की, एक रुपया मिळविला तर त्यातील किमान चार आणे तरी बचत करावयास हवी. पण ती कशी करावी, हे जास्त महत्त्वाचे आहे. कारण आपण पैसे कमावतो, खर्च करतो आणि उरले तर त्याची बचत करतो. चूक येथेच आहे. कारण उत्पन्नातून प्रथम बचत करावयास हवी आणि नंतर खर्च.

दैनंदिन जीवनात अनेक गरजा वा प्रलोभने जमविलेली बचत खर्च करावयास आपणास भाग पाडतात. पण जर बचत करताना उद्दिष्टे निश्चित केली असतील तर आपली बचत विनाकारण खर्च होण्यापासून वाचू शकते. तसेच बचतीचे आणखी दोन महत्त्वाचे नियम म्हणजे, किमान सहज शक्य असणारी रक्कम नियमित बचतीसाठी निश्चित करणे आणि बचत रोख रकमेत न ठेवता त्यातून योग्य गुंतवणूक करणे. कारण जमा पुंजी वाढवायची असेल तर योग्य गुंतवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.

आर्थिक सफलता हवी असेल तर योग्य गुंतवणुकीचे पर्याय निवडणे अत्यावश्यक असतात आणि त्यांची निवड वय, उत्पन्न, बचत, महागाई, खर्च, गुंतवणूक, जोखीम, परतावा अशा विविध महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असते. उद्दिष्टाला समोर ठेवून केलेली बचत ते अभ्यासपूर्वक निवडलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायांपर्यंतच्या प्रवासात उद्दिष्टाला पूर्ण करण्यासाठी दोन घटक अत्यंत महत्त्वाचे असतात.

१. गुंतवणूक भांडवलाची वाढ

२. नियमित मिळणारा परतावा   

गुंतवणुकीचे पर्याय वरील दोन्ही घटकांचा एकत्रित विचार करणारे असावेत. परंतु जर विचारपूर्वक अभ्यासले असता लक्षात येते की, काही पर्याय एकाच घटकाचे नियम पाळणारे असतात. उदा : बँकेच्या मुदत ठेवीत होणारी गुंतवणूक, सरकारी कर्ज रोखे फक्त निश्चित मिळणाऱ्या परताव्याच्या प्रकारात त्यांची गुंतवणूक मोडते, तर समभागांमध्ये नियमित परताव्याबरोबर शेवटी मिळणारी गुंतवणुकीतील वाढही अपेक्षित असते.

गुंतवणुकीचे मूळ प्रकार जर अभ्यासले तर लक्षात येते की, आज अस्तित्वात असणारा गुंतवणुकीचा प्रत्येक पर्याय खालीलपैकी कोणत्या ना कोणत्या मूळ प्रकारात निश्चित मोडतो. अशाच या गुंतवणुकीच्या मूळ प्रकारांची काही ठळक वैशिष्टय़े –

१. निश्चित परतावा मिळवून देणारी गुंतवणूक :

  • गुंतवणुकीतून मिळणारा परतावा निश्चित असतो.
  • गुंतवणुकीतील भांडवलावर कोणताही परिणाम नाही.
  • या पर्यायात गुंतवणूक केल्यास इतर पर्यायांच्या तुलनेने दर्शनीयदृष्टय़ा अत्यंत कमी जोखीम. परंतु महागाई दर वाढत असताना भांडवली वृद्धी न होणे ही या गुंतवणुकीतील एक प्रकारची जोखीमच आहे.
  • बाजारातील चढ-उतारांचा चांगला व वाईट कोणताच परिणाम या गुंतवणुकीवर शक्यतो होत नाही.
  • इतर पर्यायांच्या तुलनेने जोखीम कमी असल्यामुळे निश्चित असला तरी तुलनेने परतावादेखील कमी असतो.

उदा. बँक ठेवी, पोस्टाच्या अल्पबचत योजना.

२. पुन:प्रेरित करणारी गुंतवणूक :

  • आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक व अपेक्षेएवढा परतावा मिळवून देणारा हा गुंतवणुकीचा प्रकार.
  • या प्रकारामध्ये गुंतवणुकीतून मिळणारा परतावा, परत त्याच पर्यायामध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रेरित करतो.
  • अनुकूल परिस्थितीत भांडवल वाढीस मदत होते.
  • एकाच विशिष्ट पर्यायामध्ये गुंतवणूक वाढत गेल्यामुळे विविधतेचा फायदा कमी होतो आणि जोखीम वाढण्यास सुरुवात होते.
  • गुंतवणूक कधीही एकाच साधनांत जास्त प्रमाणात करू नये हा गुंतवणुकीचा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. म्हणून नीट अभ्यासपूर्वक दुसरे पर्याय निवडून त्यात गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होण्यास मदत होते.

उदा. व्यवसायात मिळणारा अधिक परतावा त्याच व्यवसायाच्या भांडवलात अधिक गुंतवणुकीस प्रेरित करतो.

३. स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक :

  • ही गुंतवणूक मुख्यत: दीर्घ मुदतीसाठी असल्याचे आढळून येते.
  • गुंतवणूक मुळातच शक्यतो मोठय़ा रकमेची असते.
  • या पर्यायातील गुंतवणूक तरल नसे. म्हणजे ठरविले तर लगेच त्यातून बाहेर पडणे सहसा शक्य नसते आणि तसे केल्यास शक्यतो नुकसान होते.
  • हा पर्याय जसा अनुकूल परिस्थितीत अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळवून देऊ शकतो तसाच प्रतिकूल परिस्थितीत अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान भोगावयास कारणीभूत ठरू शकतो.
  • जोखीम घटक पाहता खूपच विचारपूर्वक हा पर्याय निवडण्याची आवश्यकता.

उदा : जमीन-जुमला, तंत्रज्ञान

४. उद्दिष्ट-नियोजित गुंतवणूक :

  • फक्त उद्दिष्ट समोर ठेवून त्यांच्या पूर्ततेसाठी ही गुंतवणूक केलेली असते.
  • ही एक नियोजित गुंतवणूक असते.
  • या गुंतवणुकीचे पर्याय निवडताना जोखीम आणि परतावा याचा अभ्यासपूर्वक विचार केलेला असतो.
  • या प्रकारच्या गुंतवणुकीवर सातत्याने लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते म्हणजे ते उद्दिष्ट पूर्ततेच्या दिशेने पुढे जात आहे की नाही याचा मागोवा घेणे शक्य होते.
  • या प्रकारातून गरज असल्यास बाहेर निघणे सहसा अवघड नसते.
  • शक्यतो अपेक्षेप्रमाणे परतावा आणि भांडवलवृद्धी होण्यास मदत होते.
  • उद्दिष्ट-नियोजित गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार एकाच वेळेस विविध प्रकारांमध्ये गुंतवणूक करताना दिसून येतात.
  • यातील पर्याय निवडताना, त्यात परत अनेक विविध प्रकार असल्याचे आढळून येते. कारण प्रत्येक गुंतवणूकदाराच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी विविध प्रकारांची योग्य, नियोजनपूर्वक सांगड घालणे आवश्यक असते.
  • शक्यतो या गुंतवणुकीत परताव्याची आणि त्यावर असणाऱ्या करांची सांगड लक्षात घेऊन अल्पमुदत किंवा दीर्घमुदत गुंतवणूक पर्यायांचा डोळसपणे विचार केलेला दिसून येतो.

उदा : म्युच्युअल फंड 

५. उत्स्फूर्त गुंतवणूक :

  • शक्यतो तात्कालिक उद्दिष्टाला समोर ठेवून हा पर्याय निवडलेला असतो.
  • ही गुंतवणूक शक्यतो अल्प मुदतीचीच असते.
  • खरे तर याला गुंतवणूक न म्हणता, संधीचा फायदा करून घेणे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
  • विचार केल्याप्रमाणे सारेच घटक अनुकूल राहिल्यास यातून अपेक्षेपेक्षाही जास्त परतावा मिळू शकतो.
  • या प्रकारात इतरांच्या तुलनेने जोखीम जास्त असते.
  • सातत्याने या पर्यायातील गुंतवणुकीचा फेरआढावा घेत राहणे आणि निवडलेला पर्याय अपेक्षित कामगिरी करीत नसल्यास त्या योजनेतून लगेच बाहेर पडणे योग्य ठरते.
  • आपली गरज व जोखीम स्वीकारण्याची ताकद लक्षात घेऊनच हा पर्याय निवडणे योग्य.

उदा : अल्पमुदतीची कोणतीही गुंतवणूक उद्दिष्टांचा विचार न करता केली असेल तर ती या प्रकारात मोडते.

खर्चाचा मोह आवरत, जमा पुंजीतून केलेल्या अनेक निरनिराळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिकाधिक वाढत जाणारी धनवृद्धी शक्य आहे. म्हणून गुंतवणुकीमागील उद्दिष्टे, गुंतवणुकीचा काळ, जोखीम सोसण्याची क्षमता, पर्यायात असणारी विविधता, सातत्याने ठेवलेले लक्ष, तरलता, सरलता, करविषयक कार्यक्षमता, व्यवहाराविषयी जागरूकता या नुसार उपयुक्त गुंतवणुकीचे पर्याय निवडायला हवेत. तरीही गुंतवणुकीचे निवडलेले सारेच पर्याय, कायमच चांगले परतावे देत राहतील असे नसते. कारण काळाचे गणित प्रत्येक गुंतवणुकीलाही लागू असतेच की..

arthasanvad@gmail.com