श्रुती (२५) या नुकत्याच कमवायला लागल्या असून जुल २०१५ पासून नोकरीला लागल्या आहेत. त्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत प्रशिक्षणार्थी साहाय्यक व्यवस्थापक असून त्यांना जून महिन्याचा पहिला पगार ६५,७८६ रुपये इतका मिळाला. सध्या त्या हंगामी तत्त्वावर नोकरीस असल्या तरी एका वर्षांनंतर त्या कायम होतील. त्यांचे वडील हे ‘लोकसत्ता’चे वाचक आहेत. आपल्या मुलीचे पहिल्या पगारापासूनच नियोजन व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. श्रुती यांचे नोकरीचे ठिकाण बंगळुरू असल्याने पहिला पगार झाल्यापासून दोन महिने भेटीचा योग येत नव्हता. त्यांच्या कंपनीने भाग घेतलेल्या एका प्रदर्शनासाठी त्या सप्टेंबरला मुंबईत आल्या असताना त्यांनी भेटीसाठी वेळ मागितला. या भेटीत त्यांनी त्यांची जोखीम क्षमता मोजणारी ‘फिनामेट्रिका’ ही चाचणी दिली. या चाचणीत त्यांचा गुणांक ६७ आल्याने त्या जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदार असल्याचे पुढे आले. याच भेटीत त्यांच्याशी त्यांच्या नियोजनासंदर्भात प्राथमिक चर्चा केली. पुन्हा दिवाळीच्या रजेत मुंबईत आल्या असताना हे नियोजन नक्की केले.
श्रुती यांचे वेतन या आíथक वर्षांत ७,०५,००० व पुढील आíथक वर्षांत ८,४५,००० असेल. या वर्षी अंदाजे ४२ हजार, तर पुढील वर्षी ७३ हजार प्राप्तिकर भरावा लागेल. श्रुती या नोकरीच्या पहिल्या वर्षांपासून करपात्र उत्पन्न कक्षेत येत असल्याने कर कार्यक्षम व भांडवली वृद्धी होतील अशा गुंतवणुका असाव्यात व विमा कंपन्यांचे भले करणाऱ्या पारंपरिक व मनीबॅक विमा पॉलिसी घेणे टाळावे, असा सल्ला दिला. श्रुती या वैयक्तिक खर्च वजा जाता मासिक ५० हजार बचत करू शकतात. पारंपरिक विमा उत्पादने ४ .५ टक्क्यांहून अधिक परतावा देत नसल्याने वयाच्या साठाव्या वर्षी एक कोटी जमविण्यासाठी किती बचत करावी लागेल हे दर्शविणारे कोष्टक दिले. या कोष्टकावरून असा निष्कर्ष काढता येतो की, जितक्या लौकर आपल्याला साजेशा कार्यक्षम गुंतवणूक साधनांची निवड करावी तितके आपले वित्तीय ध्येय साधणे सहज शक्य होते. पंचविशीत मासिक ३५००ची बचत करणे सहज शक्य असते हे ध्यानात घेणे जरुरीचे आहे.
प्रत्येक कमावत्या व्यक्तीच्या नियोजनाचा मनोरा मुदतीच्या पायावर उभा असायला हवा हे जाणून व श्रुती यांच्या सध्याच्या उत्पन्नानुसार श्रुती यांना एक कोटीचा मुदतीचा विमाही सहज मिळू शकेल; परंतु स्त्रीच्या विवाहानंतर वैयक्तिक जीवनात बदल होतात. उदाहरणार्थ श्रुती विवाहानंतर स्वदेशात राहणार की परदेशात, विवाहपश्चात बाळंतपणानंतर नोकरी करणार किंवा कसे याचे उत्तर ना वित्तीय नियोजाकाकडे ना श्रुती यांच्याकडे. बहुतांश कंपन्या तीस वर्षांहून अधिक मुदतीचा विमा देत नाहीत. बदलत्या परिस्थितीत श्रुती व त्यांचा जो कोणी पती असेल त्याला त्यांच्या सर्वाधिक वित्तीय जबाबदाऱ्या वय वष्रे ५८ ते ६२ या वयात पार पाडायच्या असतील. या कारणाने ६५ वर्षांपर्यंत विमाछत्र हवे. हे लक्षात घेऊन सध्या पन्नास लाखांचे विमाछत्र घेऊन भविष्यात तिशी ओलांडल्यावर तीन कोटी किंवा त्याहून अधिक विमाछत्र घ्यावे, असा सल्ला दिला. दरम्यानच्या काळात श्रुती यांनी तीस वष्रे मुदतीचा व पन्नास लाख विमाछत्र असलेला विमा खरेदी केला असून त्यासाठी त्यांनी ५८७९ हप्ता दिला आहे.
श्रुती यांचा अजून तीन-चार वष्रे विवाह करण्याचा विचार नाही. अर्थात श्रुती यांच्या आयुष्यातल्या मोठय़ा आíथक घटना उदा. घर घेणे वगैरे अजून तीन-चार वष्रे घडणार नाहीत. म्हणून पुढील तीन वर्षांसाठी श्रुती यांच्या नियोजनाचा भर हा भांडवली वृद्धी व तीन ते चार वर्षांनतर या भांडवली वृद्धींची रोकड सुलभता व त्याच्या जोडीला केलेल्या गुंतवणुकीची कर कार्यक्षमता यावर असायला हवा.
करवजावट पात्र गुंतवणुकीचा विचार झाल्यानंतर उर्वरित वार्षकि चार लाखांच्या गुंतवणुकांसाठी ‘लोकसत्ताकत्रे म्युच्युअल फंडां’च्या यादीतून एक लार्जकॅप व दोन मल्टिकॅप प्रकारचे फंड निवडण्यास मदत केली. ‘फिनामेट्रिका’च्या गुणांकानुसार श्रुती या अधिक जोखीम पत्करून अधिक परतावा मिळविण्याची जिद्द धरणाऱ्या गुंतवणूकदार असल्याने त्यांच्या एकूण गुंतवणुकीपकी ८१ टक्के गुंतवणूक समभागात व १९ टक्के गुंतवणूक रोखे संलग्न गुंतवणूक साधनात केली. योग्य नियोजनामुळे वयाच्या पन्नाशीत आनंदाने मुदतपूर्व सेवानिवृत्ती स्वीकारणारे एका बाजूला व नियत वयोमानानुसार निवृत्त होऊनही बचत समजून ढीगभर पारंपरिक विमा उत्पादनातून गुंतवणूक केल्यामुळे आíथक विवंचनेत असलेली आढळतात. याचे कर वाचविण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार न करता केवळ पारंपरिक विमा उत्पादनांचा केलेला अतिरेक. करबचतीसाठी पीपीएफसारख्या पारंपरिक गुंतवणूक साधनांचा व मुदतीचा विमा, ईएलएसएससारख्या बदलत्या काळाशी सुसंगत गुंतवणूक साधनांचा योग्य समतोल राखणे हा होय.
av-03
कवयित्री शांता शेळके आपल्या एका गीतात म्हणतात,
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला, मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा, स्वप्नीच वेध घ्यावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा
२६ ऑक्टोबर रोजी चंद्रिकेचे व ९ नोव्हेंबर रोजी दापोलीच्या डॉ. वैद्य यांचे नियोजन प्रसिद्ध झाल्यावर याच वयोगटातील अनेकांच्या मेल येत आहेत. जसे जमेल त्यानुसार यापकी निवडक वाचकांचे नियोजन प्रसिद्ध होईल. डॉ. वैद्य यांनी पाठवलेल्या मेलमध्ये त्यांनी ‘‘लेख वाचल्यावर दीर्घ मुदतीत इतकी मोठी पुंजी मी जमा करू शकतो यावर घरच्यांचा विश्वास बसत नव्हता; परंतु आकडेमोड करून पाहिल्यावर हेही घडू शकते हे लक्षात आले’’ असे त्यांनी लिहिले होते.
श्रुती त्यांची गुंतवणूक दसादशे ११ टक्के दराने पुढील ३५ वष्रे वाढली तरी त्या वयाच्या साठाव्या वर्षी ५ कोटी ७५ लाख ते ५ कोटी ५० लाखाचा निवृत्तिकोश सहज जमा करू शकतील असे हे नियोजन आहे. श्रुती या एमबीए असूनदेखील त्यांना हे सुरुवातीला अशक्य वाटले म्हणून मागील पंधरा वर्षांत एसआयपी गुंतवणुकीतून अव्वल परतावा देणाऱ्या फंडांची यादी दाखविली.
दरमहा केवळ १००० गुंतविलेल्या रकमेचे आजचे मूल्य पाहून त्याही अचंबित झाल्या. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाच्या अथवा मुलीच्या आयुष्यात काही कमी पडू नये असे वाटते. तरुण मुले आपल्या व्यापात असतात. म्हणून चंद्रिकेच्या आईप्रमाणे स्वहित जपणाऱ्या विमा विक्रेत्यांना जवळपास फिरकू न देण्याचा कणखरपणा दाखविणे जरुरीचे आहे. वर्षअखेर आयकर वाचविण्याचा सोपा उपाय म्हणजे विमा पॉलिसी खरेदी करतात असे आढळून येते. ४-४.५ टक्के परताव्याचा दर असलेल्या पारंपरिक विमा योजना खरेदी करणे म्हणजे आपल्या सोन्यासारख्या काळात विमा विक्रेत्यांचे भले करणे होय. या पॉलिसी घेणे टाळायलाच हवे. श्रुती यांना दाखविलेली ही वाट स्वप्नातल्या गावाची नसून वास्तवातल्या गावाची आहे. ही वाट दीर्घ चालीची, परंतु स्वप्ने वास्तवात आणणारी आहे. त्यासाठी आईवडिलांनी पारंपरिक विमा उत्पादने टाळून कार्यक्षम गुंतवणुकीचा आग्रह धरायला हवा.
shreeyachebaba@gmail.com