03 August 2020

News Flash

फंड विश्लेषण : कळे तोची अर्थ उरे तो आभास

आदित्य बिर्ला सनलाइफ जेननेक्स फंड हा या बदलाच्या लाभार्थी ठरलेल्या कंपन्यांतून गुंतवणूक करणारा फंड आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

आदित्य बिर्ला सनलाइफ जेननेक्स फंड (रेग्युलर ग्रोथ प्लान)एक दृष्टिक्षेप..

शुक्रवारी मारुती सुझुकी या प्रवासी वाहन निर्मात्या कंपनीने आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. दुसऱ्या तिमाहीत मारुतीची ४.९२ लाख वाहने विकली गेली. मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षी याच कालावधीत मारुतीने १७.६ टक्के अधिक वाहने विकली. फ्लिपकार्टने मागील दिवाळीपेक्षा या दिवाळीत दुप्पट धंदा केला आहे. अ‍ॅमेझॉनची टीव्ही आणि वॉशिंग मशीनची या हंगामात चौपट विक्री झाली आहे. हे आकडे भारतीय अर्थव्यवस्थेचे चालू शतकात संचयाकडून उपभोगाकडे संक्रमण झाल्याची ग्वाही देतात. मागील पिढीने काटकसरीने जीवन व्यतीत केले. त्या पिढीचा पैसे खर्च करण्याकडे कल नव्हता. आज जे कोणी त्यांच्या वयाच्या ऐंशीच्या आसपास आहेत, त्यांनी पैसा अत्यंत काटकसरीने वापरला. जे कोणी पन्नास-साठच्या दरम्यान आहेत त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचे कष्ट पाहिले असल्याने त्यांची ऐपत असूनही पैसे उधळण्याची त्यांची मानसिकता नाही; परंतु तीस-चाळीसदरम्यान वय असलेल्या पिढीला मुख्यत्वे घर आयते मिळाल्याने या पिढीचे पैसे खर्च करण्याचे निकष आधीच्या पिढीपेक्षा खूपच वेगळे आहेत. आजोबांनी पै-पै जोडून घेतलेल्या घराचे वडिलांच्या पिढीत पुनर्निर्माण झाले. सध्याच्या पिढीला घरासाठी पैसे खर्च करावे लागले नाहीत. साहजिकच या पिढीची मानसिकता सारासार विचारापेक्षा खर्च करण्याच्या बाबतीत खरेदीची ऊर्मी (इम्पल्स बाइंग) असल्याचे आढळते. हा बदल होण्यास अनेक सामाजिक कारणे आहेत. वाढते शहरीकरण, संयुक्त कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंबांकडे झालेले संक्रमण, वाढते कौटुंबिक उत्पन्न, कुटुंबातील सदस्यांची संख्या मर्यादित राखण्यावर दिलेला भर इत्यादी कारणांमुळे मागील पिढीला चैनीची वाटणारी वस्तू आजच्या पिढीसाठी आवश्यकता असते. उदाहरणार्थ घडय़ाळाच्या बाबतीत मागील पिढी कार्यात्मक मूल्याला प्राधान्य देणारी तर आजची पिढी नाममुद्रेवर भिस्त राखलेली. मागच्या पिढीने ‘एचएमटी’चे चावीचे घडय़ाळ २०-२५ वर्षे वापरलेले तर नवीन पिढी दर ४-५ वर्षांआड ओमेगा किंवा तत्सम ब्रॅण्डच्या नवीन घडय़ाळाची खरेदी करणारी. नवीन पिढीच्या मानसिकतेमुळे अर्थव्यवस्थेस नक्कीच चालना मिळाली आहे. सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे बिरुद मिळण्यास तरुण पिढीची ही मानसिकता कारण ठरली आहे.

या बदलाला जसे भारतातील सामाजिक संक्रमण जबाबदार आहे तसेच भारतीय माहिती-तंत्रज्ञानातील कंपन्यांनी घेतलेली गरुडभरारी कारणीभूत आहे. माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांत ‘ऑफशोअर असाइन्मेंट’मुळे बंगळूरु, पुणेसारख्या शहरांतून घरटी एक व्यक्ती तात्पुरत्या कारणांनी परदेशवारी करू लागली आहे. अमेरिकेत असलेल्या अशा अभियंते तरुण-तरुणींचे कुटुंबीय (आई-वडील) अमेरिकावारी करून आपल्या पाल्यांचे अमेरिकीपण मिरविते झाले. या कारणांनी देशातील अनेक कुटुंबांत सामाजिक आणि आर्थिक संक्रमण घडले. अमेरिकीपण मिरविणारे पालक मॉल संस्कृती, डॉमिनोज्, रेबॅन यांसारख्या आंतरराष्ट्रीय नाममुद्रांशी परिचित झाले. अमेरिकेत जाण्यापूर्वी किंगफिशरचे चाहते असणारे अमेरिका वारीनंतर ‘कार्ल्सबर्ग’, ‘बडवायझर’, ‘मिलर’ ‘हाइनिकेन’ची चव ‘वीकएंड कल्चर’च्या नावाखाली चाखू लागले. ‘ऑफशोअर’मुळे वर्ष-दोन र्वष अमेरिकेत राहिल्यामुळे, वाण्याच्या दुकानाचे ग्रोसरी शॉप आणि प्रसाधनगृहाची ‘रेस्टरूम’ झाली. अमेरिकीपण मिरविल्याने सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावणाऱ्या बदलामुळे (किंवा अशी भ्रामक समजूत करून घेतल्यामुळे) अर्थव्यवस्थेच्या ढाच्यातसुद्धा बदल होताना दिसत आहेत. सेवा क्षेत्र नव्याने उदयास आले. मागील दहा वर्षांत पुणे शहराची राक्षसी वाढ होण्यास पुण्यातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील काम करणारे तरुण कर्मचारी कारणीभूत आहेत. सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी सेवा आणि उद्योग या अर्थव्यवस्थेच्या तीन घटकांच्या प्रमाणातसुद्धा बदल होत आज सर्वाधिक वाटा सेवा क्षेत्राचा आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनांत सेवा क्षेत्राचा वाटा ५५ टक्क्यांदरम्यान आहे. या बदलांमुळे जसे नवीन उद्योग उदयास आले तसे गुंतवणुकीच्या नव्या संधीसुद्धा उपलब्ध झाल्या.

आदित्य बिर्ला सनलाइफ जेननेक्स फंड हा या बदलाच्या लाभार्थी ठरलेल्या कंपन्यांतून गुंतवणूक करणारा फंड आहे. झी एंटरटेनमेंट, आयनॉक्स लीझर, युनायटेड स्पिरीट्स, एलआयसी हौसिंग फायनान्स, बाटा इंडिया, रिलॅक्सो फुटवेअर आणि नव्याने सूचिबद्ध झालेली प्रताप स्नॅक्स या कंपन्या या बदलाची प्रतीके आहेत. या प्रतीकांचा वेध घेत आदित्य बिर्ला सन लाइफ जेननेक्स फंडाने या कंपन्यांत गुंतवणूक केली आहे. अनिल शहा हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. २९ सप्टेंबर रोजीच्या विवरण पत्रकानुसार फंडाची ६५.८४ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप, २२.६९ टक्के गुंतवणूक मिड कॅप तर ३.४६ टक्के स्मॉल कॅप आणि ८.०१ टक्के गुंतवणूक रोकडसंलग्न आहे. फंडाने गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राथमिकता अनुक्रमे बँका, ग्राहकोपयोगी वस्तू, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या, वाहन आणि वाहनपूरक उद्योग यांना दिली आहे. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, इंडसिंध बँक, आयशर मोटर्स, आयटीसी लिमिटेड या कंपन्यांत आहे. फंडाची पहिली एनएव्ही ५ ऑगस्ट २००५ रोजी जाहीर झाली. या फंडाच्या पहिल्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ला एक लाखाच्या गुंतवणुकीचे २७ ऑक्टोबर २०१७च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ७.६७ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १८.०७ टक्के आहे. या फंडात पहिल्या दिवसासून पाच हजारांच्या नियोजनबद्ध ‘एसआयपी’च्या ७.३५ लाख गुंतवणुकीचे २४.३१ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १८.२८ टक्के आहे.

मागील १० वर्षांत भारतीय ग्राहकांच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याचे निकष पूर्णत: बदललेले आहेत. दोन पिढय़ांतील अंतर वेगाने वाढत आहे. मागील तीस वर्षांपासून सायकलींचे उत्पादन घटत असून तरुणांची पसंती स्वयंचलित दुचाक्यांना मिळाली. पहिली चारचाकी विकत घेण्याचे सरासरी वय १० वर्षांपूर्वीच्या ४०वरून ३२वर आले आहे. नवीन पिढी गरजेपेक्षा समाजातील स्थान उंचावण्यासाठी चारचाकी खरेदी करताना दिसत आहे. स्वयंचलित दुचाक्यांपेक्षा प्रवासी वाहनांचा विक्रीचा वृद्धीदर अधिक आहे. देशातील रेल्वेप्रवाशांची संख्या कमी होऊन विमानप्रवाशांची संख्या दर वर्षी वाढीचे नवीन उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहे. विमा आणि मुदत ठेवींसारख्या पारंपरिक गुंतवणूक साधनांची कास सोडून तरुण पिढी म्युच्युअल फंडासारख्या साधनांकडे वळत असल्याचे दिसून येते. शनिवारच्या ‘लोकसत्ता’च्या अंकातील राज्याचे अल्पबचत संचालनालय बंद करून कर्मचाऱ्यांना अन्य खात्यांत सामावून घेतल्याची बातमी याच बदलाचे द्योतक म्हणावे लागेल. म्युच्युअल फंड, जीवन विमा, सर्वसाधारण विमा यांसारख्या कंपन्यांतून गुंतवणूक करण्याची उपलब्ध वाढलेल्या संधी हेच दर्शवितात. एक गुंतवणूकदार या नात्याने ही बदलती प्रतीके समजणे आवश्यक आहे  की केवळ ‘आमच्या वेळी असे नव्हते’ असे रडगाणे गायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी याला आभासी जग म्हणतील; परंतु मारुती सुझुकी ही आपल्या जपानमधील मातृ कंपनीपेक्षा अधिक संख्येने प्रवासी वाहने बनवीत आहे हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही. हा ‘आभास नसून उद्याच्या संपत्तीनिर्मितीचा मार्ग हा या बदलात दडला आहे हा ‘अर्थ’ समजून घेणे गरजेचे वाटते.

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2017 1:02 am

Web Title: fund analysis aditya birla sun life india gennext fund
टॅग Fund Analysis
Next Stories
1 नवविवाहितांसाठी गुंतवणूक नियोजन
2 माझा पोर्टफोलियो : ‘सर्वासाठी वीज’ धोरणाची उद्दिष्टपूर्ती
3 वाटा गुंतवणुकीच्या : डेट फंडात गुंतवणूक करताना..
Just Now!
X