21 November 2017

News Flash

फंड विश्लेषण : इंडेक्स फंड : जोखीम व परतावा  दराचा उत्तम मेळ

भारतात सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापन असलेले फंड इंडेक्स फंडांपेक्षा अधिक परतावा देतात.

वसंत माधव कुलकर्णी | Updated: May 15, 2017 1:02 AM

जागतिक ख्यातीचे गुंतवणूकदार वॉरेन बफे आणि ‘इंडेक्स फंड’ संकल्पनेचे जनक जॅक बॉगल

बिर्ला सनलाइफ निफ्टी ईटीएफ

भारतात इंडेक्स फंड देत असलेला परतावा पुरेसा नाही. भारतात सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापन असलेले फंड इंडेक्स फंडांपेक्षा अधिक परतावा देतात. बाजारातील परतावा महागाईचा दर अधिक अर्थवृद्धीचा दर इतका मिळत असतो. म्हणजे किमान ७ टक्क्यांनी वाढणारी अर्थव्यवस्था व ५ टक्के महागीचा दर हे गृहीतक निश्चित केले तर इंडेक्स फंड १२ टक्के परतावा देतील व सक्रिय व्यवस्थापन असलेले फंड त्याहून अधिक परतावा देतील.

मागील आठवडय़ात वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हँथवे कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. वॉरेन बफे दरवर्षी आपल्या भागधारकांना एक पत्र लिहितात. ही पत्रे म्हणजे गुंतवणूक विषयावर केलेले चिंतन असते. या वर्षीच्या पत्रात बफे यांनी जॅक बॉगल यांनी गुंतवणूकदार समुदायासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष आभार मानले आहेत. ऐंशीच्या दशकात जॅक बॉगल इंडेक्स फंड ही संकल्पना मांडून लोकप्रिय केली. जॅक बॉगल संस्थापक अध्यक्ष असलेल्या व्हॅनगार्ड समूहाचा एस अ‍ॅण्ड पी ५०० इंडेक्स फंड जगातील सर्वाधिक मालमत्ता असलेला फंड आहे. निष्क्रिय व्यवस्थापन असल्याने निधी व्यवस्थापकाकडून एखादा समभाग निवडण्यात चूक होण्याची शक्यता नसते. साहजिकच व्यवस्थापन शुल्क अन्य सक्रिय व्यवस्थापन असलेल्या फंडांपेक्षा खूपच कमी असते. बफे हे नेहमीच व्यवस्थापकांना मिळणाऱ्या वेतनाचा उल्लेख ‘फॅट सॅलरी’ असा करतात. गलेलठ्ठ वेतन नसल्याने इंडेक्स फंडाचा परतावा अधिक असतो असे बफे यांचे म्हणणे आहे. कमी व्यवस्थापन शुल्क आकारून बॉगल यांनी गुंतवणूकदार समुदायाचे कल्याण केल्याची बफे यांची भावना आहे. गुंतवणूक क्षेत्रातील या दोन पुरुषोत्तमांच्या निमित्ताने भारतातील एका इंडेक्स ईटीएफ फंडाची ही ओळख-

बिर्ला सनलाइफ निफ्टी ईटीएफ हा राष्ट्रीय शेयर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकावर आधारित इंडेक्स फंड आहे. निफ्टी हा लार्ज कॅप निर्देशांक आहे. लार्ज कॅप कंपन्या या गुंतवणूकदार समुदायात चांगली पत असलेल्या कंपन्या असतात. अर्थचक्राच्या गती बदलाचे किंवा निश्चलनीकरणासारख्या आकस्मिक आर्थिक आघात सहन करण्याचे बळ या कंपन्यांच्या अंगीभूत असते. लार्ज कॅप कंपन्या पोटफोलिओला स्थैर्य देतात. २००८ मध्ये झालेल्या घसरणीनंतर जेव्हा बाजार सावरला तेव्हा सर्वात आधी सावरलेल्या लार्ज कॅप कंपन्या होत्या. गुंतवणुकीआधी मूल्यांकन निश्चित करताना आवश्यक असलेली माहिती लार्ज कॅप कंपन्यांच्या बाबतीत प्रदीर्घ कालावधीदरम्यानची उपलब्ध असते. या माहितीच्या आधारे, गुंतवणुकीचा निर्णय घेणे सोयीचे होते. गुंतवणुकीतील धोका व परताव्याचा दर यांचा सर्वात चांगला मेळ लार्ज कॅप गुंतवणुकीत घालता येतो. यासाठी बाजार सार्वकालिक उच्चांकाच्या जवळ असताना फारशी जोखीम घेऊ  न इच्छिणाऱ्या रूढीप्रिय गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप गुंतवणुकीची कास धरण्यासाठी या फंडात आपल्या सल्लागाराच्या मदतीने गुंतवणुकीचा विचार करावा.

बफे यांनी मागील दोन वर्षांपासून इंडेक्स फंडात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेसारख्या बाजारपेठेत इंडेक्स फंडातून मिळालेल्या परताव्याच्या दराने बफे यांना संतुष्ट केले असेल. अमेरिकेत महागाईचा दर २ टक्के असल्यास बाजारातील निर्देशांक उंचावतात. आक्रसलेल्या अर्थव्यवस्थेला २ टक्के महागाई दरसुद्धा उभारी देतो. परंतु भारतात महागाईचा दर भविष्यात ४-६ टक्के दरम्यान राखण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा प्रयत्न असल्याने भारतात इंडेक्स फंड देत असलेला परतावा पुरेसा नाही. भारतात सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापन असलेले फंड इंडेक्स फंडांपेक्षा अधिक परतावा देतात. बाजारातील परतावा महागाईचा दर अधिक अर्थवृद्धीचा दर इतका मिळत असतो. म्हणजे किमान ७ टक्क्यांनी वाढणारी अर्थव्यवस्था व ५ टक्के महागीचा दर हे गृहीतक निश्चित केले तर इंडेक्स फंड १२ टक्के परतावा देतील व सक्रिय व्यवस्थापन असलेले फंड त्याहून अधिक परतावा देतील.

परतावा जितका जास्त तितका गुंतवणुकीतील धोका अधिक हे समजणे गरजेचे आहे. ज्यांना गुंतवणुकीतील धोका कमी हवा आहे व जे मर्यादित परताव्यात संतुष्ट आहेत अशा गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड संकल्पना योग्य ठरेल. ज्यांना अधिक परतावा हवा असून त्यासाठी ज्यांची धोका पत्करण्याची तयारी आहे अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांनी सक्रिय व्यवस्थापन असलेले फंड गुंतवणुकीसाठी निवडणे गरजेचे आहे.

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba @gmail.com

(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

 

 

First Published on May 15, 2017 1:02 am

Web Title: fund analysis birla sun life nifty etf fund