18 February 2019

News Flash

फंड विश्लेषण : वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले..  

उपभोग हा मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. परंतु उपभोग्य वस्तूंची पसंती कायम बदलत असते.

संग्रहित छायाचित्र)

मागील वर्षभरात सर्वसाधारणपणे या फंडाच्या गुंतवणुकीत   ३० ते ३३ समभागांचा समावेश होता. परंतु सध्याच्या पीएनबी घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर फंडाच्या गुंतवणुकीत एकाही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला निधी व्यवस्थापकांनी स्थान दिलेले नाही ही नक्कीच दखल घेण्यायोग्य गोष्ट आहे.

भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने वस्तूंचा उपभोग (कंझम्पशन) ही गोष्ट परदेशी गुंतवणूक अर्थसंस्थासाठी आणि त्यांच्या भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरली आहे. काही फंड घराण्यांच्या म्युच्युअल फंडाच्या योजना ‘उपभोग’ याच संकल्पनेवर आधारित आहेत. कॅनरा रोबेको ‘फोर्स’ फंड हासुद्धा याच संकल्पनेवर आधारित आहे. परंतु या फंडातील गुंतवणुकीसाठी उपभोग ही संकल्पना केवळ ग्राहकोपयोगी वस्तूंपुरती मर्यादित न राहता उपभोगाच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर गुंतवणुकीसाठी करण्यात आला आहे. तरुण वर्ग नवीन घरे घेतो. घर बांधण्यासाठी सिमेंट, पोलाद रंग आणि या वस्तूंच्या बरोबरीने ही घरे घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. या या आणि अशा अनेक उपभोगाच्या संकल्पना या फंडात दिसून येतात.

म्हणूनच फंडाच्या गुंतवणुकीत हिंदुस्थान युनिलिव्हर आहे तसा मल्टीप्लेक्स व्यवसायात असलेला पीव्हीआर आहे. बिस्किटे, चीज यांसारख्या तयार खाद्यपदार्थाचा उत्पादक ब्रिटानिया आहे तसाच पिझ्झा दालनांची साखळी असलेला ज्यूबिलिएंट फूडवर्क्‍ससुद्धा आहे. गृहोपयोगी वस्तूंचा निर्माता व्हर्लपूल आहे तसाच ग्रामीण भागातील वित्तीय सेवा देणारा एल अँड टी फायनान्शियल होल्डिंग्ज आणि महिंद्र अँड महिंद्र फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस या समभागांचाही समावेश आहे.

कॅनरा रोबेको ‘फोर्स’ फंड हा मल्टी सेक्टर फंड आहे. हा फंड फायनान्शियल अपॉर्च्युनिटीज, रिटेल कंझम्पशन आणि एन्टरटेन्मेंट या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणारा फंड असून या उद्योग क्षेत्रांच्या आद्याक्षरांपासून ‘फोर्स’ हा शब्द तयार झाला आहे. हा मल्टी सेक्टर प्रकारचा फंड असल्याने गुंतवणुकीसाठी क्रम ठरलेला आहे. ही गुंतवणूक खाजगी बँका, ग्राहकाभिमुख टिकाऊ  वस्तू, गैर बँकिंग वित्तीय कंपन्या, माध्यमे आणि मनोरंजन, वैयक्तिक वापराच्या वस्तू अशा क्रमाने ठरविली गेली आहे.

कॅनरा रोबेको फोर्स फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, झी एन्टरटेनमेंट, एचडीएफसी, कोटक महिंद्र बँक, इंडसिंध बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसव्‍‌र्ह, आयटीसी, ज्युबिलिएंट फूडवर्क्‍स, ब्रिटानिया, सन टीव्ही या समभागांचा समावेश पहिल्या दहा क्रमांकात आहे. फंडाच्या गुंतवणुकीत असलेले डीसीबी बँकेचे सर्व समभाग मागील महिन्यांत निधी व्यवस्थापकांनी विकून टाकले असून कोणत्याही कंपनीचा नव्याने गुंतवणुकीत समावेश केलेला नाही. मागील वर्षभरात सर्वसाधारणपणे फंडाच्या गुंतवणुकीत ३० ते ३३ समभागांचा समावेश होता. सध्याच्या पीएनबी घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर फंडाच्या गुंतवणुकीत एकाही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला निधी व्यवस्थापकांनी स्थान दिलेले नाही ही नक्कीच दखल घेण्यायोग्य गोष्ट आहे.

कॅनरा रोबेको फोर्स फंड हा फंड वर उल्लेख केलेल्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांत एकूण गुंतवणुकीच्या १०० ते ६५ टक्कय़ांदरम्यान गुंतवणूक करू शकतो. उर्वरित गुंतवणूक अन्य उद्योग क्षेत्रातील समभागांत करण्याची निधी व्यवस्थापकांना मुभा आहे. जानेवारी महिन्याच्या ‘फंड फॅक्टशीट’नुसार, पहिल्या पाच गुंतवणुकांची टक्केवारी ३४.२१ टक्के तर पहिल्या १० गुंतवणुकांची टक्केवारी ५२.८४ टक्के आहे.

कॅनरा रोबेको फोर्स फंडाच्या गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक आर्थिक सेवा क्षेत्र त्याचप्रमाणे वित्तपुरवठा क्षेत्रातील कंपन्यांतून केली गेली आहे.

उपभोग हा मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. परंतु उपभोग्य वस्तूंची पसंती कायम बदलत असते. दर दहा वर्षांला पिढी बदलते तशी पिढीगणिक उपभोगाची संकल्पनासुद्धा बदलत असते. आजची चैन भावी पिढीची गरज असते. २५ वर्षांपूर्वी घरी दुचाकी येणे हा साजरा केला जावा असा सोहळा असे. आज मारुतीच्या ‘अल्टो के १०’ किंवा ‘वॅगन आर’ यांची खरेदी बेदखल झालेली आहे. मारुतीच्या ग्राहकांची पसंती लाभलेल्या मॉडेल्समध्ये वेगाने बदल होत आहेत. कुटुंबाचे वाढते उपभोग्य उत्पन्न (डिस्पोजेबल इन्कम) आणि उपभोग यांच्यात जवळचा संबंध आहे.

वाढत्या उपोभोग्य उत्पन्नामुळे उद्याची खरेदी कर्ज काढून पण आजच करण्याकडे नवीन पिढीची मानसिकता आहे. एकंदर कल उपभोगाला अग्रक्रम देणारा आहे.

काही वर्षांपूर्वी जेव्हा वार्षिक दरडोई उत्पन्न हजार डॉलरच्या आसपास होते, तेव्हा भारतात ‘रोटी- कपडा-मकान’ या गोष्टींना प्राधान्य होते. आज भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न १,८०० डॉलरवर पोहचले असल्याने प्राथमिक गरजा भागविल्यानंतर, मोबाईल, टीव्ही आणि वॉशिंग मशीनची खरेदी होताना दिसत आहे. हाच कल थोडय़ा फार बदलाने पुढील वीस पंचवीस वर्षे टिकून राहिलेला दिसेल. म्हणूनच ग्राहकांची पसंती लाभलेल्या उद्योग क्षेत्रातील ही गुंतवणूक चागला नफा मिळवून देईल याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.

वसंत माधव कुळकर्णी shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on February 26, 2018 6:00 am

Web Title: fund analysis canara robeco force fund