18 February 2019

News Flash

फंड विश्लेषण : एक(च) धागा सुखाचा

फंडाच्या गुंतवणुकीत ७५ टक्के मिड कॅप आणि २५ टक्के लार्ज कॅप धाटणीचे समभाग होते

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडातील कमी होणारे नफ्याचे प्रमाण हा गुंतवणूकदारांच्या आणि विशेषत: ज्यांनी जानेवारी २०१४ दरम्यान या म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीला सुरुवात केली त्यांच्यासाठी आणि एकरकमी गुंतवणूक केल्यांसाठी अधिक चिंतेचा विषय आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडात १ एप्रिल २०१४ पासून एसआयपी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास वार्षिक १०.४५ टक्के दराने नफा झाला आहे. १ एप्रिल २०१५ पासून एसआयपी केलेल्या गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास वार्षिक ८.८२ टक्के दराने नफा झाला आहे. आणि १ एप्रिल २०१६ पासून एसआयपी केलेल्या गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास वार्षिक ८.५० टक्के दराने नफा झाला आहे. गुंतवणुकीवरील मागील नफ्याचा टक्केवारी दर हा भविष्यातील नफ्याची खात्री देत नाही याचा सेबीकडून वारंवार उच्चार करूनही मागील नफ्याच्या टक्केवारीला प्रमाण मानून गुंतवणूकदार फंडाची निवड करीत असतात. चुकीच्या निकषांवर केलेली ही निवड गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घालत असते याचे उत्तम उदाहरण म्हणून या फंडाकडे पाहता येईल. या फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक मृणाल सिंग यांनी फेब्रुवारी २०११ मध्ये या फंडाची सूत्रे स्वीकारली. मृणाल सिंग यांनी ज्या काळात फंडाच्या व्यवस्थापनाची सूत्रे स्वीकारली त्या काळात मिड कॅप धाटणीच्या प्रकारच्या समभागाच्या किमती तत्कालीन स्तंभित अर्थव्यवस्थेमुळे त्यांच्या अंतर्निहित किमतीपेक्षा कमी असल्याने या समभागांचा समावेश या फंडाच्या गुंतवणुकीत केला गेला. ऑक्टोबर २०१३ पासून या किमती वर जाण्यास सुरुवात झाल्याने जानेवारी-फेब्रुवारी २०१४ दरम्यान या फंडाचा समावेश अव्वल परतावा असणाऱ्या फंडात होऊ लागला. या काळात फंडाच्या गुंतवणुकीत ७५ टक्के मिड कॅप आणि २५ टक्के लार्ज कॅप धाटणीचे समभाग होते. मिड कॅप धाटणीच्या समभागांत नफा वसुलीमुळे एप्रिल २०१४ पासून मिड कॅप समभागांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी होत गेले. फेब्रुवारी २०१८च्या ‘फंड फॅक्टशीट’नुसार मिड कॅप समभागांचे प्रमाण १३.७५ टक्के असून लार्ज कॅप समभागांचे प्रमाण ७४.७२ टक्के होते. या फंडाच्या गुंतवणुकीत प्राधान्य दिलेली पहिली तीन उद्योग क्षेत्रे अनुक्रमे माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा आणि बँकिंग आहेत. या तिमाही उद्योगांची सध्याची स्थिती उत्साहवर्धक नाही. म्हणूनच समभागांच्या किमती त्यांच्या अंतर्निहित किमतीपेक्षा कमी असल्याने या उद्योग क्षेत्रातील निवडक समभाग व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट तत्त्वानुसार नव्याने गुंतवणूक करण्यास पात्र आहेत. मिडकॅप ते लार्जकॅप हे संक्रमण होत असताना मृणाल सिंग यांनी व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट तत्त्वाला धक्का लावला नाही. फंडाच्या गुंतवणुकीतील स्मॉल कॅप ते मिड कॅप आणि मिड कॅप ते लार्ज कॅप हे संक्रमण होत असतांना फंडाचा परतावा घसरणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. मूल्यांकानातील ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ला महत्त्व दिले. अनेक फंड व्यवस्थापकांनी स्पर्धेत टिकण्यासाठी मिडकॅप समभागांचा समावेश करत परताव्याच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक गाठला तरी जानेवारीपासून झालेल्या घसरणीत सोने आणि पितळ यांच्यातील फरक बाजाराने अधोरेखित केलाच. मृणाल सिंग यांची गुंतवणूक शैली ‘इन शॉर्ट रन मार्केट इज लाइक व्होटिंग मशीन, बट इन लाँग रन मार्केट इज लाइक वेइंग मशीन’ या बफे यांच्या विधानाचा अनुभव देणारी आहे. फंडाच्या गुंतवणुकीत सवाधिक गुंतवणूक असलेल्या पहिल्या दहा कंपन्या अनुक्रमे, सन फार्मा विप्रो, एचडीएफसी बँक इन्फोसिस, एनटीपीसी, पॉवरग्रीड, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, आयटीसी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आहेत. गुंतवणुकीत ४१ कंपन्यांचा समावेश असून मागील दोन महिन्यांत एकही नवीन कंपनीचा गुंतवणुकीत समावेश झालेला नसून कोणत्याही कंपनीला गुंतवणुकीतून वगळण्यात आलेले नाही. पहिल्या पाच कंपन्यांची एकूण गुंतवणुकीशी टक्केवारी ३२ टक्के, पहिल्या दहा कंपन्यांची एकूण गुंतवणुकीशी टक्केवारी ५३ टक्के आहे. फेब्रुवारी २०१८ च्या ‘फंड फॅक्टशीट’नुसार फंडाची मालमत्ता १६,७९६ कोटी रुपये असून या फंड घराण्याचा सर्वाधिक मालमत्ता असलेला हा फंड आहे.

अन्य फंडाच्या तुलनेत या फंडाची कामगिरी खराब होण्यास मुख्यत्वे आरोग्य निगा क्षेत्रातील गुंतवणूक कारणीभूत आहे. आरोग्य निगा क्षेत्र फंडाच्या गुंतवणुकीतील दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे उद्योग क्षेत्र आहे. औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या किमतीतील घसरणीला आता दोन वर्षे होत आहेत. औषध कंपन्यांच्या नफ्याचे वाढते प्रमाण विविध देशांतील अन्न आणि औषध प्रशासनांच्या लक्षात आले असून नफ्याला कात्री लावण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून ब्रॅण्डेड औषधांपेक्षा जानेरिक औषधांवर भर देण्याचा प्रयत्न अन्न आणि औषध प्रशासानांकडून होत आहे. तर अमेरिकेत औषधे निर्यात करणाऱ्या काही कंपन्यांना अमेरिकेतील औषध प्रशासनाच्या करणे दाखवा नोटीस मिळाल्या होत्या. या आक्षेपांचे निराकरण करून पुन्हा निर्यातील सुरुवात होण्यास दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. बीएसई हेल्थकेअर निर्देशांकाची एका वर्षांत १३.५० टक्के तर दोन वषांत ११.५० टक्के घसरण झाली. पहिल्या पंसतीची दोन उद्योग क्षेत्रांतील कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ होऊन या उद्योग क्षेत्रांतील समभागांच्या किमती नफ्याच्या अपेक्षेने भरारी घेण्यास किमान चार-पाच वर्षांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांच्या एक रकमी मी गुंतवणुकीच्या नफ्याची टक्केवारी अनुक्रमे ६.३१ आणि १२.९५ टक्के आहे. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’च्या पहिल्या यादीपासून समावेश असलेल्या या फंडाच्या भविष्यातील समावेशाबाबतचा निर्णय सर्व संबंधित लवकरच घेतील. या फंडाला अव्वल फंडाच्या यादीत पुनरागमन करण्यास किमान पाच ते सात वर्षे बाजारातील अनिश्चिततेमुळे कदाचित अधिक काळ लागण्याची शक्यता आहे. महिन्यातून अनेक मुदतबंद योजना बाजारात आणणाऱ्या या फंड घराण्याचे हे मुदतबंद धागे गुंतवणूकदरांना दु:खच देत असल्याचे दिसते. (जिज्ञासूंनी या फंडांची कामगिरी तपासावी) या कमकुवत धाग्यामुळे फंड घराण्यांचे कापड विरावायास लागले आहे. या फंड घराण्याच्या भविष्यातील मुदतबंद फंडांचा गुंतवणुकीसाठी विचारसुद्धा करू नये. फंडातील पाच ते सात वर्षांसाठी केलेली एसआयपी गुंतवणूक सुखाची असेल असे वाटते. अती दूरची वित्तीय उद्दिष्टे असणाऱ्या गुंतवणूकदरांनी आपल्या सल्लागाराच्या सल्ल्यानुसार आणि आपल्या जोखीमांकनाला (रिस्क प्रोफाईल) साजेसा असल्यास या फंडात गुंतवणुकीचा विचार करावा.

वसंत माधव कुळकर्णी shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on April 9, 2018 1:02 am

Web Title: fund analysis complete track record of icici prudential value discovery fund