16 February 2019

News Flash

फंड विश्लेषण : सुहास्य तुझे मनास मोही!

डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड हा मल्टी कॅप प्रकारात मोडणारा फंड आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड

डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड हा मल्टी कॅप प्रकारात मोडणारा फंड आहे. जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत ‘स्मॉल अ‍ॅण्ड मिड कॅप’ प्रकारात मोडणाऱ्या फंडांचा स्वप्नवत परतावा आहे. या फंडांनी मागील तीन वर्षांत वार्षिक २० ते २५ टक्क्यांदरम्यान परतावा दिला असल्याने, मागील परतावा पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या गुंतवणूकदरांना मिड कॅप फंडाचा मोह पडणे स्वाभाविक आहे.

जानेवारी-मार्चदरम्यान बाजारात झालेल्या घसरणीत सर्वाधिक घसरण स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारात झाली. म्युच्युअल फंडांचे प्रमाणीकरण ‘सेबी’च्या आदेशानुसार १ एप्रिलपासून लागू झाले. बाजार भांडवलानुसार पहिले १०० समभागांत गुंतवणूक असणारी योजना लार्ज कॅप, अनुक्रमे १०१ ते २५० मिड कॅप त्याचप्रमाणे २५१ ते ५०० ही स्मॉल कॅप प्रकारची योजना गणली जाईल.

डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंडात सुरुवातीपासून ५००० रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या १०.७५ लाखांच्या गुंतवणुकीचे ११ एप्रिलच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार ८८.१३ लाख रुपये झाले आहेत. या फंडाच्या पहिल्या एनएव्हीच्या दिवशी १ लाख एकरकमी गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकीचे १७ वर्षे ११ महिन्यांत २१.८३ लाख रुपये झाले आहेत. या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे अपूर्व शहा यांच्याकडून रोहित सिंघानिया यांच्याकडे १ जून २०१५ पासून आली. रोहित सिंघानिया या फंडासोबत डीएसपी ब्लॅकरॉक टॅक्स सेव्हर फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत ७५ ते ७८ समभाग असल्याने हा फंड परताव्यापेक्षा समभाग गुंतवणूक विकेंद्रित करून जोखीम कमी करणारा फंड आहे. मार्च महिन्यात फंडाने इंडियन हॉटेल्स, पंजाब नॅशनल बँक, अदानी पोर्ट्स, सिंटेक्स प्लास्टिक्स टेक्नोलॉजी हे समभाग वगळून कॅडिला हेल्थकेअर, बाजारात नव्याने नोंदणी झालेला आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आरबीएल बँक, प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्स या कंपन्यांचा समावेश केला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, रोख रक्कम, टाटा स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीज, डिव्हीज लॅब, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि बँक ऑफ बडोदा या आघाडीच्या दहा गुंतवणुका आहेत. फंडाने गुंतवणुकीत खासगी बँका, वाहननिर्मिती आणि वाहननिर्मितीसाठीची पूरक उत्पादने, तेल आणि वायू, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या, टिकाऊ  ग्राहकोपयोगी उत्पादने या उद्योगक्षेत्रांना प्राधान्य दिले आहे. ‘निफ्टी ५०० टोटल रिटर्न इंडेक्स’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक असून फंडाची दीर्घकालीन कामगिरी संदर्भ निर्देशाकांच्या तुलनेत नेहमीच उजवी राहिली आहे.

फंडाची गुंतवणुकीसाठी शिफारस करताना फंडाच्या दीर्घकालीन कामगिरीची नेहमीच दाखल घेतली जाते. दीर्घकालीन कामगिरीचे मूल्यमापन करताना फंडाचे कामगिरीतील सातत्य हा एक महत्त्वाचा निकष मानण्यात येतो. जानेवारी-मार्च २०१४ दरम्यान एक मिड कॅप आणि एक लार्ज कॅप फंड अचानक ‘क्रिसिल रॅकिंग’च्या ‘टॉप क्वारटाइल’मध्ये आले. या दोन फंडाची जानेवारी-मार्च २०१७ च्या ‘क्रिसिल रॅकिंग’मध्ये ‘थर्ड क्वारटाइल’मध्ये घसरण झाल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षांपासून एक तिमाहीवगळता डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड आपले अव्वल स्थान ‘क्रिसिल रॅकिंग’च्या ‘टॉप क्वारटाइल’मध्ये अबाधित राखून आहे. फंडाच्या प्रमाणीकरण आणि वर्गीकरणानंतर ‘पॉइंट टू पॉइंट रिटर्न’वर अवलंबून निर्णय घेणे फोल ठरले आहे. ‘पॉइंट टू पॉइंट रिटर्न’पेक्षा परताव्याचे सातत्य राखणाऱ्या फंडाला गुंतवणुकीसाठी निवड करताना प्राधान्य देणे कधीही हिताचे ठरेल. याच निकषावर दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टांसाठी या फंडाची निवड करावी.

वसंत माधव कुळकर्णी shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on April 16, 2018 5:04 am

Web Title: fund analysis dsp blackrock equity opportunities fund