एल अ‍ॅण्ड टी इंडिया प्रुडन्स फंड

जूराष्ट्रपतींनी देशाला उद्देशून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केलेले भाषण व पंतप्रधानांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा रोख पाहता विद्यमान सरकारच्या उर्वरित दोन वर्षांच्या काळात आर्थिक धोरणांत मोठे बदल होतील असे वाटत नाही. निश्चलनीकरणाला नऊ  महिने पूर्ण झाले तर वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीचा दुसरा महिना सुरूआहे. ऑक्टोबर महिन्यांत सुरू होणाऱ्या तिमाही निकालांच्या हंगामावर या दोन्ही घटनांचे सावट आहे. काही कंपन्यांसाठी सकारात्मक तर काही कंपन्यांच्या उत्सर्जनावर नकारात्मक परिणाम दर्शविणारे हे असल्याने निकालांचा कल नक्की कसा असेल हे सांगणे कठीण आहे. दरम्यानच्या काळात जसे की अंशत: वातानुकूलित हॉटेलातील भागातसुद्धा वस्तू आणि सेवा कर १८ टक्के आकाराणे किंवा आलिशान वाहनांच्या कररचनेत बदल होणे यासारखे बदल आणखी काही काळ होत राहतील. परिणामी बाजारात नजीकच्या काळात वेगाचे चढ-उतार अनुभवायला मिळतील. मात्र थोडय़ा लांबचा अर्थात दोन ते तीन वर्षांच्या कालखंडाचा विचार केल्यास प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होऊन कर संकलनाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी (टॅक्स टू जीडीपी रेशो) प्रमाणात वाढ होईल. ही वाढ सरकारला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरणे शक्य होईल. अशा परिस्थितीत देशाच्या विकासाशी सुसंगत गुंतवणूक धोरण असलेल्या फंडाची निवड करणे योग्य ठरेल. एल अ‍ॅण्ड टी इंडिया प्रुडन्स फंड हा बॅलंस्ड फंड गटात ३१ जुलैच्या मालमत्तेनुसार सहाव्या क्रमांकावर, १८ ऑगस्ट २०१७च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ५ वर्षांच्या परताव्याच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर ३ वर्षांच्या परताव्याच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आणू १ वर्षांच्या परताव्याच्या तुलनेनुसार पाचव्या क्रमांकावर आहे. नियोजनबद्ध गुंतवणुकीवर (एसआयपी) मिळालेल्या परताव्याची तुलना केल्यास हा फंड ५ वर्षे ६ वर्षे आणि ७ वर्षे कालावधीत पहिल्या तीन क्रमांकांत असलेला फंड आहे. या फंडाला ‘मॉर्निग स्टार’ने रेटिंग दिलेले नाही. रेटिंगला अवास्तव महत्त्व देणारे विक्रेते आणि पोथीनिष्ठ सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार यांचा फंडाला रेटिंग नसणे हाच ‘प्रॉब्लेम’ आहे.


हा एकूण मालमत्तेच्या ६५ ते ७५ टक्के दरम्यान समभाग आणि २५ ते ३५ टक्के रोखे गुंतवणूक करणारा फंड आहे. मालमत्ता विभागणीच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे, समभागांच्या किमती वाढल्यामुळे समभाग गुंतवणुकीचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा अधिक होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी सक्तीने नफा वसुली करून रोख्यात नवीन गुंतवणूक करून समभाग व रोखे यांचे गुणोत्तर निर्धारित मर्यादेत आणले जाते. समभाग गुंतवणूक वृद्धी तर रोखे गुंतवणुकीमुळे पोर्टफोलिओला स्थैर्य मिळते. समभाग गुंतवणुकीसाठी निवड ‘बॉट्म्स अप’ पद्धतीने होते. समभाग निवडीला विशिष्ट बाजारमूल्य किंवा उद्योगक्षेत्राच्या मर्यादा नाहीत. रोखे गुंतवणुकीसाठी भांडवली सुरक्षितता हा एकच निकष वापरला जातो. सरकारी रोख्यांच्या व्यतिरिक्त उच्च पत असलेले अल्प मुदतीचे रोखे (मनी मार्केट इन्स्ट्रमेंट्स) कंपन्यांचे रोखे, यांच्यात गुंतवणूक केली जाते. रोखे गुंतवणूक करताना महागाईचा दर, वित्तीय तूट, अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर, औद्योगिक उत्पादन वाढीचा दर, जागतिक परिस्थितीवर परिणाम करणारे अन्य घटक यांचा विचार करून गुंतवणूक केलेल्या रोख्यांची मुदत किती असावी याचा निर्णय घेतला जातो.

फंडाच्या गुंतवणुकीत बँका, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या, वाहन व पूरक उत्पादने, पायाभूत सुविधा व अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तू या क्षेत्रांना प्राधान्य दिले आहे. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो या पाच सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. रोखे गुंतवणुकीत आघाडीच्या पाच गुंतवणुका १० ते १५ वर्षे मुदतीचे केंद्र सरकारचे रोखे आहेत. ताज्या घडामोडीत फंडाने आदित्य बिर्ला नुव्हो आणि माइंड ट्री या कंपन्या विकून टाकून, हीरो मोटोकॉर्प, हिंदुस्थान झिंक, लक्ष्मी मशीन वर्क्‍स, अ‍ॅक्सिस बँक, आदित्य बिर्ला फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस यांचा समावेश केला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत समभागाची निवड व प्रमाण निर्धारित करणारी एक पद्धती निश्चित केली गेली आहे. कंपन्यांच्या मूलभूत संशोधनाअंती निकषांत बसणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक केली जाते. मालमत्ता विभाजनाच्या नियमाच्या कठोर पालनामुळे समभाग गुंतवणुकीत बाजार खाली येण्याचा धोका नियंत्रणात ठेवलेला आहे. दीर्घकालीन वित्तीय ध्येयांची पूर्तता करण्यासाठी हा फंड आदर्श गुंतवणूक साधन आहे.

या फंडाची सिस्टेमॅटिक विथड्रॉवल – एसडब्ल्यूपी पद्धती वापरून परतावा कामगिरी सोबतच्या कोष्टकात दिली आहे. हा फंड मासिक लाभांश जाहीर करणारा फंड आहे. जून २०१४ मध्ये या फंडात १० लाख गुंतवून मासिक लाभांश पर्याय स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदाराला जुलै २०१७ पर्यंत २.५८ लाख करमुक्त लाभांश मिळाला असून १० लाखांच्या गुंतवणुकीचे मूल्य १६.२३ लाख रुपये झाले आहे. लाभांशाची टक्केवारी ७.५१ टक्के असून या व्यवहारात परताव्याचा दर १७.८१ टक्के आहे. हा फंड अव्वल परतावा देणारा फंड ठरला, कारण या फंडाचे व्यवस्थापन सोमेंद्रनाथ लाहिरी यांच्यासारख्या कुशल निधी व्यवस्थापकाकडे आहे. एल अ‍ॅण्ड टी या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी व वरिष्ठ निधी व्यवस्थापक असलेल्या लाहिरी या अत्यंत मोजके बोलणाऱ्या निधी व्यवस्थापकास त्यांच्या फंडाबद्दल बोलते करण्यास कष्ट घ्यावे लागतात. पंचवीस वर्षांहून अधिक काळ निधी व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या लाहिरी यांनी कॅनरा रोबेको आणि डीएसपी ब्लॅकरॉक या म्युच्युअल फंडांत निधी व्यवस्थापक म्हणून काम केले आहे.


या फंडाला मॉर्निग स्टारने रेटिंग दिलेले नसले तरी व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइनने आणि फंड्स इंडियाने या फंडाला ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग दिले आहे. अनेकदा गुंतवणूकदार रेटिंग नसलेल्या फंडात गुंतवणूक करायला तयार नसतात. एका फाइव्ह स्टार रेटिंग असलेल्या आणि एल अ‍ॅण्ड टी इंडिया प्रुडन्स फंड या दोन बॅलंस्ड फंडात एकाच दिवशी ठरावीक रक्कम गुंतविली तर परतावा कसा मिळाला असता याची तुलना सोबतच्या कोष्टकात दिली आहे. ती पाहता या रेटिंग नसलेल्या फंडात गुंतवणूक करण्यास प्रॉब्लेम असावा किंवा नसावा याचे उत्तर मिळते. संपत्ती निर्मिती करणाऱ्या पण रेटिंग नसलेल्या फंडात गुंतवणूक करण्यास कोणास ‘प्रॉब्लेम’ असण्याचे कारण नसावे. फंडाचा परतावा सुळक्यासारखा न राहता परताव्याच्या दरात सातत्य असणे महत्त्वाचे..

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com