23 November 2017

News Flash

फंड विश्लेषण : पायी घागऱ्या करिती रुणझुण..

फंडाची मालमत्ता २०० कोटींच्या आत असली तरी या फंडाने मागील एका वर्षांत २८ टक्के

वसंत माधव कुलकर्णी | Updated: September 4, 2017 1:03 AM

एलआयसी एमएफ मिडकॅप फंड

एलआयसी एमएफ मिडकॅप फंड

म्युच्युअल फंड विक्रेते फंडांच्या वैशिष्टय़ांबाबत आपापली मते बाळगून असते. यापैकी एक वैशिष्टय़ फंडांचा मालमत्ता आकार हा अनेकांच्या आक्षेपाचा विषय असतो. आकाराने लहान असणाऱ्या फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यास त्यामुळे अनेक जण कचरतात. फंडाबद्दल पुरेसे संशोधन केले तर लहान फंडसुद्धा त्या त्या फंड गटाच्या सरासरीपेक्षा जास्त परतावा देतात, असे दिसून येते. फंडाच्या ‘एनएव्ही’तील चढ-उतार फंडाची जोखीम अधोरेखित करीत असतात. या सदराचा उद्देश संशोधनाअंती गुंतवणूकयोग्य फंडाची वाचकांना ओळख करू देणे इतपतच मर्यादित आहे. या स्तंभातून वर्षभरापूर्वी आयडीएफसी क्लासिक इक्विटी या फंडाची ज्या वेळेला शिफारस केली तेव्हा हा फंड ९० कोटींची मालमत्ता असलेला फंड होता. वर्षभरात १४०० कोटीची मालमत्ता पार केलेला फंड झाला आहे. फंडाचा अव्वल परतावा हे मालमत्ता वाढीस करण ठरले. हा फंड सध्या अव्वल परतावा असलेला लार्जकॅप फंड समजला जातो.

एलआयसी मिडकॅप या फंडाची मालमत्ता २०० कोटींच्या आत असली तरी या फंडाने मागील एका वर्षांत २८ टक्के परतावा दिलेला आहे. या फंडाची सर्वप्रथम शिफारस या फंडाच्या ‘एनएफओ’ सुरू असताना, वेळी ९ फेब्रुवारी २०१५ रोजी केली होती. या शिफारसीमुळे जर कोणी ‘एनएफओ’मध्ये  या फंडात १ लाख रुपये गुंतविले असतील तर ३१ ऑगस्ट २०१७ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.३८ लाख झाले असून परताव्याचा दर १३.५६ टक्के आहे. याच दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारी २०१५ रोजी एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटी या फंडात गुंतवणूक केली असती तर परताव्याचा वार्षिक दर १४.२३ टक्के, एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंडात गुंतवणूक केली असती तर १३.२२ टक्के, आणि एल अ‍ॅण्ड टी मिडकॅप फंडात गुंतवणूक केली असती तर २०.२२ टक्के परतावा मिळाला असता. यूटीआय मिडकॅप फंडात गुंतवणूक केली असती तर ११.२५ टक्के परतावा मिळाला असता. फंडाच्या पहिल्या दिवसापासून या फंडात १,००० रुपयांची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ३१,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे ३१ ऑगस्ट २०१७च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ४०,७६७ रुपये झाले आहेत. परताव्याचा हा दर २३.०४ टक्के आहे. मिडकॅप फंड गटातील २४ फंडाच्या तुलनेत एसआयपी गुंतवणुकीवरील या फंडाचा परतावा ५व्या क्रमांकावर आहे. ‘निफ्टी फ्री फ्लोट मिडकॅप १००’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक असून एका वर्षांच्या परताव्याच्या चलत सरासरीने ९८ टक्के वेळा संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परतावा मिळविलेला आहे.

ज्या वेळी या फंडाची पहिल्यांदा शिफारस केली त्या वेळी या फंडाची सूत्रे तत्कालीन एलआयसी नोमुराचे मुख्य गुंतवणूक अधिकारी नोबुटका किटीजीमा यांच्याकडे होती. नोमुराने एलआयसीला दिलेल्या सोडचिठ्ठीनंतर सचिन रेळेकर हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. मागील एका वर्षांत सुधारलेली फंडाची कामगिरी ही एका मिडकॅप निधी व्यवस्थापकाकडून जशी कामगिरी अपेक्षित असते तशी असल्याने या फंडाची पुन्हा शिफारस करावीशी वाटली. हा फंड मिडकॅप प्रकारात मोडणारा फंड असल्याने या फंडाचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या ५ ते ८ टक्क्यांपेक्षा अधिक नसावे. या फंडाला तीन वर्षांची परंपरा नसल्याने या फंडाचे रेटिंग उपलब्ध नाही. ज्या गुंतवणूकदारांची मध्यम जोखीम स्वीकारून दीर्घकालीन ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्तीची निर्मिती करण्याची इच्छा आहे अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक उमदा पर्याय आहे.

मागील काळात अनुभवलेला सातत्याच्या अभावाचे निराकरण करण्यासाठी फंडाच्या गुंतवणुकीत लार्जकॅप समभागांचा समावेश करण्यात आला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत ४०.८३ टक्के लार्जकॅप समभाग असल्याने फंडाच्या एनएव्हीत वेगाने होणारे चढ-उतार कमी होण्यास मदत होण्यासोबत निधी व्यवस्थापकास रोकड सुलभता साधण्यासही मदत होणार आहे. फंडाच्या गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक असलेले पहिले दहा समभाग अनुक्रमे यूपीएल, सिटी युनियन बँक, अरविंदो फार्मा, मदरसन सुमी, टाटा केमिकल्स, इंटरग्लोब एव्हिएशन, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, विनाती ऑरगॅनिक्स आणि पेट्रोनेट एलएनजी हे आहेत. गुंतवणुकीसाठी फंडाने सर्वाधिक प्राथमिकता रसायन निर्मिती, आरोग्य निगा, वाहन आणि पूरक उत्पादने आणि खासगी बँका अशा उद्योगक्षेत्रांना या क्रमानेच दिली आहे. गुंतवणुकीत चौथ्या क्रमांकावर रोकड सुलभ गुंतवणुका असणे आणि पाचव्या क्रमांकावरील बँकिंग समभाग हे या फंडाचे वैशिष्टय़ आहे.

पोथीपंडित गुंतवणूक सल्लागार फंडाच्या मालमत्तेने ठरावीक कोटींचा आकडा गाठल्याशिवाय फंडाची शिफारस करीत नाहीत. सुरुवातीच्या परिच्छेदात तुलनेसाठी उल्लेख केलेले फंड १००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता असलेले आहेत. यावरून फंडाची मालमत्ता (फंडाचा आकार) आणि फंडाचा परतावा यांचा परस्परसंबंध नसतो. एखादा आकाराने मोठा फंड कारकीर्दीच्या एखाद्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी करीत असतो. फंडाचा आकार लहान किंवा अधिक यापेक्षा फंडाची जोखीम नियंत्रण पद्धती किती कार्यक्षम आहे हे महत्त्वाचे असते. जोखीम स्वीकारून परतावा मिळविणारा फंड चांगला की जोखीम टाळणारा आणि परतावा कमी असलेला फंड चांगला हे गुंतवणूकदाराच्या जोखीम क्षमतेवर ठरते. फंडातील जोखीम मोजण्याच्या तंत्राविषयी या पुरवणीत स्वतंत्र लेख प्रसिद्ध झाला आहे. एलआयसी एमएफ मिडकॅप फंडाचे मागील २४ महिन्यांच्या मासिक परताव्याचे प्रमाणित विचलन २० ते ३० टक्के दरम्यान आहे. फंडाचा शार्प रेशो गुंतवणूकदाराच्या बाजूने आहे. शार्प रेशो जितका अधिक तितका चांगला, कारण निधी व्यवस्थापक जी जोखीम स्वीकारतो त्या जोखमीच्या बदल्यात गुंतवणूकदाराला परतावा देत असतो. परताव्यात सातत्याचा अभाव हा या फंडाचा दोष आहे. फेब्रुवारी २०१६ पासून फंडाच्या परताव्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. २८ फेब्रुवारी २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत या फंडाने ४५ टक्के परतावा दाखविला तर आधीच्या एका वर्षांत २५ फेब्रुवारी २०१५ ते २४ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत फंडाच्या एनएव्हीत १६.५६ टक्के घट झाली. गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी हा दोष गुंतवणूकदारांनी लक्षात घेतल्यास अपेक्षाभंगाचे दु:ख वाटय़ाला येणार नाही. या दोषाचे निवारण करण्यासाठी निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीत मिडकॅपची मात्रा कमी करून लार्जकॅपचे प्रमाण वाढविले आहे. लार्जकॅपचे प्रमाण वाढवत वृद्धी आणि मूल्य यांचा समतोल साधल्यामुळे फंडाच्या एनएव्हीतील चढ-उतार कमी होतील. परंतु एकूण गुंतवणुकीत मिड कॅपची मात्रा कमी कमी झाल्यामुळे फंडाचा परतावा कमी होईल. लार्जकॅपमुळे फंडाचा परतावा कमी झाला तरी परताव्यात सातत्य राहील. या फंडाला अवघी ३० महिन्यांची पूर्वपीठिका आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण खरी ठरविण्याची क्षमता असलेला हा फंड आहे. बाळाच्या पायातील घातलेल्या पैंजणाचा नाद ऐकू येऊ  लागला आहे. हा नाद दीर्घ मुदतीच्या एसआयपीसाठी हा फंड उमदा उमेदवार आहे असे ध्वनित करतो. आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मतानुसार या फंडाचा आपल्या गुंतवणुकीत समावेश करण्याचा निर्णय घ्यावा.

एलआयसी एमएफ मिडकॅप फंड

(रेग्युलर प्लान)

एक दृष्टिक्षेप..

* फंडाची पहिली एनएव्ही :  १६ फेब्रुवारी २०१५

*  सध्याची एनएव्ही  (१ सप्टेंबर २०१७)

वृद्धी पर्याय       :   १४.०० रुपये

लाभांश पर्याय   :    १३.९९ रुपये

*  फंड प्रकार : मिड कॅप फंड

*  संदर्भ निर्देशांक : निफ्टी फ्री फ्लोट मिड कॅप १००

*  किमान एसआयपी : १००० रुपये

*  किमान गुंतवणूक  : ५००० रुपये

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on September 4, 2017 1:03 am

Web Title: fund analysis lic mf midcap fund
टॅग LIC MF Midcap Fund