20 November 2017

News Flash

फंड विश्लेषण : फंडाची गुंतवणूक किती कंपन्यांत नेमकी असावी?

अ‍ॅक्सिस फोकस्ड २५ फंडाची पहिली एनएव्ही २९ जून २०१२ या दिवशी जाहीर झाली.

वसंत माधव कुलकर्णी | Updated: July 10, 2017 1:03 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एल अँड टी इक्विटी सेव्हिंगज फंड

पुढील दोन ते तीन वर्षे उज्ज्वल भवितव्य असलेल्या उद्योगातील नेमक्या २५ कंपन्या निवडून त्या कंपन्यांच्या समभागांत गुंतवणूक करणारा हा फंड. गुंतवणूक समभाग केंद्रित असल्याने एकूण गुंतवणुकीच्या सरासरी ५ ते ५.५० टक्के रक्कम प्रत्येक कंपनीत गुंतविली जाते. सध्यासारखी अर्थव्यवस्था उभारीला असताना, एखादी कंपनी निवडताना चूक होण्याची शक्यता कमी असते. मार्च महिन्यांत एकूण मालमत्ता १००० कोटींच्या पल्याड जाणे हेही चांगल्या परताव्याच्या अपेक्षेच्या दृष्टीने या फंडाची जमेची बाजू ठरावी..

जून २०१७ मध्ये संपलेल्या दुसऱ्या सहामाहीत जगाच्या अर्थव्यवस्थेचा वार्षिक वृद्धी दर ३.१५ ते ३.२५ राहण्याची शक्यता अर्थसंस्था वर्तवित आहेत. याच कालावधीत मागील वर्षी जगाची अर्थव्यवस्था ३ टक्क्यांपेक्षा कमी दराने वाढत होती. मागील सहा महिन्यांत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा दिसून आली. म्हणूनच अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने १४ जून २०१७च्या बैठकीत व्याजदरात पाव टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. विश्लेषकांना डिसेंबर २०१७ पर्यंत तरी अमेरिकेच्या व्याजदरात बदल होण्याची शक्यता वाटत नाही. ‘जी-८’ राष्ट्रांपैकी एक असलेल्या जपानच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर २०१२ पासून शून्यापेक्षा अधिक असण्याला सुरुवात झाली. या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत वृद्धी दर २.५ टक्के या १० वर्षांच्या उच्चांकावर राहिला. या वाढीला प्रामुख्याने २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलम्पिकच्या तयारीचा भाग असलेल्या पायाभूत सुविधांची विकासात्मक कामे कारणीभूत असल्याचे आढळते. युरोपमध्ये बेरोजगारीचा दर कमी होऊन कारखान्यातील उत्पादन सुधारण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम जानेवारी २०१७ पासून विकसित अर्थव्यवस्था २ टक्के दराने, तर विकसनशील अर्थव्यवस्थांच्या वाढीचा दर ४.५ टक्के राहिला आहे. जगाच्या क्रमवारीत आकारमानानुसार ६व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यामुळे पुन्हा ७-७.१५ टक्क्यांचा वृद्धी दर गाठेल.

चालू हंगामात आजपर्यंतचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक झाल्याने कृषी उत्पादनाबाबत काळजी करावी असे कारण दिसत नाही. सततच्या दोन हंगामात झालेल्या चांगल्या पाऊसपाण्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना यश मिळेल अशी परिस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर एकंदर अर्थव्यवस्थेच्या वाढीव वृद्धी दराचा फायदा होणाऱ्या उद्योगक्षेत्रातील २५ कंपन्या निवडून त्यात गुंतवणूक करणाऱ्या ‘अ‍ॅक्सिस फोकस्ड २५ फंडा’ची ही शिफारस.

अ‍ॅक्सिस फोकस्ड २५ फंडाची पहिली एनएव्ही २९ जून २०१२ या दिवशी जाहीर झाली. फंडाच्या पहिल्या एनएव्हीनुसार १ लाख गुंतविलेल्या गुंतवणूकदारांचे ४ जुलैच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार २,३०,८०० रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १८.४४ टक्के आहे. ४ जुलैच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार या फंडाचा मागील एका वर्षांचा परताव्याचा दर २६ टक्के, दोन वर्षांचा १२.५६ टक्के, तीन वर्षांचा १५.२३ टक्के आहे. फंडाच्या पहिल्या दिवसापासून दरमहा ५००० रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक (एसआयपी) करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या ३,०५,००० रुपयांचे ४ जुलैच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार  ४,८०,६४६ झाले असून परताव्याचा दर वार्षिक १८.३४ टक्के आहे. परताव्याचा दर समाधानकारक असूनही फोकस्ड फंड या फंड गटात या फंडाच्या परताव्यापेक्षा अधिक परतावा देणारे फंड उपलब्ध आहेत.

फोकस्ड फंडात गुंतवणूक समभाग केंद्रित असल्याने एकूण गुंतवणुकीच्या सरासरी ५ ते ५.५० टक्के रक्कम प्रत्येक कंपनीत गुंतविली जाते. एका बाजूला अनुप भास्कर यांच्यासारखा निधी व्यवस्थापक एकावेळी ८० -९० कंपन्यांच्या गुंतवणुकीतून परतावा देतो तितकाच परतावा (काही वेळेला त्यापेक्षा कमी) परतावा या फोकस्ड फंडांनी दिला आहे. मजेशीर गोष्ट अशी की, अनुप भास्कर यांच्यासारखा निष्णात मुख्य गुंतवणूक अधिकारी असलेल्या फंड व्यवस्थापनाला ‘फोकस्ड फंड’ या फंड संकल्पनेचा मोह जडला. अनेक फंड व्यवस्थापकांची जेव्हा गाठभेट होते तेव्हा तेव्हा ‘तुमच्या फंडात किती कंपन्या असाव्यात,’ हा प्रश्न त्यांना आवर्जून विचारीत असतो. त्यावर फंड व्यवस्थापक – ‘फंडाच्या रचनेनुसार कंपन्या असाव्यात’ असे उत्तर देतात. हुजैफा हुसेन हे पाइनब्रिज इंडिया इक्विटी स्कीमचे निधी व्यवस्थापक असताना त्यांच्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडात ३०-३५ कंपन्या असत. या प्रश्नाला त्यांनी जे उत्तर दिले ते गुंतवणूकदारांना नक्कीच विचार करायला लावणारे आहे. ते म्हणाले – ‘‘गुंतवणूक आणि मालकी यात फरक असा की एक शेअरहोल्डर म्हणून तुम्ही स्वत:ला कंपनीचे मालक समजता तेव्हा अनेक लहान लहान गोष्टींकडे लक्ष देता व जेव्हा गुंतवणूकदार असता तेव्हा तुमच्यासाठी परतावा महत्त्वाचा असतो (कंपनीचे कर्मचारीविषयक धोरण, व्यवसाय करण्याची पद्धत इत्यादी). यासाठी मी कमी कंपन्यांच्या समभागांत पैसा गुंतवून त्या कंपन्या समजावून घेण्यासाठी अधिक वेळ देईन.’’ फोकस्ड फंड आणि डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडात हाच फरक आहे.

अ‍ॅक्सिस फोकस्ड २५ फंड व्यवस्थापक हे अर्थव्यवस्थेच्या विद्यमान स्थितीत भविष्यातील दोन ते तीन वर्षे उज्ज्वल भवितव्य असलेल्या उद्योगातील पंचवीस नेमक्या कंपन्या निवडून त्या कंपन्यांच्या समभागांत गुंतवणूक करतात. अर्थव्यवस्था उभारीला असताना एखादी कंपनी निवडताना चूक होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे फंड मालमत्ता १,००० ते ३,००० कोटी रुपये असताना फोकस्ड फंड चांगला परतावा देतात असे दिसून आले आहे. मार्च महिन्यांत या फंडाची मालमत्ता १००० कोटींच्या पल्याड गेली. जगाच्या महत्त्वाच्या अर्थव्यवस्था गती पकडत असताना या फंडात गुंतवणूक करण्याचा धोका नैसर्गिकपणे कमी झाला आहे. जे गुंतवणूकदार ३ ते ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छितात. अशा गुंतवणूकदारांसाठी ही शिफारस.

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com

First Published on July 10, 2017 1:03 am

Web Title: fund analysis lt equity savings fund