मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंड

मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंडाला उद्या (मंगळवारी) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. ४ एप्रिल २००८ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झालेल्या या फंडात नियोजनबद्ध ‘एसआयपी’ गुंतवणूक केलेल्यांना या फंडाने भरभरून परतावा देत संपत्तीची निर्मिती केली आहे. या फंडात मागील दहा वर्षे दरमहा ५ हजारांची नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या ६ लाखांचे २८ मार्च २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १५.३१ लाख रुपये झाले असून परताव्याचा दर १७.९२ टक्के आहे. पहिल्या एनएव्हीला केलेल्या १ लाखाच्या गुंतवणुकीचे २८ मार्च २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ४.४३ लाख रुपये झाले आहेत. दहापैकी ७ वर्षे या फंडाला ‘व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन’ने ‘फोर स्टार’ तर ‘मॉर्निगस्टार इंडिया’ने ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग दिले आहे. मिरॅ अ‍ॅसेट इंडिया अपॉच्र्युनिटी फंडाचे १ मार्च २०१८ नंतर ‘मिरॅ असेट इंडिया इक्विटी फंड’ असे नामांतर झाले आहे. लार्ज कॅप ओरिएंटेड डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड गटात हा फंड दमदार कामगिरीमुळे पाच आणि तीन वर्षे ‘एसआयपी’ परताव्याच्या यादीत आपले अव्वल स्थान क्रिसिल रँकिंगमध्ये अबाधित राखून आहे. या फंडाचा संदर्भ निर्देशांक ‘बीएसई २००’ असून ४० पैकी ३७ तिमाहीत या फंडाची कामगिरी संदर्भ निर्देशांकाहून अव्वल राहिली आहे.

अन्य फंडांच्या तुलनेत मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंडाच्या ‘एनएव्ही’तील चढ-उतार कमी असल्याने डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड गटाच्या सरासरी शार्प रेशोपेक्षा मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंडाचा शार्प रेशो मोठा आहे. गोपाल अग्रवाल यांच्यानंतर या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा नीलेश सुराणा यांच्याकडे आली. सध्या या फंडाच्या व्यवस्थापनात हर्षद बोरावके हे नीलेश सुराणा यांना साहाय्य करीत आहेत. ‘एस अ‍ॅण्ड पी बीएसई २००’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. निधी व्यवस्थापकांनी फंडाच्या गुंतवणुकीत खासगी बँका, वाहन आणि वाहन पूरक उत्पादने, माहिती तंत्रज्ञान, तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी उत्पादने या उद्योगक्षेत्रांना प्राधान्य दिले असून एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, ग्रासिम, कोटक महिंद्र बँक हे फंडाची सर्वाधिक गुंतवणूक असलेले दहा समभाग आहेत. मागील वर्षभरात फंडाच्या गुंतवणुकीत ५३ ते ५८ कंपन्यांचा समावेश असल्याचे दिसून येते. पहिल्या पाच कंपन्यांतील गुंतवणुकीचे एकूण गुंतवणुकीशी प्रमाण २५ टक्क्यांदरम्यान, पहिल्या १० कंपन्यांतील गुंतवणुकीचे एकूण गुंतवणुकीशी प्रमाण ४५ टक्क्यांदरम्यान आणि पहिल्या १५ कंपन्यांतील गुंतवणुकीचे एकूण गुंतवणूकीशी प्रमाण ५५ टक्क्यांदरम्यान राखलेले दिसून येते.

या फंडाला एक वर्ष पूर्ण झाल्यापासून या फंडाने सातत्याने लाभांश जाहीर केलेला आहे. भांडवली वृद्धीसोबत लाभांश जाहीर करण्यात सातत्य राखल्याने या फंडाचा समावेश संशोधनावर आधारित गुंतवणूक शिफारस करणाऱ्या मिंट ५० सारख्या यादीत झाला आहे. मिंट ५० आणि अनेक बँकांच्या अधिकृत शिफारसप्राप्त याद्यांत मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंडाने साधारण २०१२ मध्ये स्थान मिळविले.

या फंडाला पाच-सात वर्षे पूर्ण झालेली असूनही जेव्हा जेव्हा या फंडाची शिफारस केली तेव्हा तेव्हा फंडाची आजपर्यंतची कामगिरी समाधानकारक होती, याबद्दल शंका नाही. परंतु हा फंड भविष्यात अशीच कामगिरी करेल काय, असा प्रश्न विचारण्यात येतो. फंड घराण्याच्या स्थापनेपासून मुख्य गुंतवणूक अधिकारी राहिलेले गोपाल अग्रवाल हे दोन वर्षांपूर्वी फंड घराणे सोडून गेल्यावरसुद्धा फंडाच्या भविष्यातील वाटचालीबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. ४२ फंड घराण्यांमध्ये मिरॅ अ‍ॅसेट आणि एल अ‍ॅण्ड टी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या दोन फंड घराण्यांची पत एचडीएफसी आणि आयसीआयसीआयसारख्या मोठय़ा फंड घराण्यापेक्षा वरची आहे. फंडांची संख्या मर्यादित राखण्यासोबत जवळजवळ सर्वच फंडांना ‘क्रिसिल रॅकिंग’च्या ‘टॉप क्वारटाईल’मध्ये स्थान आहे. मागील दहा वर्षे सोन्यासारखा परतावा देणाऱ्या या फंडाचा समावेश गुंतवणुकीत करावयास हवा.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)