रिलायन्स मनी मॅनेजर फंड

फंडात केवळ ५०० रुपये गुंतवून सुरुवात करता येते. गुंतविलेले पैसे वर्षांच्या ३६५ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी काढून घेता येतात. म्युच्युअल फंडाची अ‍ॅप, फंड घराण्यांची संकेतस्थळे किंवा विक्रेत्यांची संकेतस्थळे या ठिकाणी ‘इन्स्टंट रिडम्पशन’ ही सुविधा उपलब्ध आहे. पैसे काढून घेण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पुढील ५-७ मिनिटांत पैसे बँक खात्यात जमा होतात. हे सारे किती रंजक आणि सुगम आहे. यासाठी तरी गुंतवणूकदारांनी लिक्विड फंड आजमावून पाहावा. आखूड शिंगी, बहुगुणी अशी ही गुंतवणूक असून, म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा किमान ५-१० टक्के भाग तीमध्ये असायला हवा.

म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेने एप्रिल अखेरीस १९ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या मालमत्तेत ३३ टक्के मालमत्ता लिक्विड, लिक्विड प्लस, शॉर्ट टर्म फंड व अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड प्रकारात मोडणारी आहे. म्युच्युअल फंड मालमत्तेच्या ३३ टक्के व्याप्ती असलेले हे फंड वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत का आढळत नाहीत, या प्रश्नाचे उत्तर कट्टाप्पाने बाहुबलीला का मारले, या प्रश्नाच्या उत्तराइतकेच गूढ आहे. सुंदरम म्युच्युअल फंडाच्या गौरी पवार किंवा एलआयसी म्युच्युअल फंडाचे हरीश पोवार ही मंडळी लिक्विड फंड गुंतवणुकीतील बिनीचे शिलेदार आहेत. वर्षभरात लिक्विड फंडासाठी १ लाख कोटी गोळा करणारी ही मंडळी आपल्या फंड घराण्यांचे लिक्विड फंड विकत असतात. त्यांच्या स्वत:च्या गुंतवणुकीत लिक्विड फंड सोडाच परंतु अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड व शॉर्ट टर्म फंडसुद्धा नसतील. ‘दिव्याखाली अंधार’ या उक्तीची अनुभूती देणारी ही गोष्ट आहे.

सेबीचे नवनियुक्त अध्यक्ष अजय त्यागी यांनी नेमकी हीच गोष्ट हेरली आहे. त्यागी यांनी म्युच्युअल फंडांच्या प्रतिनिधींची बैठक २५ एप्रिल रोजी बोलाविली होती. या बैठकीत जे काही निर्णय झाले त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे ५० हजार किंवा खात्यात जमा असलेल्या बाजारमूल्याच्या ९० टक्के रक्कम त्वरित काढून घेण्याची सुविधा लिक्विड फंडांना लागू करण्यास सेबीने मान्यता दिली आहे. हा निर्णय होण्याआधी रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंड व डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड या फंड घराण्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. ‘इन्स्टंट रिडम्पशन’ ही सुविधा उपलब्ध करून देणारा रिलायन्स मनी मॅनेजर फंड हा भारतातला पहिला फंड आहे. या फंडानंतर अन्य फंडांनी व आता सर्वच फंडांनी या प्रथेचा स्वीकार केला आहे.

मनी मार्केट म्युच्युअल फंड हा एक फंड प्रकार आहे. सर्वात कमी जोखीम असलेला हा फंड प्रकार असून प्रामुख्याने ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स, कमर्शियल पेपर्स व रिव्हर्स रेपो या प्रकारच्या अल्प मुदतींच्या गुंतवणूक साधनांत फंडातील निधी गुंतविला जातो. ९१ दिवसांपेक्षा कमी मुदत असलेले रोखे या फंडातील गुंतवणुकीस पात्र ठरतात. एका दिवसासाठी उपलब्ध असलेला निधी या फंडात गुंतविता येतो. मागील २५ वर्षांच्या म्युच्युअल फंडांच्या इतिहासात केवळ दोन वेळा या प्रकारच्या फंडात २४ तासांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर तोटा झाला.

अल्प मुदतीच्या रोख्यांना मनी मार्केट इन्स्ट्रमेन्ट्स म्हणतात. म्हणून ही गुंतवणूक असणारे फंड मनी मार्केट फंड म्हणून ओळखले जातात. या फंडात नेमक्या किती मुदतीच्या (व कोणती पत असलेल्या) रोख्यांची निवड गुंतवणुकीसाठी करायची याचा निर्णय निधी व्यवस्थापक घेतो. यासाठी केंद्र सरकारच्या विविध मुदतीच्या रोख्यांच्या परताव्याचा दराचा आलेख काढला जातो. ‘एक्स’ अक्षावर मुदत व ‘वाय’ अक्षावर व्याज दर नोंद करून हे बिंदू जोडले जातात. या आलेखास ‘टर्म स्ट्रक्चर ऑफ इंटरेस्ट रेट्स’ किंवा ‘यील्ड कव्‍‌र्ह’ ही संज्ञा वापरली जाते. सामान्यपणे कमी मुदतीच्या रोख्यांवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा दीर्घ मुदतीच्या रोख्यांवर मिळणारा परतावा अधिक असायला हवा. परंतु वेगवेगळ्या मुदतीच्या कर्जाना असलेल्या मागणीवर त्या त्या मुदतीचे व्याज दर असतात. हे व्याज दर या आलेखाचा कल ठरवतात. वर जाणारा, पायाला समांतर, तळाकडे झुकलेला असे या आलेखाचे प्रकार असतात. केंद्र सरकारच्या १ दिवस ते २८ वर्षे उर्वरित मुदत असलेल्या ६ मेच्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या रोखे मंचावर नोंदलेल्या किमतीवर बेतलेला ‘यील्ड कव्‍‌र्ह’ सोबतच्या आकृतीत दाखविला आहे. मागील महिन्याभरात (रिझव्‍‌र्ह बँकेच्या पत धोरणानंतर) अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड व शॉर्ट टर्म फंडांच्या तुलनेत लिक्विड फंडाची कामगिरी उजवी राहिलेली आहे. मागील एका वर्षांत या फंडाने ४ मेच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार ७.०८ टक्के परतावा दिला आहे.

मार्च २००७ पासून गुंतवणुकीस उपलब्ध असलेल्या फंडाची ३१ मार्च २०१७ रोजी १४,१७२ कोटींची मालमत्ता होती. या फंडाचा गुंतवणूक व्यवस्थापन खर्च ०.५४ टक्के आहे. अमित त्रिपाठी हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाने गुंतवणूक केलेल्या रोख्यांची सरासरी मुदत ०.९ वर्षे असून ‘यील्ड टू मॅच्युरिटी’ ६.६७ टक्के आहे. फंडाने सुरुवातीपासून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना ८.३२ टक्के परतावा दिला आहे. २००४ मध्ये रेपो दर ४ टक्के होता हा दर वाढून ८ टक्क्यांवर गेला होता व सध्या ६.२५ टक्के आहे. हा परतावा मिळण्यात रेपो दरात जानेवारी २०१५ पासून झालेली कपात कारणीभूत आहे हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. फंडाच्या गुंतवणुकीत रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, एचडीएफसी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, व्होडाफोन मोबाइल सव्‍‌र्हिसेस, सिटी बँक, महिंद्रा फायनान्स या कंपन्यांच्या रोख्यांचा समावेश आहे. यापैकी व्होडाफोन मोबाइल सव्‍‌र्हिसेसची पत ‘डबल ए’ असून पहिल्या दहा गुंतवणुकींतील उर्वरित सर्व रोख्यांची पत ‘ट्रिपल ए’ आहे.

या फंडात गुंतवणुकीला केवळ ५०० रुपये गुंतवून सुरुवात करता येते. गुंतविलेले पैसे वर्षांच्या ३६५ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी काढून घेता येतात. म्युच्युअल फंडाची अ‍ॅप, फंड घराण्यांची संकेतस्थळे किंवा विक्रेत्यांची संकेतस्थळे या ठिकाणी ‘इन्स्टंट रिडम्पशन’ ही सुविधा उपलब्ध आहे. पैसे काढून घेण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पुढील ५-७ मिनिटांत पैसे बँक खात्यात जमा होतात. हे रंजक वाटले तरी याची गोडी व सुगमता अनुभवण्यासाठी एकदा तरी गुंतवणूक करून पैसे काढून घेतल्याचा अनुभव घेणे गरजेचे आहे.

म्युच्युअल फंडांची उत्पादने नेहमीच सल्लागाराच्या मदतीने विकली जातात. लिक्विड, लिक्विड प्लस, शॉर्ट टर्म फंड व अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड या प्रकारची उत्पादने वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत आढळत नाहीत. मुदत ठेवींपेक्षा ही उत्पादने रोकड सुलभ आहेत. या ही गुंतवणुकीने तीन वर्षे पूर्ण केल्यास भांडवली नफ्यास इंडेक्सेशनचा लाभ मिळविता येतो.

आखूड शिंगी, बहुगुणी अशी गुंतवणूक असून, म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा किमान  ५-१० टक्के भाग तीमध्ये असावा यासाठी ही शिफारस.

(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com