16 February 2019

News Flash

फंड विश्लेषण : दीर्घावधीचा मध्यम परतावा पर्याय

मागील काही वर्षे जगभरात व्याजदर कमी होत आहेत. भारत याला अपवाद नाही

प्रतिनिधिक छायाचित्र

वसंत माधव कुळकर्णी

सकल राष्ट्रीय उत्पादनाने मागील आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत ७.७ टक्के वृद्धीदराची नोंद केली. ही नोंद सकल राष्ट्रीय उत्पादन मोजण्याच्या पद्धतीतील फेरबदलामुळे किंवा कसे याबाबतीत साशंकता असूनही शेवटचे आठ-नऊ  महिने शिल्लक असलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील ती सर्वोत्तम कामगिरी आहे. या पाश्र्वभूमीवर रिलायन्स म्युच्युअल फंडाने ‘रिलायन्स निवेश लक्ष्य फंड’ ही दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांत गुंतवणूक करणारी आणि गुंतवणुकीस कायम खुली असलेली (ओपन एण्डेड) योजना सादर केली आहे. मागील सोमवारी खुली झालेली ही योजना २ जुलै २०१८ पर्यंत खुली राहणार असून त्यानंतर या योजनेच्या युनिट्सची खरेदी उपलब्ध एनएव्हीनुसार करता येईल.

मागील काही वर्षे जगभरात व्याजदर कमी होत आहेत. भारत याला अपवाद नाही. जून २०१३ मध्ये ८ टक्के असलेला रेपो दर ६.२५ टक्क्यांवर आलेला आहे. अर्थव्यवस्थेत कमी होणाऱ्या व्याजदराचा परिणाम व्याजावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कायम भेडसावत असतो. पीपीएफ आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, यांचे व्याजदर दर तिमाहीत बदलण्याचे सरकारचे धोरण आहे. बँका दीर्घ मुदतीच्या मुदत ठेवी स्वीकारत नाहीत, कारण बँकांना कमी होणाऱ्या व्याजदराची समस्या भेडसावत असते. निवृत्तिपश्चातच्या उदरनिर्वाहासाठी कमावत्या वयात कर कार्यक्षम दीर्घ मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सरकारी रोख्यांची उच्च पत असल्याने प्रत्यक्षात मुद्दल बुडण्याची शक्यता नसल्याने दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांत गुंतवणूक करण्याची संधी रिलायन्स निवेश लक्ष्य फंडाने उपलब्ध करून दिली आहे. अनेक गुंतवणूकदार सरकारी बँकांच्या मुदत ठेवी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), आरबीआय रोखे यांसारख्या गुंतवणुका मुद्दलाच्या सुरक्षिततेसाठी पसंत करतात. रिझव्‍‌र्ह बँकेने अद्याप करमुक्त रोखे उपलब्ध करून दिलेले नाहीत. मुद्दलाच्या सुरक्षिततेसाठी अनेक गुंतवणूकदार या रोख्यांत गुंतवणूक करतात. रिझव्‍‌र्ह बँकेच्या कुठल्याही देशात त्या सरकारचे रोखे सर्वोच्च सुरक्षित गुंतवणूक समजली जाते आणि व्याजदर कमी होतात तेव्हा रोख्यांच्या किमती वाढतात.

जे गुंतवणूकदार वर उल्लेख केलेल्या सुरक्षित गुंतवणूक साधनांत दीर्घ मुदतीची गुंतवणूक करतात अशा गुंतवणूकदारांसाठी हा फंड एक आदर्श पर्याय आहे. या फंडात निधी व्यवस्थापक दीर्घ मुदतीच्या (२५ वर्षे आणि अधिक) मुदतीच्या सरकारी रोख्यांत गुंतवणूक करून टप्प्याटप्प्याने रोख्यांची सरासरी मुदत कमी करेल. अर्थव्यवस्थेत व्याजदर कमी-अधिक झाल्याचा परिणाम रोख्यांच्या किमतींवर कमी कालावधीत होत असतो. रोख्यांची मुदत जितकी अधिक तितकी घट किंवा वाढ अधिक असते. तात्पुरत्या स्वरूपाची ही घट झाल्यामुळे जुन्या गुंतवणुकीवरील भांडवली वृद्धी पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. दीर्घ मुदतीत किमतीत घट झाल्याचा परिणाम कमी होतो.

निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुका मुख्यत्वे पत आणि व्याजदर कमी-अधिक होण्याच्या जोखमीच्या अधीन असतात. बाजारातील रोख्यांच्या किमती आणि व्याजदर यांच्यात व्यस्त प्रमाण असते. अर्थव्यवस्थेत व्याजदर वाढतात तेव्हा रोख्यांच्या किमती कमी होतात. सरकारी रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडावरील डिसेंबर महिन्यांत ७-८ टक्के असलेला एका वर्षांचा परतावा आता ३-४ टक्क्यांवर आला आहे. अर्थव्यवस्थेतील कोणतीही स्थिती ही कायम राहणारी नसते. तेव्हा जे काही गुंतवणुकीचे निर्णय घ्यायचे असतात ते आजची स्थिती आणि उद्या ती काय असेल याचा अंदाज बांधून घ्यायचे असतात. सद्य:स्थितीत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातील रोख्यांच्या किमतीच्या तुलनेत इतक्या खाली आल्या आहेत की नवीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतात.

फंड घराण्याने या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची जबाबदारी प्रशांत पिंपळे यांच्याकडे सोपवली आहे. त्यांना एकूण १४ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असून यापैकी १० वर्षे ते रोखे गुंतवणूक पाहात आहेत. रिलायन्स लाँग टर्म गिल्ट, रिलायन्स क्रेडिट रिस्क फंड, रिलायन्स क्लासिक बॉण्ड फंड, रिलायन्स इन्कम फंड या फंडाचे व्यवस्थापन करतात. दीर्घ मुदतीत (७ ते १० वर्षे) भांडवलाची सुरक्षितता आणि मध्यम परतावा इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडात गुंतवणुकीचा विचार करण्यास हरकत नाही. आपल्या सध्याच्या गुंतवणुका आणि भविष्यातील उद्दिष्टप्राप्ती याचा विचार करून आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी विचारविनिमय करून गुंतवणुकीचा निर्णय करावा.

रिलायन्स निवेश लक्ष्य फंड

* एनएफओ कालावधी       :        १८ जून ते २ जुलै २०१८

* फंड प्रकार      :                डेट – इन्कम (ओपन एंडेड)

* संदर्भ निर्देशांक  :                क्रिसिल लाँग टर्म डेट

* निधी व्यवस्थापक        :        प्रशांत पिंपळे

* किमान गुंतवणूक         :        रुपये ५०००

* किमान एसआयपी        :        रुपये १००

* shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on June 25, 2018 5:11 am

Web Title: fund analysis reliance nivesh lakshya fund