20 January 2018

News Flash

फंड विश्लेषण : समृद्धीचा उखाणा

मागील वर्षभरात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती बॅलंस्ड फंड गटाला दिली आहे.

वसंत माधव कुलकर्णी | Updated: July 24, 2017 5:18 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रिलायन्स रेग्युलर सेव्हिंग्ज फंड – बॅलंस्ड ऑप्शन

मागील वर्षभरात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती बॅलंस्ड फंड गटाला दिली आहे. ‘अ‍ॅम्फी’च्या आकडेवारीनुसार मे २०१७ मध्ये सर्वाधिक ७,६६३ कोटींची गुंतवणूक बॅलंस्ड फंडात केली गेली. मे २०१६ मध्ये गुंतविलेल्या ९७४ कोटींच्या तुलनेत मे २०१७ मध्ये गुंतविलेल्या निधीमध्ये ७ पटींहून अधिक वाढ झालेली दिसली आहे. या वाढीस निमित्त ठरलेल्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक बॅलंस्ड फंडांनी मासिक लाभांश देण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक सेवानिवृत्त गुंतवणूकदारांच्या निधीचा ओघ बँकांच्या मुदत ठेवीकडून बॅलंस्ड फंडाकडे वळल्याचे स्पष्ट दिसून येते. अर्थसाक्षर झालेल्या गुंतवणूकदारांनी बँकांच्या मुदत ठेवींवर व्याजदर कमी होत असल्याने अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी हा पर्याय सुज्ञतेने निवडला आहे. पूर्वायुष्यात समभाग गुंतवणूक टाळलेला बचतकर्त्यांचा वर्ग बॅलंस्ड फंडाच्या माध्यमातून समभाग गुंतवणुकीकडे वळलेला त्या निमित्ताने दिसत आहे. नियमित मासिक उत्पन्न मिळविण्याचे जे काही पर्याय आहेत त्या पर्यायांपैकी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान अर्थात ‘एसडब्ल्यूपी’ हा एक पर्याय आहे (‘एसडब्ल्यूपी’ पर्यायाची विस्तृत माहिती खालील लेखात आहे.). समभागसंलग्न गुंतवणूक ६५ टक्क्यांहून कमी नसलेल्या बॅलंस्ड फंडाचा एसडब्ल्यूपी पर्याय नियमित उत्पन्नाबरोबर भांडवली वृद्धी देत असतो. भांडवली वृद्धीसोबत अशा बॅलंस्ड फंडातून (समभाग गुंतवणूक ६५ टक्क्यांहून कमी नसलेल्या) गुंतवणुकीनंतर एका वर्षांनंतर काढलेली रक्कम करमुक्त असते.

हा फंड मागील ५ वर्षांत एसडब्ल्यूपीद्वारे नियमित उत्पन्नाबरोबर सर्वाधिक भांडवली वृद्धी देणारा फंड ठरला आहे. १ जुलै २०१२ रोजी रेग्युलर ग्रोथ पर्यायामध्ये १० लाखांच्या गुंतवणुकीवर, १ जुलै २०१३ पासून मासिक ५,००० रुपयांच्या नियमित उत्पन्नासोबत दरवर्षी एसडब्ल्यूपी रकमेत १० टक्के  वाढ करून २० जुलैच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार गुंतवणुकीचे बाजार मूल्य १८.४८ लाख रुपये झाले आहेत. केवळ नियमित उत्पन्नच नव्हे तर महागाईमुळे वाढत्या खर्चाची तरतूद करण्यासाठी नियमित उत्पन्नात वार्षिक १० टक्के वाढ केल्यानंतरचा हा परताव्याचा दर आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ही गुंतवणूक व एका वर्षांनंतर नियमित १० टक्के वाढत जाणाऱ्या एसडब्ल्यूपीचे विस्तृत टिपण सोबतच्या कोष्टकोत दिले आहे. रिलायन्स रेग्युलर सेव्हिंग्ज फंड बॅलंस्ड ऑप्शन या फंडाच्या पहिल्या एनएव्हीला ८ जून २००५ रोजी १० लाखांची गुंतवणूक करून १ जुलै २००६ पासून महागाईमुळे वाढत्या खर्चाची तरतूद करण्यासाठी नियमित उत्पन्नात वार्षिक १० टक्के वृद्धी असलेली व पहिली ५००० रुपयांची एसडब्ल्यूपी केल्यास मागील १३३ महिन्यांत १० लाखांच्या परताव्यापश्चैत २० जुलैच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार गुंतवणुकीचे भांडवली मूल्य २७.९१ लाख रुपये आहे. (कोष्टक २ पाहा)

रेग्युलर सेव्हिंग्ज फंड – हायब्रीड ऑप्शन या नावाने सुरुवात झालेला हा फंड १३ जानेवारी २००७ पासून पुनर्रचनेनंतर रिलायन्स रेग्युलर सेव्हिंग्ज बॅलंस्ड ऑप्शन या नावाने ओळखला जाऊ  लागला. १ एप्रिल २००९ पासून या फंडात लाभांश विकल्पाचा समावेश झाला. काळाच्या ओघात फंडाच्या मालमत्ता विभाजनांत अनेक बदल झाले. संजय पारिख हे फंडाचे समभाग गुंतवणूक व्यवस्थापक आहेत, तर अमित त्रिपाठी हे फंडाचे रोखे गुंतवणूक व्यवस्थापक आहेत. रोखे गुंतवणूक सक्रिय रूपात म्हणजे ‘डय़ुरेशन’ आणि ‘अ‍ॅक्रुअल’ प्रकाराने हाताळली जाते.

संजय पारिख यांची ओळख फंड जगतात मुत्सद्दी फंड व्यवस्थापक अशी आहे. रिलायन्स रेग्युलर सेव्हिंग्ज बॅलंस्ड ऑप्शन या फंडाच्या समभाग गुंतवणुकीसोबत रिलायन्स इक्विटी सेव्हिंग्ज, रिलायन्स मंथली इन्कम प्लान, रिलायन्स रिटायरमेंट फंड- वेल्थ क्रिएशन प्लान, रिलायन्स रिटायरमेंट फंड- इन्कम जनरेशन प्लान या फंडाचे ते निधी व्यवस्थापक आहेत. या फंडात मिड कॅप प्रकारच्या समभागांचे अधिक प्रमाण होते. संजय पारिख यांनी फंडाच्या समभाग गुंतवणुकीची सूत्रे आल्यानंतर त्यांनी गुंतवणुकीत लार्ज कॅप समभागांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढविले. ताज्या पोर्टफोलिओनुसार समभाग गुंतवणुकीच्या ६५ टक्के गुंतवणूक ही लार्ज कॅप प्रकारच्या समभागात आहे. या फंडाने गुंतवणूक केलेल्या लार्ज कॅप समभागांचे भांडवली मूल्य १ लाख २० हजार कोटी ते १ लाख ७० हजार कोटींच्या दरम्यान आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत ४७.९१ टक्के गुंतवणूक निफ्टीत समावेश असलेल्या समभागांत केली आहे. या फंडाचे जवळचे स्पर्धक असलेल्या यूटीआय बॅलंस्ड फंड, एचडीएफसी बॅलंस्ड फंडाची गुंतवणूक ९० हजार कोटी ते १ लाख ३० हजार कोटींच्या दरम्यान असलेल्या मिड कॅप समभागांत आहे. अन्य फंडात मिड कॅप समभागांचे प्रमाण अधिक असल्याने मागील ३ व ५ वर्षांचा या फंडाचा परतावा मिड कॅप प्रधान बॅलंस्ड फंडाच्या तुलनेत जरी कमी असला तरी या फंडाचा ‘शार्प रेशो’ हा -०.०४३ व प्रमाणित विचलन (स्टॅण्डर्ड डिव्हिएशन) ०.७५ असल्याने हा फंड तुलनेने कमी जोखीम असलेला ठरतो. बॅलंस्ड फंड इंडेक्स हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. या फंडाने दिलेला वार्षिक परतावा, केवळ क्रिसिल बॅलंस्ड फंड इंडेक्सपेक्षा अधिक नसून त्या त्या कालावधीतील निफ्टीच्या परताव्याहून अधिक आहे.

फंडाच्या निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीसाठी बँकिंग, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या, वाहन उद्योग, उपभोग्य वस्तू, संकीर्ण व धातू या उद्योगांना प्राधान्य दिले आहे. समभाग गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, ग्रासिम, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस व आयसीआयसीआय बँक या आघाडीच्या गुंतवणुका आहेत. रोखे गुंतवणुकीत ७.९५ टक्के एचडीएफसी बँक, ७.९५ टक्के टाटा कॅपिटल, १०.६० टक्के रिलायन्स पॉवर, ६.८८ टक्के रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, ७.३६ टक्के पॉवरग्रीड या रोख्यांत सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. फंडाचे बँक, उपभोग्य वस्तू, व अर्थचक्राच्या दिशा बदलामुळे निर्माण झालेल्या संधींचा फायदा घेण्याच्या दृष्टीने दीर्घ काळापासून केलेल्या गुंतवणुका फळाला येत असल्याने फंडाचा नजीकच्या काळात परताव्याने फंडाला अव्वलस्थानी नेले आहे.

श्रावण महिन्यात व्रतवैकल्याच्या निमित्ताने नात्यांत भेटी दिल्या जातात. ज्या घरात लहान मुले आहेत त्या घरात मुलांच्या दीर्घायुष्यासाठी शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने भाऊ -बहिणींना भेट देत असतात. या फंडात किमान गुंतवणूक ५०० रुपयांनी व नियोजनबद्ध गुंतवणुकीची सुरुवात १०० रुपयांनी करता येणे शक्य असल्याने या श्रावण महिन्यांच्या निमित्ताने भावांनी बहिणींना फंडाच्या ‘एसआयपी’ रूपात भेट दिली आणि जिवती पूजनाच्या निमित्ताने पालकांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या फंडात एक ‘एसआयपी’ केली तर आनंदच वाटेल.

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com

First Published on July 24, 2017 1:05 am

Web Title: fund analysis reliance regular savings fund balanced plan
  1. No Comments.