25 November 2017

News Flash

फंड विश्लेषण : आश्वासक लार्ज कॅप फंड

एसबीआय ब्ल्यूचीप फंडाने शेवटचा लाभांश सप्टेंबर २०१६ मध्ये १० टक्के जाहीर केला होता.

वसंत माधव कुलकर्णी | Updated: July 3, 2017 1:02 AM

एसबीआय ब्ल्यूचीप फंडाने शेवटचा लाभांश सप्टेंबर २०१६ मध्ये १० टक्के जाहीर केला होता.

एसबीआय ब्ल्यूचीप फंड

एसबीआय म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्मितीची मागील आठवडय़ात ३० वर्षे पूर्ण केली. ३० वर्षांची यशस्वीपणे वाटचाल पूर्ण करणारे हे भारतातील पहिलेच फंड घराणे आहे. या निमित्ताने या फंड घराण्याच्या ‘एसबीआय ब्ल्यूचीप फंडा’ची आजची शिफारस.

मागील अनेक वर्षे काही ना काही कारणांमुळे दिरंगाई आणि अंमलबजावणीस विलंब झालेली वस्तू व सेवा कर प्रणाली (जीएसटी) हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा लागू झाली असेल. निश्चलनीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत घडलेला हा दुसरा क्रांतिकारक बदल. या बदलाचे परिणाम कंपन्यांच्या उत्सर्जनावर (अर्निग पर शेअर – ईपीएस) दिसून येण्यास दोन तीन तिमाहींची प्रतीक्षा करावी लागेल.

जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांची (अमेरिका, युरोप) संथपणे परंतु सुधारणेच्या दिशेने निश्चित वाटचाल सुरू असल्यामुळे वर्षभरानंतरचा विचार केल्यास आर्थिक वर्ष २०१९ च्या पहिल्या तिमाहीच्या निकालात उत्सर्जन ७ ते १० टक्क्यांनी वाढलेले दिसेल. हा असा सकारात्मक विचार करण्यास नक्कीच वाव आहे.

कमी होत असलेल्या तेलाच्या किमती व सोन्याच्या आयातीतीत घसरण आदी भारतीय अर्थव्यवस्थेच्या पथ्यावर पडलेल्या गोष्टी आहेत. निश्चलनीकरणाचा परिणाम अजून एखादी तिमाही राहील. केंद्रीय सांख्यिकी संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्था वाढीचा दर घसरला असला, तरी चालू वित्त वर्षांत अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ७.२५ ते ७.५० टक्के राहील असा अंदाज विविध अर्थसंस्थांकडून व्यक्त होत आहे. हा अंदाज वास्तवात येईल किंवा वस्तू व सेवा कर लागू होण्यामुळे हा वृद्धी दर किती कमी होईल (किंवा वस्तू व सेवा कर कायद्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल असे मानणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर वाढेल) व याचा कंपन्यांच्या उत्सर्जनावर नेमका किती परिणाम होईल याबद्दल तूर्त अनिश्चितता आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक दशकातील सर्वात कमी वृद्धीदर नोंदवत असताना जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी लार्ज कॅप फंडाची निवड नक्कीच योग्य ठरेल. जोखीम स्वीकारण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांना मिड कॅप फंडातील गुंतवणुकीचा पर्याय खुला आहे.

एसबीआय म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्मितीची मागील आठवडय़ात ३० वर्षे पूर्ण केली. ३० वर्षांची यशस्वीपणे वाटचाल पूर्ण करणारे हे भारतातील पहिलेच फंड घराणे आहे. या निमित्ताने या फंड घराण्याच्या ‘एसबीआय ब्ल्यूचीप फंडा’ची आजची शिफारस. या फंड घराण्याने मागील वर्षी एप्रिल महिन्यात यूटीआय म्युच्युअल फंडाला मागे सारत पहिल्या पाच फंड घराण्यात स्थान मिळविले. हे स्थान मिळविण्यात स्टेट बँकेचे योगदान मोठे आहे. २४ हजारावर शाखा विस्तार असलेली बँक या फंड घराण्यासाठी सर्वाधिक निधी संकलन करते. त्याच प्रमाणे यूटीआय म्युच्युअल फंडाच्या योजनांची गचाळ कामगिरीही तितकीच कारणीभूत आहे. भारतातील म्युच्युअल फंड व्यवसायाची जननी असलेल्या या फंड घराण्याची ‘यूटीआय मिड कॅप’वगळता एकाही योजनेची कामगिरी वाखाणण्यायोग्य नाही. वार्षिक ६ कोटी इतके म्युच्युअल फंड उद्योगात सर्वाधिक वेतन घेणारे मुख्य कार्यकारी अधिकारी लाभलेल्या एका जुन्या फंड घराण्याच्या योजनांना बाजार शिखरावर असतानासुद्धा परताव्याचा सूर गवसल्याचे दिसत नाही. याच कारणांनी ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ यादीत यूटीआय म्युच्युअल फंडाच्या एकाही योजनेचा समावेश होऊ  शकलेला नाही.

एसबीआय ब्ल्यूचीप फंडाची सुरुवात १४ फेब्रुवारी २००६ रोजी झाली. २ जुलै २०१२ रोजी या फंडात ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार १ लाख गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराचे पाच वर्षांत ३० जून २०१७ च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार २.४८ लाख रुपये झाले आहेत. मागील पाच वर्षांपूर्वीच्या गुंतवणुकीवर १९.३६ टक्के वार्षिक परतावा दिलेल्या या फंडाने स्थापनेपासून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना या फंडाने गुंतवणुकीवर मागील १२ वर्षांत ११.५३ टक्के परतावा दिला आहे. हे जरी खरे असले तरी फंड स्थापनेनंतर मे २००६ हा महिना या फंडासाठी सर्वाधिक एनएव्हीत घसरण झालेला महिना ठरला. तर मे २००९ या महिन्यात फंडाच्या ‘एनएव्ही’त सर्वाधिक वृद्धी झाली. मागील पाच वर्षांपासून या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा सोहिनी अंदानी यांच्याकडे आहे. १३,३०० कोटींची मालमत्ता असणाऱ्या या फंडाने लार्ज कॅप फंड गटात एक बिनीचा शिलेदार अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. या फंडाचा ‘एस अँड पी बीएसई १००’ हा संदर्भ निर्देशांक आहे. फंडाच्या स्थापनेपासून ४७ तिमाहींपैकी ४४ तिमाहीत फंडाने संदर्भ निर्देशांकापेक्षा अव्वल कामगिरी केली आहे.

एसबीआय ब्ल्यूचीप फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा सोहिनी अंदानी यांच्याकडे आल्यापासून पाच वर्षांचा विचार केल्यास पंचवार्षिक परताव्यात या फंडाने लार्ज कॅप गटातील आयसीआयसीआय फोकस्ड ब्लूचीप, यूटीआय अपॉच्र्युनिटीज, फ्रँकलिन इंडिया ब्लूचीप यासारख्या फंडांना मागे सारले आहे. मागील वर्षभरात फंडाच्या गुंतवणुकीत सरासरी ५० समभागांचा समावेश राहिला आहे. मे अखेरीला फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो, महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस व यूपीएल या कंपन्या सर्वाधिक गुंतवणूक केलेल्या कंपन्या आहेत. फंडाची गुंतवणूक ७१ टक्के लार्ज कॅप समभागात व १८ टक्के मिड कॅप समभागात आहे. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे बँका, वाहन उद्योग, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या व वित्तीय सेवा, तेल व वायू अशी आहेत. मे अखेरीस फंडातून ६ टक्के रोकड सममूल्य गुंतवणूक असणे हे निधी व्यवस्थापिकेच्या विवेकाची जाणीव करून देणारे आहे. नजीकच्या भविष्यात नवीन गुंतवणूक करण्याची एखादी संधी उपलब्ध झाल्यास (जसे मे महिन्यात फंडाच्या गुंतवणुकीत नव्याने समाविष्ट झालेला हुडको) किंवा एखाद्या मोठय़ा गुंतवणूकदाराने गुंतवणूक काढून घेण्याचे ठरविल्यास या रोकडसुलभतेचा वापर होऊ  शकेल.

एसबीआय ब्ल्यूचीप फंडाने शेवटचा लाभांश सप्टेंबर २०१६ मध्ये १० टक्के जाहीर केला होता. नव्याने गुंतवणूक केल्यास महिन्या दोन महिन्यात मागील लाभांशापेक्षा अधिक लाभांश गुंतवणूकदारांना मिळण्याची शक्यता आहे. या फंडाला मॉर्निग स्टारने ‘फोर स्टार’ तर व्हॅल्यू रिसर्चने ‘फाईव्ह स्टार’ रेटिंग दिले आहे. मागील पाच वर्षांत दिग्गज फंडांना परताव्यात मागे सारणाऱ्या या फंडाचा सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात नव्याने गुंतवणुकीस सुरुवात करणाऱ्या गुंतवणूकदारांनी जरूरच विचार करावा.

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com

First Published on July 3, 2017 1:02 am

Web Title: fund analysis sbi bluechip fund