21 February 2019

News Flash

बाजाराचा तंत्र कल : धास्तावलेला बाजार, घातक चढ-उतार!

या आठवडय़ात निर्देशांकाची महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ ही ३५,३१७/ १०,८३३ आहे.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून येत्या आठवडय़ातील निर्देशांकांचा तसेच सोन्यासह, लक्षणीय समभागाच्या संभाव्य वाटचालीचा वेध..

या स्तंभातील ‘जोखीम-नफा गुणोत्तर’ या लेखातील चतुरस्र कवयित्री शांताताई शेळके यांचे वाक्य होते. ‘..डोक्यात असते ते काव्य व कागदावर असते ती कलाकुसर’. या वाक्याप्रमाणे माझ्या डोक्यातील निफ्टीवरील उच्चांक १०,८००, ११,००० चे टप्पे हळूहळू प्रत्यक्षात आलेले दिसले. तर कागदावरील कलाकुसर म्हणजे गुंतवणूकदारांचा कागदोपत्री नफा प्रत्यक्षात येण्यासाठी, त्यांनी चालू असलेल्या तेजीत आपले नफ्यातील समभाग विकून नफा पदरात पाडून घ्यावा, असे सूचित करीत होती. त्यानंतर निफ्टीवर ५०० ते ८०० गुणांची घसरण संभवते, असे त्या लेखात सांगितले गेले होते.. वरील विधान काळाच्या कसोटीवर तपासता निफ्टी निर्देशांकाने २९ जानेवारीला ११,१७१ चा उच्चांक दाखविला आणि ६ फेब्रुवारीला दिवसांतर्गत १०,२७६ चा नीचांक मारून १०,४९८ ला निफ्टीचा त्या दिवशीचा बंद भाव नोंदविला गेला. असा जवळपास ८०० गुणांचा घातक उतार अनुभवायला मिळाला. या घातक उताराची दाहकता एवढी तीव्र होती की, अवघ्या तीन दिवसांत (२, ५ आणि ६ फेब्रुवारी) निफ्टी १०,९०० वरून १०,२७६ पर्यंत घसरून गुंतवणूकदारांना त्याने रक्तपाताची आठवण करून दिली. या पाश्र्वभूमीवर येणाऱ्या दिवसात निर्देशांकाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.

  शुक्रवारचा बंद भाव –

*  सेन्सेक्स : ३४,००५.७६      

*  निफ्टी    : १०,४५४.९५

या आठवडय़ात निर्देशांकाची महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ ही ३५,३१७/ १०,८३३ आहे. या स्तरावर निर्देशांक १० कामकाजाचे दिवस टिकल्यास निर्देशांक मंदीच्या गत्रेतून बाहेर पडला असे समजण्यास हरकत नाही. नंतरची सेन्सेक्स-निफ्टीसाठी वरची इच्छित उद्दिष्टे अनुक्रमे ३५,७५० ते ३६,२५०/ १०,९५० ते ११,००० अशी असतील.

मंदीच्या दृष्टिकोनातून विचार करता निर्देशांकाला ३५,३१७/ १०,८३३ ओलांडण्यास वारंवार अपयश येत असल्यास निर्देशांक प्रथम (३४,२५० / १०,५५०), (३३,४५० / १०,३५०) आणि नंतर (३२,३७०/ १०,०००) पर्यंत घसरू शकतो. ३२,३७०/ १०,००० च्या आसपास निर्देशांकांची घसरूण थांबून शाश्वत तळ दृष्टिपथात येईल.

सोन्याचा  किंमत-वेध

* सोन्याच्या भावात रु. २८,००० ते ३०,५०० अशी भरीव वाढ अवघ्या दीड महिन्यात झाल्याने एक संक्षिप्त घसरण ही रु. ३०,००० पर्यंत असेल. हे गेल्या लेखातील वाक्य आता आपण अनुभवत आहोत. आताच्या घडीला रु. ३०,१०० ही महत्त्वाची कल निर्धारण पातळी आहे. रु.३०,१००च्या खाली सोने रु. २९,७०० ते २९,५०० पर्यंत खाली घसरू शकते. रु. ३०,१००च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन रु. ३०,३०० ते ३०,५०० ही वरची इच्छित उद्दिष्ट असतील. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).

लक्षणीय समभाग : फर्स्ट सोर्स सोल्युशन्स लि.

(बीएसई कोड – ५३२८०९)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ४४.०५

*  समभागाचा आजचा बाजार भाव हा २०० (३९), १०० (४१), ५० (४१), २० (४३) या सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर आजचा बाजार भाव बेतलेला आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ३६ ते ४८ असा आहे. तेजीच्या दृष्टिकोनातून ४८ रुपये ही महत्त्वाची कल निर्धारण पातळी आहे.  ४८ च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन  प्रथम वरचे उद्दिष्ट हे रु. ५५ ते रु. ६० असेल. दीर्घकालीन उद्दिष्ट रु. ७० ते ८० असे असेल. (सध्या बाजारात घातक चढ-उतार सुरू असल्याने गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्य़ांच्या चार तुकडय़ा विभागून प्रत्येक घसरणीत खरेदी करावी.) या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला रु. ३० चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on February 12, 2018 12:54 am

Web Title: gold price forecasts stock market forecast