वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

प्रश्न : १ जुलैपासून लागू झालेल्या वस्तू व सेवा कराचा म्युच्युअल फंड योजनांवर काय परिणाम होईल? – दत्ताराम परब
arth07उत्तर : अप्रत्यक्ष करांमध्ये सुसूत्रता आणणाऱ्या वस्तू व सेवा कराच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर महागाई काही प्रमाणात वाढताना दिसेल. म्युच्युअल फंडाबाबतही वस्तू व सेवा करानंतर बदललेल्या दराचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. या दरांशी निगडित क्षेत्रामध्ये कोणते फंड आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. वस्तू व सेवा कराचे लाभार्थी किंवा विपरित परिणाम विविध फंडांच्या योजनांवर कसे होतात, ते पाहावे लागेल. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर किंवा एसआयपीच्या हप्त्यांवर मात्र कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही.

प्रश्न : मला नुकतीच नोकरी लागली आहे. येत्या काही वर्षांमध्ये लग्न व स्व-मालकीच्या घराचे माझे उद्दिष्ट आहे. अशावेळी म्युच्युअल फंडांमध्ये कशा रितीने गुंतवणूक करावी?       – गणेश बेलुरे

उत्तर : तुमचे सध्याचे वय कमाईचे आहे. शिवाय अधिकच्या जबाबदाऱ्याही तुम्हाला सध्या नाहीत. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करात असाल तर एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे. ४,००० रुपये बॅलेन्स्ड व १,००० रुपये निवृत्ती योजनेमध्ये अशा तऱ्हेने गुंतवणूक सुरू करण्यास हरकत नाही. तुम्ही कमावते असल्याने जसजसे वेतन वाढेल तसे एसआयपीतील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवत राहा.

प्रश्न : म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांच्या मालमत्ता मूल्यात अर्थात एनएव्हीत सारखे बदल होत असतात. चांगला एनएव्ही म्हणजे फंडही गुंतवणुकीसाठी चांगला, असे मानायचे का?   – पराग काळे

उत्तर : फंडांचे एनएव्ही तपासणे केव्हाही चांगले. पण एनएव्हीवर पूर्णत: अवलंबून गुंतवणूक करणे योग्य नाही. एनएव्ही हे त्या फंडाला असलेल्या अनेक परिमाणांपैकी एक आहे. एनएव्हीचा आकडा चांगला म्हणजे संबंधित फंडही उत्तम असेही मानता कामा नये. अनेक फंड तुमच्या गुंतलेल्या भांडवलात वाढीसह लाभांशही देऊ करतात. याचे प्रतिबिंब एनएव्हीच्या आकडय़ात उमटतेच असे नाही.

प्रश्न : म्युच्युअल फंडातील बॅलेन्स्ड फंडातील गुंतवणुकीबाबत सद्यस्थितीत काय धोरण ठेवावे?  – अंजली कारे

उत्तर : बॅलेन्स फंडातील कोष जमा होऊ द्या. किमान वर्षभर तरी गुंतवणूक कायम असावी. सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन (एसडब्ल्यूपी) च्या माध्यमातूनही यातील गुंतवणूक टप्प्याटप्याने काढत राहावी. मात्र म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक किमान पाच ते आठ वर्षे असायला हवी. त्या आधी ती काढली नाही तर उत्तमच.

प्रश्न : म्युच्युअल फंड गुंतवणुक नेमकी केव्हा मोडली जावी?       – वैशाली टेंगसे

उत्तर : म्युच्युअल फंडच काय पण कोणत्याही पर्यायातील गुंतवणूक ही आपल्या ध्येयाशी निगडित असावी. जसे निवृत्ती योजनेतील गुंतवणूक ही निवृत्तीपूर्वीच काढणे योग्य नव्हे. तसेच जर वयाच्या ४० व्या वर्षी घराचे उद्दिष्ट राखून गुंतवणूक सुरू केली असेल तर ते निश्चित उद्दिष्ट वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. तोवर गुंतवणुकीशी निष्ठा ठेवणे गरजेचेच. तथापि, पूर्ण नियोजनाने केलेली गुंतवणूक ही निर्धारीत केलेल्या कालावधीत आपले आर्थिक उद्दिष्ट गाठताना दिसत नसल्यास फेरविचार केला जायला हवा. तज्ज्ञ सल्लागाराची त्यासाठी मदत घेतली गेली पाहिजे. त्या उलट गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ झाला आणि आपले ध्येय पूर्ण होण्याला वर्ष-सहा महिन्याचा कालावधी असल्यास, ही गुंतवणूक सुरक्षित पर्यायांमध्ये वळती करणे श्रेयस्कर ठरेल. म्हणजे इक्विटी फंडात गुंतवणूक असेल तरी काढून कमी जोखीम असलेल्या लिक्विड फंडासारख्या स्थिर उत्पन्न पर्यायात वळती केली पाहिजे.

प्रश्न : डेट फंड गुंतवणुकीच्या दृष्टीने अधिक लाभदायी आहेत का?  –       – श्याम खिस्ते

उत्तर : गुंतवणूक करताना जोखीम घ्यायची तयारी नसेल तर म्युच्युअल फंडातील डेट फंडाचा पर्याय उत्तम आहे. ज्याप्रमाणे भांडवली बाजारात व्यवहार करताना गुंतवणूक जोखमीची असते; मात्र स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनांबाबत बाजार जोखीम अत्यल्प असते. समभागसंलग्न फंडांपेक्षा डेट फंडातील जोखीम तुलनेने कमी असते त्याचप्रमाणे त्यांचा परतावाही कमी असतो, हेही लक्षात घ्यावे. जितकी जोखीम अधिक, तितके परताव्याची शक्यताही जास्त असे हे समीकरण आहे.

प्रश्न : फंडांच्या एनएव्हीत वाढ महत्त्वाची की लाभांश?   – रामचंद्र बापट

उत्तर : एक वेळ फंड योजनेची एनएव्ही बघितली नाही तरी चालेल. मात्र मोठय़ा कालावधीतील परतावा कामगिरी लक्षात घेतली जावी. एनएव्ही चांगली म्हणजे फंड चांगला असे म्हणजे म्हणणे बाळबोधपणाचे आहे. परताव्याबरोबरच गुंतवणूकदारांनी संबंधित फंडाचे गुंतवणूक उद्दिष्ट, गुंतवणूक असलेल्या कंपन्या व उद्योग क्षेत्रे, त्यातील नियतकालिक फेरबदल याकडेही लक्ष द्यावे.


*  फंड गुरू

आपलेही म्युच्युअल फंडविषयक काही प्रश्न असतील तर, आम्हाला पाठवा : arthmanas@expressindia.com