गुलशन पॉलिओल्स म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेली गुलशन शुगर्स अ‍ॅण्ड केमिकल्स लिमिटेड होय. सुरुवातीला मुजफ्फरपूर येथून कॅल्शियम काबरेनेटचे उत्पादन करणारी ही कंपनी नंतर २००० मध्ये तीन कंपन्यांत विभाजित करण्यात आली. त्यातील एक कंपनी म्हणजे गुलशन पॉलिओल्स. भारतात आठ राज्यात कार्यरत असलेल्या प्रकल्पांद्वारे उत्पादन घेणाऱ्या या कंपनीचे अस्तित्व जगातील ३५ देशांत आहे. कंपनीच्या उत्पादनांच्या पोर्टफोलियोमध्ये स्टार्च, कॅल्शियम काबरेनेट, अल्कोहोल तसेच अ‍ॅग्रो केमिकल्स इ. विविध उत्पादनांचा समावेश आहे. केवळ ४.६९ कोटी रुपये भांडवल असलेल्या या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत ४३४.१६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३०.४९ arth06कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो २० टक्क्य़ांनी जास्त आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने आपल्या उत्पादनात वैविध्य आणून कंपनीच्या विस्तारात कायम भरच घातली आहे. सध्या भांडवली खर्चाद्वारे कंपनी एमडीपी, डीएमएच आणि लिक्विड ग्लुकोज अशी स्टार्चआधारित नवीन उत्पादने बाजारात आणत आहे. तसेच मद्य उत्पादनही सुरू करीत आहे, या खेरीज मुजफ्फरपूर येथे मक्यापासून स्टार्च उत्पादनाचा नवीन प्रकल्प सुरू करीत आहे. गेल्या १५ वर्षांचा कंपनीचा आलेख पाहता आगामी काळात कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे. नवीन उत्पादने, उत्तम गुणवत्ता आणि व्यवस्थापनाचे उत्तम कामकाजातील सातत्य या सर्वाचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कामकाजावर होईल. येत्या दोन वर्षांत ५० टक्के परतावा अपेक्षित असलेला हा शेअर मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
अजय वाळिंबे – stocksandwealth @gmail.com