23 January 2019

News Flash

कर  समाधान : आरोग्य विमा आणि  प्राप्तिकर कायदा

पैसे कमावण्यासाठी तब्येत खराब करायची आणि नंतर तब्येत चांगली राखण्यासाठी कमावलेले पैसे खर्च करायचे.  

प्रतिनिधिक छायाचित्र

कआरोग्य चांगले असेल तर सर्व सुखे उपभोगता येतात, आरोग्य चांगले नसेल तर भरपूर पैसे असले तरी त्याचा उपभोग घेता येत नाही. म्हणूनच म्हटले आहे की, ‘आरोग्यम् धन संपदा’. सुंदर आरोग्य हेच खरे धन आहे. आपले आरोग्य चांगले ठेवणे हे प्रत्येकासाठी हितावह आहे. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना ताणतणाव सोसावा लागतो, खाण्यापिण्याची पथ्ये पाळली जात नाहीत, वेळी-अवेळी खाणे, उशिरापर्यंत काम करणे, अपुरी झोप ही जीवनशैली झाली आहे. बदलत्या काळानुसार हे करणे अपरिहार्य आहे हे सांगितले जाते. यामध्ये पैसे मिळतात; परंतु कमी वयात मधुमेह, रक्तदाब अशा जीवनशैलीच्या व्याधीला सामोरे जावे लागते. म्हणजे पैसे कमावण्यासाठी तब्येत खराब करायची आणि नंतर तब्येत चांगली राखण्यासाठी कमावलेले पैसे खर्च करायचे.

हल्ली वैद्यकीय खर्चसुद्धा खूप वाढला आहे. नवनवीन उपचार पद्धती, त्यांचा वाढता खर्च, औषधांच्या वाढत्या किमती यामुळे अशा भविष्यातील अनिश्चित खर्चाची तरतूद करणेही गरजेचे आहे. प्राप्तिकर कायद्यात वैद्यकीय खर्च किंवा खर्चाची तरतूद करणाऱ्यांना करामध्ये सवलत दिली जाते. जेणेकरून करदात्याला वैद्यकीय खर्च करता येईल आणि त्याचा कराचा भार थोडा कमी होईल.

या संदर्भात प्राप्तिकर कायद्यात  खालीलप्रमाणे प्रमुख तरतुदी आहेत.

*  वैद्यकीय विमा (मेडिक्लेम) आणि वैद्यकीय तपासणी खर्च : कलम ८० डी

उचित रकमेचा वैद्यकीय विमा घेणे हा एक पर्याय अशा भविष्यातील अनिश्चित खर्चासाठी उपयोगी ठरतो. असा वैद्यकीय विमा घेतल्याने विम्याचा फायदा मिळतोच, शिवाय करसुद्धा वाचविता येतो.

करदात्याने स्वत:साठी, त्याच्या/तिच्या पती/पत्नीसाठी, अवलंबून असलेली मुले, आई/वडील यांच्यासाठी घेतलेल्या वैद्यकीय विम्यासाठी भरलेल्या हप्त्याची प्राप्तिकर कायदा कलम ८० डी नुसार उत्पन्नातून वजावट मिळते. हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी पॉलिसी घेऊ  शकतो.

वैयक्तिक करदात्यांसाठी वजावटीची मर्यादा खालीलप्रमाणे :

* करदात्याने स्वत:साठी, त्याच्या/तिच्या पती/पत्नीसाठी, अवलंबून असलेली मुले यांच्यासाठी भरलेल्या वैद्यकीय विम्याची रक्कम किंवा आरोग्य तपासणीसाठी केलेला खर्च यासाठी एकूण २५,००० रुपयांपर्यंत. करदाता ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल तर) ही मर्यादा ३०,००० रुपये इतकी आहे.

* करदात्याने त्याच्या आई-वडिलांसाठी भरलेल्या वैद्यकीय विम्याची रक्कम किंवा आरोग्य तपासणीसाठी केलेला खर्च यासाठी एकूण २५,००० रुपयांपर्यंत. करदात्याचे आई-वडील ज्येष्ठ नागरिक असतील तर ही मर्यादा ३०,००० रुपये आहे.

* करदात्याला ५,००० रुपयांपर्यंत वैद्यकीय तपासणीच्या खर्चाची वजावट मिळते. हा खर्च वरील मर्यादेमध्ये समाविष्ट आहे.

* करदाता अतिज्येष्ठ नागरिक (वय ८० वर्षांपेक्षा जास्त) असेल किंवा आई-वडील यापैकी एक अतिज्येष्ठ नागरिक असेल आणि त्यांनी कोणताही विमा घेतला नसला तरी त्यांना वैद्यकीय खर्चासाठी केलेल्या खर्चासाठी ३०,००० रुपयांपर्यंत वजावट मिळते.

उदा. एका करदात्याचे वय ५० वर्षे आहे. त्याने वैद्यकीय कारणासाठी खालीलप्रमाणे खर्च केला :

१. स्वत: आणि पत्नीसाठी २०,००० रुपयांचा वैद्यकीय विमा

२. त्याच्यावर अवलंबून असलेल्या मुलीसाठी २,००० रुपयांचा वैद्यकीय विमा

३. त्याच्यावर अवलंबून नसलेल्या मुलीसाठी ५,००० रुपयांचा वैद्यकीय विमा

४. त्याच्यावर अवलंबून नसलेल्या आई-वडिलांसाठी (जे ज्येष्ठ नागरिक आहेत) ३२,००० रुपयांचा वैद्यकीय विमा

५. स्वत: आणि पत्नीसाठी ४,००० रुपयांचा वैद्यकीय तपासणी खर्च

या करदात्याला खालीलप्रमाणे कलम ८० डी नुसार उत्पन्नातून वजावट मिळेल :

* करदात्याने स्वत:साठी, पत्नीसाठी आणि अवलंबून असलेल्या मुलीसाठी असा एकूण २२,००० रुपये (२०,००० आणि २,००० रुपये) भरलेला हप्ता वजावटीस पात्र आहे.

* करदात्यावर अवलंबून नसलेल्या मुलीसाठी भरलेल्या ५,००० रुपयांची वैद्यकीय विमा हप्त्याची वजावट मिळत नाही.

* आई-वडिलांसाठी भरलेल्या ३२,००० रुपयांच्या वैद्यकीय विमा हप्ता वजावटीस पात्र आहे. परंतु याची मर्यादा ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे ३०,००० रुपये आहे.

* स्वत: आणि पत्नीसाठी ४,००० रुपयांचा वैद्यकीय तपासणी खर्च वजावटीस पात्र आहे. स्वत:साठी, पत्नीसाठी आणि अवलंबून असलेल्या मुलीसाठी असा विम्याचा हप्ता २२,००० रुपये आणि वैद्यकीय खर्च असा एकूण २६,००० रुपये खर्च करदात्याने केला आहे. परंतु याची कमाल मर्यादा फक्त २५,००० रुपये इतकी आहे.

* करदात्याला एकूण ५५,००० रुपये इतकी वजावट मिळेल. २५,००० रुपये स्वत:, पत्नी आणि मुलीसाठी आणि ३०,००० रुपये आई-वडिलांसाठी.

खालील तक्त्यात या कलमानुसार मिळणारी वजावट थोडक्यात दर्शविली आहे :

सर्वात महत्त्वाचे असे की, रोखीने भरलेल्या वैद्यकीय विमा हप्त्याची उत्पन्नातून वजावट मिळत नाही. वैद्यकीय तपासणीसाठी केलेला खर्च रोखीने केला तरी तो खर्च वजावटीस पात्र ठरतो.

*  अपंग नातेवाइकांसाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाची वजावट : कलम ८० डीडी

कलम ८० डीडी नुसार मिळणारी वजावट ही फक्त निवासी भारतीय आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी उपलब्ध आहे. अशा करदात्यांना खालील खर्चाची वजावट या कलमानुसार मिळते :

* अवलंबून असलेल्या अपंग नातेवाइकांसाठी केलेला वैद्यकीय खर्च. या खर्चामध्ये नर्सिग, प्रशिक्षण आणि पुनर्वसन यांचा समावेश होतो.

* अपंगांच्या देखभालीसाठी असलेल्या योजनेमध्ये पैसे भरल्यास. या संदर्भात मंजूर केलेली योजना असणे गरजेचे आहे.

वैयक्तिक करदात्यांच्या बाबतीत पती/पत्नी, मुले, आई-वडील, भाऊ, बहीण जे पूर्णपणे करदात्यावर अवलंबून आहेत अशा नातेवाइकांचा समावेश होतो.

हिंदू अविभक्त कुटुंबांच्या (एचयूएफ)च्या बाबतीत कुटुंबावर अवलंबून असणारा सदस्य याचा समावेश होतो.

जर अपंगत्व ८० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर करदात्याला ७५,००० रुपये इतकी वजावट मिळते. अपंगत्व ८० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर वजावट १,२५,००० रुपये इतकी मिळते.

अपंगत्वामध्ये अंधत्व, कुष्ठरोग- बरा झालेला, बहिरेपणा, मानसिक दुर्बलता, आत्मकेंद्रीपण, सेरेब्रल पाल्सी वगैरेंचा समावेश होतो.

या कलमानुसार वजावट घेण्यासाठी करदात्याला वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ‘फॉर्म १० आयए’मध्ये प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. या प्रमाणपत्रात दर्शविलेला कालावधी संपल्यानंतर नवीन प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते.

*   स्वत:साठी आणि अपंग नातेवाइकांसाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाची वजावट : कलम ८० डीडीबी

कलम ८० डीडीबीनुसार मिळणारी वजावट ही फक्त निवासी भारतीय आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी (एचयूएफ) उपलब्ध आहे. या कलमानुसार मिळणारी वजावट ठरावीक रोगांच्या उपचारासाठी प्रत्यक्ष खर्च केल्यास मिळते.

करदात्याला स्वत:साठी किंवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या नातेवाइकांसाठी (म्हणजेच पती/पत्नी, मुले, आई-वडील, भाऊ, बहीण) केलेल्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची वजावट घेता येते.

हिंदू अविभक्त कुटुंबांच्या (एचयूएफ)च्या बाबतीत कुटुंबावर अवलंबून असणाऱ्या सदस्यांवर केलेल्या वैद्यकीय खर्चाची वजावट घेता येते.

या कलमानुसार ठरावीक रोगावर केलेल्या खर्चाची वजावट मिळते. हे ठरावीक रोग प्राप्तिकर नियम ११डीडीमध्ये नमूद करण्यात आले आहेत.

या कलमानुसार उपचारांसाठी केलेल्या प्रत्यक्ष खर्चाची वजावट मिळते. वजावटीची कमाल मर्यादा ४०,००० रुपये इतकी आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे.) उपचारांवर केलेल्या खर्चाची कमाल मर्यादा ६०,००० रुपये इतकी आहे आणि अतिज्येष्ठ नागरिकांच्या (ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे) उपचारांवर केलेल्या खर्चाची कमाल मर्यादा ८०,००० रुपये इतकी आहे.

करदात्याला विमा कंपनीकडून उपचारांच्या खर्चाची भरपाई मिळाली असेल तर ती वजावटीच्या रकमेतून वजा करून बाकी रक्कम वजावट म्हणून घेता येते.

उदा. एखाद्या करदात्याने त्याच्या भावाच्या ठरावीक रोगावरच्या उपचारांसाठी एका वर्षांत १,२५,००० रुपये वैद्यकीय खर्च केला. हा भाऊ  करदात्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. त्याला विमा कंपनीकडून २५,००० रुपये भरपाई मिळाली. करदात्याचा भाऊ  ज्येष्ठ नागरिक नसेल तर (वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल तर) त्याला १५,००० रुपये (कमाल मर्यादा ४०,००० रुपये वजा २५,०००० रुपये भरपाई) वजावट कलम ८० डीडीबी कलमानुसार मिळेल. करदात्याचा भाऊ  ज्येष्ठ नागरिक असेल तर (वय ६० वर्षांपेक्षा जास्त आणि ८० वर्षांपेक्षा कमी असेल तर) त्याला ३५,००० रुपये (कमाल मर्यादा ६०,००० रुपये वजा २५,०००० रुपये भरपाई) वजावट कलम ८० डीडीबी कलमानुसार मिळेल. या उदाहरणात विमा कंपनीकडून भरपाई जर ७०,००० रुपये मिळाली असती तर करदात्याला कलम ८० डीडीबी कलमानुसार वजावट मिळाली नसती.

*  शारीरिक अपंगत्व असणाऱ्या वैयक्तिक करदात्यांसाठी वजावट : कलम ८० यू :

वैयक्तिक निवासी करदाते जे शारीरिकदृष्टय़ा अपंग आहेत अशांना या कलमानुसार ७५,००० रुपये वजावट मिळते. या कलमानुसार वजावट घेण्यासाठी खर्च केला नाही तरी वजावट घेता येते. ८० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असेल तर १,२५,००० रुपये इतकी वजावट मिळते.

या कलमानुसार वजावट घेण्यासाठीसुद्धा करदात्याला वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ‘फॉर्म १० आयए’मध्ये प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. या प्रमाणपत्रात दर्शविलेला कालावधी संपल्यानंतर नवीन प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते.

वरील सर्व कलमांनुसार मिळणाऱ्या वजावटी खालील उत्पन्नातून घेता येत नाहीत :

१. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा,

२. अल्प मुदतीचा भांडवली नफा (ज्यावर ‘एसटीटी’ भरला आहे),

३. लॉटरी, घोडय़ांची शर्यत वगैरेंपासून मिळालेले उत्पन्न,

करदात्याला मिळणाऱ्या वजावटी एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असू शकत नाहीत.

प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

(लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत.)

First Published on December 18, 2017 1:50 am

Web Title: health insurance and income tax act