होंडा सिएल पॉवर प्रोडक्ट्स लिमिटेडची स्थापना ३२ वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर १९८५ मध्ये झाली. जपानची सुप्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनी होंडा मोटर कंपनीची ही भारतातील उपकंपनी. भारतासारख्या देशातील वीजनिर्मिती आणि सेवा पाहता घरगुती तसेच छोटय़ा उद्योगांना अखंडित वीज सेवा देणाऱ्या चांगल्या जनरेटर्सची गरज होती. आणि ही परिस्थिती ओळखून कंपनीने त्या काळात तसेच आताही आपली अनेक उत्पादने भारतीय बाजारपेठेत आणली. उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि गुणवत्तेच्या जोरावर आज भारतातील ती पहिल्या क्रमांकाची कंपनी मानली जाते. होंडा सिएल पॉवर प्रोडक्ट्सने उत्तर प्रदेशातील नोएडा येथे जागतिक दर्जाचे संपूर्ण विकसित उत्पादन केंद्र स्थापन करून अनेक उपयोगी वस्तूंची निर्मिती करते आहे. यात प्रमुख्याने पोर्टेबल जनरेटर्स, पाण्याचे पंप, सामान्य कामासाठी लागणारी इंजिन्स. लॉनमूवर्स, ब्रश कटर, पॉवर टीलर्स यांचा समावेश करता येईल. ही उत्पादने घरगुती तसेच शेती व वाणिज्य कामासाठी वापरली जातात. भारतामध्ये कंपनीची १५ क्षेत्रीय कार्यालये असून ६०० विक्रेते आहेत. ३५ देशात आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या होंडा सिएल पॉवर प्रोडक्ट्स आज भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी आहे. जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या होंडा मोटर कंपनीचा अनुभव, अत्यानुधिक तंत्रज्ञान आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी संशोधनावर दिलेला भर या सगळ्याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कामगिरीवर होत असतो. गेल्या आर्थिक वर्षांत ६८७.५० कोटी रुपयांची उलढाल करणाऱ्या आणि ५७.२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवणाऱ्या होंडा सिएल पॉवर प्रोडक्ट्सचे जून २०१७ साठी संपणाऱ्या तिमाहीचे निकाल आता लवकरच जाहीर होतील. दीर्घकालीन दृष्टीकोनातून मेक इन इंडिया, जीएसटी यांचा सकारात्मक परिणामच होतील. उत्तम आणि अनुभवी प्रवर्तक, उत्कृष्ट गुणवत्ता आणि विपणन यांचा सुरेख मेळ कंपनीने साधला आहे. त्यामुळेच कधीही विकत घ्यावेत आणि कायम राखून ठेवण्यासारखे जे काही थोडे शेअर्स आहेत त्यात होंडा सिएल पॉवर प्रोडक्ट्सचा समवेश करावाच लागेल.

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.