प्रवीण देशपांडे

’  प्रश्न : माझे वय ६८ वर्षे आहे. मला आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बँकेतील मुदत ठेवींवर १,८२,००० रुपये व्याज मिळाले. मी बँकांना फॉर्म १५ एच दिलेला असल्यामुळे यावर उद्गम कर (टीडीएस) कापलेला नाही. या शिवाय मला शेअर्सची विक्री करून ८३,००० रुपयांचा अल्पमुदतीचा भांडवली नफा झाला आहे. या व्यवहारावर ‘एसटीटी’ भरला गेला आहे. माझा प्रश्न असा की मला कर भरावा लागेल का? मला विवरणपत्राचा कोणता फॉर्म भरावा लागेल?

– सुधीर पाध्ये, डोंबिवली

उत्तर : आपण ज्येष्ठ नागरिक आहात. आपण निवासी भारतीय आहात असे गृहीत धरतो. आपल्यासाठी कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ३ लाख रुपये इतकी आहे. आपले एकूण उत्पन्न २,६५,००० रुपये इतके आहे. आपण निवासी भारतीय असल्यामुळे आपल्याला या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. आपल्या उत्पन्नात भांडवली नफ्याचा समावेश असल्यामुळे आपल्याला फॉर्म २ मध्ये विवरणपत्र भरावे लागेल.

’  प्रश्न : माझा एक तयार कपडे बनविण्याचा प्रोप्रायटरी धंदा आहे. धंद्यासाठी मी माझ्या मित्राकडून कर्जाऊ  १०,००,००० रुपये रक्कम घेतली आहे. दर सहा महिन्यानी दरसाल १० टक्के  या दराने व्याज देण्याचे ठरले आहे. या रकमेवर मला उद्गम कर (टीडीएस) कापावा लागेल का?

– एक वाचक, ई-मेलद्वारे

उत्तर : जे प्रोप्रायटरी धंदा किंवा व्यवसाय करतात त्यांना उद्गम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. याला अपवाद म्हणजे प्रोप्रायटरी व्यावसायिक किंवा हिंदू अविभाज्य कुटुंब जे धंदा किंवा व्यवसाय करतात आणि त्यांच्या धंद्याची किंवा व्यवसायाची आधीच्या वर्षांची, वार्षिक उलाढाल जर ‘कलम ४४ अब’ नुसार नमूद केलेल्या वार्षिक उलाढालीच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यांना उद्गम कराच्या तरतुदी लागू होतात. कलम ४४ अब नुसार वार्षिक उलाढालीची मर्यादा धंद्यासाठी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि व्यवसायाची उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. उदा. (१) एका वैयक्तिक करदात्याच्या धंद्याची, आर्थिक वर्ष २०१७-१८ या वर्षांसाठी, एकूण उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी उद्गम कराच्या तरतुदी लागू होतील. (२) एका व्यावसायिकाची (डॉक्टर, वकील आर्किटेक्ट, वगैरे) आर्थिक वर्ष २०१८-१९ या वर्षांसाठी एकूण उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आर्थिक वर्ष २०१९-२० साठी उद्गम कराच्या तरतुदी लागू होतील. या तरतुदीनुसार आपल्या धंद्याची वार्षिक उलाढाल वरील मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच आपल्याला उद्गम कराच्या तरतुदी लागू होतील.

’  प्रश्न : मी एक अनिवासी भारतीय आहे. माझे वय ६४ वर्षे आहे. माझे मुंबईमध्ये एक घर आहे जे भाडय़ाने दिलेले आहे. या घराचे मला दरमहा ३७,००० रुपये भाडे मिळते. मी दरमहा १२५० रुपये मालमत्ता कर भरतो. याशिवाय भारतात माझे दुसरे कोणतेही उत्पन्न नाही. मला कर भरावा लागेल का? आणि किती?

– यशवंत पाटील, ई-मेलद्वारे

उत्तर : आपले करपात्र उत्पन्न आणि देय कर खालीलप्रमाणे :

घरभाडे उत्पन्न (३७,००० रु x१२)      = ४,४४,००० रु

(वजा) मालमत्ता कर (१२५०x१२)       = १५,००० रु

बाकी रक्कम           =                           ४,२९,००० रु

(वजा) ३०% प्रमाणित वजावट

= १,२८,७०० रु

करपात्र घरभाडे उत्पन्न                         = ३,००,३०० रु.

भरावा लागणारा कर :

प्रथम २,५०,००० रुपयांवर                       ०

बाकी ५०,३०० रुपयांवर ५%             २५१५ रु

एकूण कर                                         २५१५

शैक्षणिक कर            ३%                  ७५

एकूण कर                                      २५९० रु .

आपण अनिवासी भारतीय असल्यामुळे, ज्येष्ठ नागरिक असला तरी आपल्याला कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २,५०,००० रुपये इतकीच आहे.

’  प्रश्न : मी एक पगारदार नोकर आहे. मी एका शेअरबाजारात नोंदणीकृत कंपनीचे ५०० शेअर्स शेअर बाजारामार्फत, एप्रिल २०१७ मध्ये ३५,००० रुपयांना खरेदी केले होते. हे सर्व शेअर्स मी जानेवारी २०१८ मध्ये ६५,००० रुपयांना शेअर बाजारामार्फत विकले. मला हा व्यवहार विवरणपत्रात दाखवावा लागेल का?

– प्रतिभा काळे, मुंबई

उत्तर : आपण शेअर बाजारात नोंदणीकृत कंपनीचे शेअर्स एप्रिल २०१७ मध्ये खरेदी करून जानेवारी २०१८ मध्ये विकले, म्हणजेच खरेदी केल्यापासून ९ महिन्यांमध्ये विकले. त्यामुळे ही संपत्ती अल्पमुदतीची आहे आणि त्यावर होणारा भांडवली नफा अल्प मुदतीचा आहे. या शेअर्सच्या विक्रीवर ‘एसटीटी’ भरला असल्यामुळे आपल्याला सवलतीच्या दरात म्हणजेच १५ टक्के दराने कर भरावा लागेल. हा व्यवहार करपात्र असल्यामुळे आपल्याला यावर कर भरावा लागेल आणि विवरणपत्रात देखील दाखवावा लागेल.

’  प्रश्न : मी आणि माझी पत्नी एक घर संयुक्त नावाने खरेदी करीत आहोत. दोघांचा प्रत्येकी ५० टक्के इतका हिसा आहे. या घराची खरेदी किंमत १.२५ कोटी रुपये आहे. या खरेदीवर आम्हाला एक टक्का उद्गम कर कापणे बंधनकारक आहे. हा उद्गम कर कोणी कापला पाहिजे? मी का माझ्या पत्नीने?

– शेखर शिंदे, ई-मेलद्वारे

उत्तर : उद्गम करसुद्धा आपल्याला आपापल्या हिश्शाप्रमाणे कापला पाहिजे. घरखरेदी बाबतीत प्रत्येकाचा हिस्सा ५० टक्के  इतका असल्यामुळे एकूण उद्गम कराची अर्धी रक्कम आपल्या आणि अर्धी रक्कम आपल्या पत्नीच्या नावाने कापून सरकारकडे जमा करावी लागेल. आपल्याला दोन वेगळे ‘फॉर्म २६ क्यूबी’ भरावे लागतील.

’  प्रश्न : मी एका खाजगी कंपनीचे शेअर्स सप्टेंबर २०१५ साली २,२५,००० रुपयांना खरेदी केले होते. हे शेअर्स एप्रिल २०१८ मध्ये मी ४,७५,००० रुपयांना विकले. या व्यवहारावर मला कर भरावा लागेल का? आणि जर भरावा लागेल तर किती भरावा लागेल? हा कर मला वाचविता येईल का?

– एक वाचक, ई-मेलद्वारे

उत्तर : खाजगी कंपन्यांचे शेअर्स ही अल्प मुदतीची संपत्ती आहे किंवा दीर्घ मुदतीची आहे हे ठरविण्यासाठी ३६ महिन्यांचा धारणकाळ आता कमी करून २४ महिने इतका करण्यात आला आहे. आपण हे शेअर्स खरेदी तारखेपासून २४ महिन्यांनंतर विकल्यामुळे होणारा भांडवली नफा दीर्घ मुदतीचा असेल. या व्यवहारावर दीर्घ मुदतीचा नफा हा खालीलप्रमाणे :

शेअर्सची विक्री किंमत

= ४,७५,००० रुपये

शेअर्सची खरेदी किंमत

= २,२५,००० रुपये

महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य :

२०१५-१६चा महागाई निर्देशांक     २५४

२०१८-१९चा महागाई निर्देशांक     २८०    (गृहीत)

महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य :  २,२५,००० x२८०/२५४            = २,४८,०३१रुपये

दीर्घ मुदतीचा भांडवली नफा                          = २,२६,९६९रुपये

या रकमेवर आपल्याला २०.८० टक्के (शैक्षणिक आणि आरोग्य करासहित) इतका कर भरावा लागेल. हा कर वाचविण्यासाठी भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक रोख्यांमध्ये (कलम ५४ ईसी नुसार) करण्याची सवलत (जी मागील वर्षांपर्यंत उपलब्ध होती शेअर्सच्या विक्रीतून होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी) या वर्षीपासून काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता विक्री किमतीएवढी म्हणजेच ४,७५,००० रुपये इतकी गुंतवणूक आपल्याला नवीन घरात करावी लागेल. यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल.

’  प्रश्न : सध्या माझ्या नावाने एकही घर नाही. मी सप्टेंबर २०१७ मध्ये एक सदनिका बुक केली आहे. या सदनिकेसाठी मी गृहकर्ज घेतले आहे. या घराचा ताबा मला मे २०१९ मध्ये मिळणार आहे. बँकेने दिलेल्या पर्यायानुसार मी जानेवारी २०१८ पासून कर्जाची परतफेड सुरू केली आहे. मला आता २०१७-१८ या आर्थिक वर्षांचे विवरणपत्र दाखल करावयाचे आहे. मी या आर्थिक वर्षांत परतफेड केलेल्या कर्जाची आणि व्याजाची वजावट घेऊ  शकतो का?

– विनायक देसाई, पुणे

उत्तर : ‘कलम ८० क’नुसार कर्जाच्या परतफेडीची वजावट आणि कलम २४ नुसार व्याजाची वजावट घेण्यासाठी घराचा ताबा घेणे गरजेचे असते. ज्या वर्षी घराचा ताबा घेतला त्या वर्षीपासून या दोन्ही कलमांनुसार वजावटी घेता येतात. करदात्याने घराचा ताबा घेण्यापूर्वीच्या वर्षांत जर व्याज दिले असेल तर ते व्याज ताबा घेतलेल्या वर्षांत आणि त्याच्या पुढील चार वर्षे असे पाच वर्षांत समान विभागून त्याची वजावट घेता येते. एकच राहते घर असेल तर गृहकर्जावरील व्याजाच्या वजावटीची मर्यादा २ लाख रुपये आहे. चालू वर्षांचे व्याज आणि घराचा ताबा घेण्यापूर्वी भरलेले एक पंचमांश व्याज या दोन्हीसाठी मिळून ही २ लाख रुपयांची मर्यादा आहे. ताबा घेण्यापूर्वीच्या वर्षांत केलेल्या कर्जाच्या मुद्दल परतफेडीची वजावट मात्र ताबा घेतल्यानंतरच्या वर्षांत घेता येत नाही, फक्त त्या वर्षांत केलेल्या मुद्दल परतफेडीची वजावट घेता येते.

ल्ल लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.