23 November 2017

News Flash

योग्य ‘बॅलन्स्ड फंडा’ची निवड कशी कराल?

भारतीय म्युच्युअल फंड विश्वात ४३ फंड घराण्यांच्या मिळून २५०० पेक्षा अधिक योजना अस्तित्वात आहेत.

व्यापार प्रतिनिधी | Updated: September 4, 2017 1:02 AM

गुंतवणुकीचा निकष असेल तर बॅलन्स्ड फंडाचा परतावा नेमका कसा आला हे त्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे.

बँकांच्या ठेवींवरील व्याजदर कमी झाल्याने अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडे वळणे ही गोष्ट स्वागतार्हच. परंतु केवळ नजीकच्या काळातील परताव्याच्या दराचा विचार  करून होणाऱ्या गुंतवणुकीतून इच्छित उद्दिष्ट साध्य सिद्ध होईल याची खात्री देता येणार नाही. मागील परतावा हाच गुंतवणुकीचा निकष असेल तर बॅलन्स्ड फंडाचा परतावा नेमका कसा आला हे त्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे.

’सध्या बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याज दर कमी झाल्यामुळे परंपरागत बँका किंवा पतपेढय़ा व अन्य खाजगी कंपन्या यांच्यात मुदत ठेवी करणारे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे वळलेले दिसत आहेत. बॅलन्स्ड फंडांनी मासिक लाभांश देण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक सेवानिवृत्त गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्न मिळू लागले आहे. यातून त्यांच्यामार्फत निधीचा ओघ बँकांच्या मुदत ठेवीकडून बॅलन्स्ड फंडाकडे वळल्याचे स्पष्ट दिसून येते. बॅलन्स्ड फंडाचा पर्याय सुज्ञतेने निवडला असला तरी त्यामागे अर्थसाक्षरतेपेक्षा बँकांच्या मुदत ठेवींवरचे व्याजदर कमी होणे हे मुख्य कारण आहे. कारण गुंतवणूकदारांकडू होणारी बॅलन्स्ड फंडाची निवड योग्य असेलच असे खात्रीपूर्वक म्हणता येणार नाही. कारण ही निवड करतांना गुंतवणूकदाराने स्वत:हून किंवा विक्रेत्याने सुचविलेल्या बॅलन्स्ड फंडाचा नजीकच्या काळातील परताव्याचा दर हा एकमेव निकष गृहित धरलेला असते.

भारतीय म्युच्युअल फंड विश्वात ४३ फंड घराण्यांच्या मिळून २५०० पेक्षा अधिक योजना अस्तित्वात आहेत. प्रत्येक फंड घराण्याचा निदान एक तरी बॅलन्स्ड फंड आहे. काही फंड घराण्यांचे दोन बॅलन्स्ड फंड आहेत. या व्यतिरिक्त फंड घराण्यांचे बॅलन्स्ड फंड प्रकारात मोडणारे ‘चाइल्ड प्लान’सुद्धा आहेत. सर्वाची गोळाबेरीज करता उपलब्ध बॅलन्स्ड फंडांची संख्या १००-११० दरम्यान नक्की असेल. प्रत्येक फंडाचे चार उपप्रकार (रेग्युलर ग्रोथ, रेग्युलर डिव्हिडंड, डायरेक्ट ग्रोथ, डायरेक्ट डिव्हिडंड) धरले की, एकूण उपलब्ध पर्यायांची संख्या ४०० पर्यंत पोहोचते. इतक्या पर्यायांमधून आपल्याला हवा असलेला नेमका फंड निवडणे हे सोपे काम नव्हे. कठीण असलेले हे काम काही मंडळींसाठी मात्र खूप सोपे ठरते. मागील एका वर्षांत सर्वाधिक परतावा दिलेल्या फंडाची निवड गुंतवणुकीसाठी करणे ही फंड निवडीची त्यांची सोपी पद्धत आहे.

निश्चित उत्पन्न देणाऱ्या बँकांच्या मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स्ड फंड योजना यांच्यात गुंतवणुकीतील जोखीम पूर्ण भिन्न आहे. सर्वच म्युच्युअल फंड  Past Performance Does Not Guarantee Future Returns  ही सूचना आपल्या सर्वच प्रचारात्मक साहित्यात छापत असतात. केवळ नजीकच्या काळातील परताव्याच्या दराचा विचार करून गुंतवणुकीसाठी बॅलन्स्ड फंडाचा विचार करणे म्हणजे सेबीच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे. रस्त्यावर वाहन हाकताना सुरक्षित प्रवासासाठी रस्त्याच्या शेजारी वाहकांना मार्गदर्शनासाठी इशारेवजा सूचना दिलेल्या असतात. धोक्याचे वळण किंवा अपघाती क्षेत्र यासारख्या धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे अपघाताला कारण ठरू शकते. नियामकांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास इच्छित साध्य सिद्ध होईल याची खात्री देता येणार नाही. हे टाळण्यासाठी बॅलन्स्ड फंडाचा परतावा नेमका कसा आला हे जाणून घेणे गरजेचे असते.

मुदत ठेवींना खरेच पर्याय काय?

बॅलन्स्ड फंडाच्या गुंतवणुकीत नेमक्या कशाचा समावेश असतो हे बेताची अर्थसमज असलेल्या गुंतवणूकदारांना ठाऊक नसते. पूर्वायुष्यात समभाग गुंतवणूक धोकादायक म्हणून त्याकडे पाठ केलेला बचतकर्त्यांचा वर्ग बॅलन्स्ड फंडाच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवू पाहात असला तरी या बचतकर्त्यांच्या बॅलन्स्ड फंडाच्या परताव्याच्या अपेक्षा इक्विटी फंडांच्या परताव्याइतक्या असतात. निधी व्यवस्थापक फंडाच्या माहितीपत्रकात दिलेल्या विवरणानुसार गुंतवणूक करीत असतो. ही गुंतवणूक करताना निधी व्यवस्थापकाला काही स्वातंत्र्य बहाल केलेले असते. या परताव्याच्या दराबाबतच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या स्वातंत्र्याचा उपयोग निधी व्यवस्थापक आखून दिलेल्या मर्यादेत करीत असतो. फंडाचा परतावा वाढविण्यासाठी सेबीने मान्यता दिलेल्या गोष्टींपैकी ज्या ज्या गोष्टी करणे शक्य आहे त्या त्या गोष्टींचा अवलंब निधी व्यवस्थापक करतो. यापैकी एक गोष्ट म्हणजे आखलेल्या सीमारेषेच्या आत मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांचा समावेश करणे. लार्ज कॅप, मिड व स्मॉल कॅप यांचा समतोल साधत अधिक परतावा मिळविण्याचा प्रयत्न करताना पाच-सात टक्क्यांनी वाढविलेली मिड कॅप गुंतवणूक परताव्याचा दरात पाच-सात टक्क्यांची वाढ देऊ  शकते. मिड कॅप शेअर्सचा भरणा जितका अधिक तितका परतावा अधिक. परंतु मिड कॅप केंद्रित बॅलन्स्ड फंड हे मुदत ठेवींना पर्याय होऊ  शकतात का, याचा विचार गुंतवणूकदाराने करणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडाच्या पिरॅमिडमध्ये रोखे गुंतवणूक करणारे फंड कमी परतावा आणि मुद्दलाची सुरक्षितता असलेले तर मिड कॅप फंड या पिरॅमिडमध्ये शिखराचा भाग व्यापणारे अर्थात अधिक परतावा आणि अधिक धोका असलेले आहेत. या पिरॅमिडमध्ये बॅलन्स्ड फंडांचा क्रम रोखे म्युच्युअल फंडांनंतर आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंडांच्या आधी असतो. गुंतवणुकीतील जोखीमसुद्धा याच क्रमवारीत असते. समभाग गुंतवणूक ६५ टक्क्यांहून कमी नसलेल्या बॅलन्स्ड फंडाचा समावेश लार्ज कॅप फंडाच्या आधी होतो.

जोखीम सजगतेचा निकष

समभाग गुंतवणुकीत मिड कॅपचे प्रमाण वाढविल्याने परतावा जरी अधिक मिळाला तरी फंडांच्या गुंतवणुकीतील जोखीम वाढत असते. मिड कॅप समभागांच्या वेगाने कमी-अधिक होणाऱ्या किमतींनुसार फंडाची एनएव्हीसुद्धा कमी किंवा वाढत असते. फंडांची जोखीम मोजण्यासाठी संख्या शास्त्रातील ‘प्रमाणित विचलन’ (Standard Deviation) ही संकल्पना वापरण्यात येते. एक एकक परतावा मिळविण्यासाठी निधी व्यवस्थापकाने किती जोखीम उचलली हे मोजण्यासाठी विल्यम शार्प यांनी एक सूत्र वापरले. हे सूत्र जगमान्य झाले असून या संशोधनासाठी शार्प यांना १९९०च्या नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मिड कॅप फंडाच्या पोर्टफोलिओचे ‘प्रमाणित विचलन’ हे नेहमीच लार्ज कॅप पोर्टफोलिओपेक्षा अधिक असते. पाश्चात्त्य  देशात अर्थसाक्षर गुंतवणूकदार निव्वळ परतावा न पाहता, फंडाचे वार्षिक प्रमाणित विचलन लक्षात घेतात. जितके प्रमाणित विचलन अधिक तितकी गुंतवणुकीतील जोखीम अधिक असते. एखादा अधिक परतावा असलेला परंतु प्रमाणित विचलनातील सातत्य न राखणाऱ्या फंडापेक्षा कमी परतावा असलेला आणि प्रमाणित विचलनात सातत्य राखणाऱ्या फंडास नेहमीच गुंतवणुकीस पसंती दिली जाते.

साहजिकच एखाद्या फक्त लार्ज कॅप समभागांचा समावेश असलेल्या बॅलन्स्ड फंडापेक्षा कमी मात्रेत असले तरी मिड कॅप गुंतवणुकीत असलेल्या बॅलन्स्ड फंडाचा परतावा अधिक जरी असला तरी गुंतवणुकीतील जोखीम अधिक असते. अनेक फंड घराणी परताव्याच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक राखण्यासाठी कमी अधिक प्रमाणात मिड कॅप समभागांचा समावेश बॅलन्स्ड फंडाच्या पोर्टफोलिओत करीत असतात. त्यामुळे परतावा जरी वाढला तरी या फंडाचे ‘प्रमाणित विचलन’सुद्धा अधिक असल्याने गुंतवणुकीतील जोखीम अधिक असते. जितकी जोखीम अधिक तितका परताव्याचा दरदेखील अधिक हा बाजाराचा सिद्धांत या ठिकाणीसुद्धा लागू पडतो. निव्वळ परताव्याचा दर अधिक म्हणून एखाद्या फंडाची निवड करण्यापेक्षा ‘प्रमाणित विचलन’ कमी असलेल्या फंडांची निवड करणे कमी जोखमीचे आहे. एखादा अधिक परतावा देणाऱ्या फंडापेक्षा सातत्य राखणारा व कमी प्रमाणित विचलन असलेल्या फंडाला गुंतवणुकीसाठी कधीही पसंती देणे चांगले. बॅलन्स्ड फंडाच्या गुंतवणुकीत ३५ टक्के रोखे गुंतवणूक असते. म्हणूनच बॅलन्स्ड फंड हे इक्विटी फंडांपेक्षा कमी धोकादायक असायला हवेत. या ३५ टक्के रोखे गुंतवणुकीमुळे परताव्याच्या दराबाबत अपेक्षासुद्धा कमी असायला हवी.

निष्कर्ष :

गुंतवणूकदारांची पसंती लाभलेल्या बॅलन्स्ड फंडांची कामगिरी, इक्विटी फंडांपेक्षा सरस कशी, हा विचार गुंतवणूक करण्यापूर्वी करायला हवा. बॅलन्स्ड फंडांच्या गुंतवणुकीत मिड कॅप असतील तर माझी गुंतवणूक सुरक्षित आहे का, ही शंकासुद्धा घ्यायला हवी. या शंकेचे निरसन करण्यासाठी फंडाचा पोर्टफोलिओ तपासायला हवा. बॅलन्स्ड फंडांच्या गुंतवणुकीत जर मिड कॅप आणि स्मॉल कॅप असतील तर आजवर धोकादायक म्हणून इक्विटी फंडात गुंतवणूक करणे टाळले तो सुरक्षित गुंतवणुकीचा उद्देश सफल होत नाही हे लक्षात घ्यायला हवे. अधिक परतावा हा गुंतवणुकीत मिड कॅप व स्मॉल कॅप असल्यामुळे येतो. जर खरोखर सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर लार्ज कॅप केंद्रित बॅलन्स्ड फंडांची निवड करून आपल्या फंडाकडून अपेक्षासुद्धा कमी करायला हव्यात. आपल्या अर्थ सजगतेच्या कक्षा रुंद केल्यानेच हे साध्य होईल. आपल्याला आपल्या मुद्दलाची सुरक्षितता हवी असेल तर आपली अर्थसमज वाढवायला हवी हाच आजचा अर्थ बोध..

व्यापार प्रतिनिधी arthmanas@expressindia.com

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully

First Published on September 4, 2017 1:02 am

Web Title: how to choose the right balanced mutual fund