प्राप्तिकर विवरणपत्र वेळेवर भरल्यानंतर आपली जबाबदारी संपली असे सर्वाना वाटते. प्राप्तिकर खात्याकडून, ज्यांनी विवरणपत्र भरले असेल किंवा भरले नसले तरी, काही कारणासाठी पत्र, नोटीस  किंवा विचारणा होते. असे पत्र आले की सर्वाना भीती वाटते. आपणाकडून काही चूक तर झाली नाही ना, किंवा आता आपल्याला अनेक त्रासाला सामोरे जावे लागेल किंवा दंड भरावा लागेल अशी समजूत होते. काही जणांना असा प्रश्न पडतो की, मी प्राप्तिकर कायद्याचे अनुपालन केले तरी मला पत्र किंवा नोटीस कशी आली. प्राप्तिकर खात्याकडून करदात्याला सूचना (नोटीस) आल्या तर त्या का येतात आणि त्या आल्यावर काय करावे याचा आढावा खालीलप्रमाणे:

विवरणपत्र न भरल्याविषयी नोटीस :
* अशा प्रकरणाची नोटीस उच्च मूल्याचे व्यवहार केले असतील तरी विवरणपत्र भरले नसल्यास येते. याच स्तंभातील मागील लेखात सांगितल्याप्रमाणे काही उच्च मूल्यांच्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर खात्याकडे जमा होत राहते. अशा व्यवहारामध्ये पॅन नमूद करणे बंधनकारक आहे. असे व्यवहार ज्यांनी केले आहेत त्यांचे पॅन आणि व्यवहाराच्या रकमेची माहिती वार्षकि माहिती अहवालाद्वारे (एआयआर) विविध संस्था, बँका यांच्याकडून प्राप्तिकर खात्याला प्राप्त होत असते. अशा व्यक्तींनी विवरणपत्र भरले नसेल तर त्यांना प्राप्तिकर खात्याकडून नोटीस येऊ शकते. ज्यांनी अशा उच्च मूल्यांचे व्यवहार केले आहेत त्यांनी विवरणपत्र भरले तर अशी नोटीस येणार नाही.

* विवरणपत्र भरण्याचे थांबविल्यास :
जर आपण दर वर्षी विवरणपत्र भरत असाल आणि काही कारणाने ते भरण्याचे बंद केले तर विवरणपत्र प्राप्तिकर खात्याकडून नोटीस येऊ शकते. जर करदात्याचे या वर्षी करपात्र उत्पन्न नसेल तर विवरणपत्र भरणे गरजेचे नसते. जरी करपात्र उत्पन्न नसले आणि विवरणपत्र भरले तरी चालते.

उद्गम कर कापला गेला असेल तर :
* करदात्याचा उद्गम कर कापला गेला असेल तर त्याची माहिती उद्गम कराच्या विवरणपत्राद्वारे प्राप्तिकर खात्याकडे जाते. अशा व्यक्तींनी विवरणपत्र भरले नसेल तर त्यांना प्राप्तिकर खात्याकडून नोटीस येऊ शकते. अनेकांची अशी समजूत होते की माझा कर कापला गेला आहे तर मला विवरणपत्र भरण्याची गरज नाही. विशेषत: पगारदारांच्या वेतनातून संपूर्ण कर उद्गम कराद्वारे कापला जातो त्यांनासुद्धा विवरणपत्र भरावे लागते.
उत्तर देणे बंधनकारक :
प्राप्तिकर खात्याकडून विवरणपत्र न भरल्याबद्दल नोटीस आली तर त्याला उत्तर देणे बंधनकारक आहे. अशी सूचना पत्राद्वारे, किंवा मेलने सुद्धा पाठवली जाते. अशा वेळेस घाबरून न जाता याला उत्तर तयार करणे गरजेचे असते. ज्या वर्षांसाठी ही नोटीस आली आहे त्या वर्षी आपले उत्पन्न किती आणि कोणत्या प्रकारचे आहे याचा तपशील तयार करावा. जर करपात्र उत्पन्न नसेल तर तसे प्राप्तिकर अधिकाऱ्याला (ज्या अधिकाऱ्याकडून पत्र आले आहे) कळवावे. जर करपात्र उत्पन्न असेल तर अशी नोटीस आल्यावर सुद्धा विवरणपत्र भरता येते (जर मुदतीत असेल तर!) विवरणपत्र भरण्याची मुदत कर निर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्षांपर्यंत असते. म्हणजेच आíथक वर्ष २०१३-१४ (कर निर्धारण वर्ष २०१४-१५) साठीचे विवरणपत्र ३१ मार्च २०१६ पूर्वी भरता येते. वरील मुदतीत नोटीस मिळाली असेल तर विवरण पत्र भरून त्याची प्रत उत्तराबरोबर जोडून प्राप्तिकर खात्याकडे जमा करता येते. जर का ही मुदत संपली असेल तर विवरणपत्र दाखल करता येत नाही. अशा वेळी उत्पन्नाचा तपशील आणि भरलेला कर या विषयीची माहिती उत्तरासोबत जोडावी. जर कर देय असेल तर तो व्याजासकट भरून त्याचा तपशील प्राप्तिकर अधिकाऱ्याला कळवावा.
आता अशा सूचना ईमेलद्वारे मिळू लागल्या आहेत. आणि त्याचे उत्तर हेही ऑनलाइन दाखल करावे लागते. ऑनलाइन उत्तरासाठी आपला पॅन वापरून प्राप्तिकर विभागाच्या वेबस्थळावर लॉग इन करावे. वेबस्थळावरील उडटढछकअठउए या खिडकीमध्ये उत्तराचे पर्याय दिलेले आहेत. जो पर्याय योग्य आहे तो निवडावा.

विवरणपत्रात व्यवहार न दर्शविल्यास :
* विवरणपत्रात एखादे उत्पन्न दाखविले नसले तर त्या विषयी प्राप्तिकर खात्याकडून नोटीस येऊ शकते. उदा. आपल्याला बँकेकडून व्याज मिळाले आणि बँकेने त्यावर उद्गम कर कापला असेल आणि हे व्याज आपण उत्पन्नात दाखविले नसेल तर किंवा जर आपण घर विकले आणि तो व्यवहार विवरणपत्रात दर्शविला नसल्यास आपल्याला तशी नोटीस येऊ शकते. उद्गम कर, ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री व्यवहाराची माहिती, इत्यादी प्राप्तिकर खात्याकडे उपलब्ध असते. अशी नोटीस मिळाल्यास सुधारीत विवरणपत्र (वर दर्शविलेल्या मुदतीत) दाखल करता येते आणि तसे उत्तरात नमूद करावे. जर सुधारीत विवरण पत्र भरण्याची मुदत संपली असेल तर अशा वेळी उत्पन्नाचा तपशील आणि भरलेला कर या विषयीची माहिती उत्तरासोबत जोडावी.

कलम १४३ (१) प्रमाणे नोटीस:
* विवरणपत्र भरल्यानंतर कलम १४३ (१) प्रमाणे नोटीस प्राप्तिकर खात्याकडून येऊ शकते. जर आपण विवरणपत्र संगणकाद्वारे ऑनलाइन दाखल केले असेल तर आपल्याला बंगळूरू कार्यालयाकडून ईमेल आणि टपालाने अशी दोन्ही प्रकाराने नोटीस प्राप्त होते. यामध्ये आपण विवरणपत्रात भरलेल्या रकमा आणि प्राप्तिकर खात्याने तपासलेल्या रकमेचा तपशीलवार तुलनात्मक तक्ता मिळतो. यामध्ये जर काहीच फरक नसेल तर आपल्याला काहीच करावयाची गरज नाही. परंतु जर कोणत्या रकमेमध्ये फरक असेल आणि कर देय रक्कम किंवा परतावा यात फरक असेल तर त्याचे उत्तर देणे गरजेचे आहे. असा फरक हा अनेक कारणाने येऊ शकतो. जसे उद्गम कर, भरलेला स्व-निर्धारण कर, उत्पन्न किंवा कर गणना करताना झालेली चूक. जर ईमेलने अशी नोटीस आली असेल तर त्याचे उत्तर सुद्धा ऑनलाइन द्यावे लागते. जर प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून अशी नोटीस आली असेल तर त्या अधिकाऱ्याला पत्र लिहून सोबत फरकाचे पुरावे जोडून त्याची दुरुस्ती करून घ्यावी. आपण दिलेलं उत्तर प्राप्तिकर खात्याने स्वीकारले किंवा स्वीकारले नाही तरी आपल्याला तसे पत्र येते.

कलम १४३ (२) प्रमाणे नोटीस:
* भरलेल्या विवरणपत्राची छाननी करण्याच्या हेतूने या कलमाप्रमाणे नोटीस येऊ शकते. यासाठी प्राप्तिकर खात्याने काही निकष ठरविले आहेत. यानुसार विवरणपत्र छाननीसाठी निवडले जातात. काही विवरणपत्र संगणकाद्वारे निवडले जातात. अशी नोटीस आल्यास प्राप्तिकर अधिकाऱ्यासमोर प्रत्यक्ष किंवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे हजर राहून माहिती व पुरावे सदर करावे लागते. यासाठी कर सल्लागारची मदत घेणे उचित ठरते. जर या सूचनेला उत्तर दिले नाही तर दंडाची तरतूद आहे.

कलम २४५ प्रमाणे कर परताव्याची देय कराबरोबर जुळणी:
* आपण विवरणपत्र दाखल करतो त्यामध्ये कर परतावा (रिफंड) असेल तर आपण कधी हा परतावा मिळतो याची वाट बघत बसतो. परंतु काही दिवसांनी कलम २४५ प्रमाणे नोटीस आल्यास आपला भ्रमनिरास होतो. आपला काही वर्षांपूर्वीचा देय कर या वर्षीच्या करपरताव्यातून वजा केल्यामुळे करपरतावा कमी किंवा मिळणार नाही अशी नोटीस आपल्याला मिळते. प्राप्तिकर खात्याला आपल्या करपरताव्यातून मागील देय कर वजा करण्याचा अधिकार आहे.
अशी नोटीस आल्यास आपल्या नोंदीप्रमाणे मागील वर्षांचा कर देय नाही याची खातरजमा करून घ्यावी. प्राप्तिकर खात्याकडील देय रकमा कोणत्या वर्षीच्या आहेत आणि त्याचे कारण काय आहे हे तपासून बघितले पाहिजे. आणि त्यानुसार त्या वर्षीच्या कराची दुरुस्ती प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून करून घ्यावी. वर सांगितल्याप्रमाणे कलम १४३(१) च्या सूचनेला उत्तर दिले नाही किंवा आपले उत्तर प्राप्तिकर खात्याने स्वीकारले नाही तर अशी देय रक्कम प्राप्तिकर खात्याच्या नोंदीप्रमाणे बाकी राहू शकते आणि आपल्याला कलम २४५ प्रमाणे नोटीस येऊ शकते.

कलम १३९ (९) प्रमाणे सदोष विवरण पत्र:
* विवरणपत्र भरण्यामध्ये काही त्रुटी असल्यास प्राप्तिकर खात्याकडून कलम १३९(९) प्रमाणे नोटीस मिळू शकते. अशी नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसाच्या आत चुकीची दुरुस्ती करावी लागते. ही दुरुस्ती १५ दिवसांच्या आत केली नाही तर आपण विवरणपत्र दाखल केलेच नाही असे समजले जाते. स्वनिर्धारण कर न भरताच विवरण पत्र दाखल केले तरी या कलमाप्रमाणे नोटीस येऊ शकते. विवरणपत्र जर संगणकाद्वारे भरले असेल तर सुधारित विवरणपत्र सुद्धा संगणकाद्वारेच भरावे लागते. अन्यथा जर विवरणपत्र संगणकाद्वारे भरले नसेल तर सुधारित विवरणपत्र प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे दाखल करावे.
यापासून एकच गोष्ट महत्वाची वाटते की आपल्याकडील बँकेतील रकमेच्या, उत्पन्नाच्या, गुंतवणुकीच्या, उद्गम कराच्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या तर प्राप्तिकर खात्याकडून येणाऱ्या सूचना-नोटीसांना घाबरण्याचे काहीच कारण नाही.
pravin3966@rediffmail.com