राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधल्या वेताळाने प्रश्न विचारण्याआधी राजाने वेताळाला’ प्रश्न विचारला. ‘मागील तीन आठवडे होतास कु ठे? अनेक वाचकांनी तुझी खबरबात विचारून मला भंडावून सोडले होते.
‘मे महिन्यात कोकणाशिवाय आणखी कु ठे जाणार? मे महिन्यात कोकणातील हवा जरी गरम असली तरी आंब्या-फणसाची, जांभळे-करवंदाची चव चाखायला कोकणात गेलो आणि नंतर ‘नमों’च्या द्विवर्षपूर्तीच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो, वेताळाने उत्तर दिले.
‘पण राजा मला एक प्रश्न पडला आहे, ‘नमों’च्या सत्ता सोपान चढल्याच्या दुसऱ्या वर्धापनदिनी बाजाराच्या निर्देशांकाला भरते का आले? तुझे प्रामाणिक मत सांगितले नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’ वेताळाने सांगितले.
नमोंच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी मॉर्गन स्टॅन्ले या इन्व्हेस्टमेंट बँकेने आपल्या ‘मॉर्गन स्टॅन्ले कम्पोझिट इंडेक्स’ (एमएससीआय) या निर्देशांकात उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला अधिक पसंती दिली व ऑस्ट्रेलियाची पत कमी केली. अनेक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार ‘एमएससीआय’ने प्रमाणित केल्यानुसार गुंतवणुका करतात. साहजिकच भारताला अधिक पसंती दिल्याने भारतात गुंतवणुकीचा ओघ वाढेल. भारताला अधिक पसंती देण्यामागच्या कारणांचा विचार केल्यास बाजारात इथून मोठी तेजी संभवते. २०१६ सुरू झाल्यापासून अन्य उभरत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय भांडवली बाजाराची कामगिरी सुमार नसली तरी कमजोर राहिलेली आहे. उभरत्या बाजारात गुंतवल्या जाणाऱ्या १०० डॉलर्सपैकी केवळ ५.४% डॉलर्स भारतात गुंतविले जातात. अर्थव्यवस्थांच्या आढाव्यानंतर केलेल्या बदलानुसार उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये गुंतविल्या जाणाऱ्या १०० डॉलर्सपैकी ७.९ डॉलर्स भारतात गुंतविण्याचा सल्ला मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या ग्राहकांना दिला आहे.
यामागची कारणे मॉर्गन स्टॅन्लेने दिली आहेत ती याप्रमाणे आहेत. पहिले कारण अर्थपरिमाणे अर्थव्यवस्थेच्या वाढीला पोषक आहेत. या आर्थिक वर्षांत रिझव्‍‌र्ह बँकेकडून अर्धा टक्क्य़ाची कपात अपेक्षित आहे. डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बहुप्रतीक्षित वस्तू व सेवा विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणे अपेक्षित आहे. व चौथे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन वर्षे रुसलेला वरुणराज या वर्षी सरासरीपेक्षा अधिक बरसणार आहे.. मॉर्गन स्टॅन्लेच्या या विश्लेषणामुळे बाजाराची अवस्था ‘क्षितिजी आले भरते गं’ अशीच झाली आहे.
गुंतवणुकीत भारताला झुकते माप देण्याच्या या निर्णयाला आणखी एक किनार आहे. मॉर्गन स्टॅन्लेने मे महिन्याच्या सुरुवातीला एक टिपण आपल्या ग्राहकांना पाठविले होते. या टिपणात भारतीय कंपन्यांच्या नफ्यात चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीपासून वाढ दिसणे अपेक्षित असल्याचे म्हटले होते. अनेक कंपन्यांनी अनावश्यक मालमत्ता विकू न आपले कर्ज कमी केले व त्याच्या जोडीला कमी झालेले व्याजाचे दर व ग्राहकांकडून वाढती मागणी या सर्वाचा सकारात्मक परिणाम नफ्यावर होईल अशी अपेक्षा या टिपणांत व्यक्त करण्यात आली होती.
एचएसबीसी या दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट बँकेने भारताची संभावना ‘सेल’ बदलून ‘होल्ड’ अशी केली आहे. २०१६च्या सुरुवातीला भारतीय कंपन्यांच्या किमतीशी उत्सर्जन (पी/ई) १७.९ असल्याने या कंपन्यांची संभावना ‘एक्स्पेन्सिव्ह’ अर्थात महाग अशी केली होती. ‘एचएसबीसी’लासुद्धा भारतीय कंपन्यांच्या नफ्यात अपेक्षित वाढ दिसू लागल्याने त्यांनादेखील भारतीय कंपन्या सद्य:स्थितीत महाग वाटत नसल्याने या कंपन्यांतील गुंतवणूक न विकण्याचा सल्ला दिला आहे. एचएसबीसीला सिमेंट, पोलाद, ऊर्जानिर्मिती उपकरणे यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून, व्यापारी वाहन निर्माते टाटा मोटर्स व अशोक लेलँड यांना विशेष पसंती देतानाच, आयशर मोटर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. मागील पाच वर्षांत भारतात गुंतवणूक करण्यासाठी नफ्यात वाढ होण्याची शक्यता व आकर्षक मूल्यांकन यांचा समतोल साधला गेला असल्याचे एचएसबीसीला वाटते.
बाजार चालायला आकर्षक मूल्यांकनाच्या जोडीला पुरेशी रोकड सुलभता असणे गरजेचे असणे आवश्यक असते. रिझव्‍‌र्ह बँकेने मागील पत धोरणात केलेल्या बदलांमुळे व दीड लाख कोटींची रोकड सुलभता वाढविण्याचा निर्णय घेतल्याने वाढीव रोकड सुलभता बाजार वर नेण्यास हातभार लावेल, अशी अपेक्षा एचएसबीसीने व्यक्त केली आहे. आशिया खंडातील कोरिया, चीन, मलेशिया व सिंगापूर भांडवली बाजारांच्या तुलनेत भारतीय बाजारावर एचएसबीसीने गुंतवणुकीसाठी पसंतीची मोहोर उमटवली आहे. बाजार निर्देशांकांनी उसळी मारण्याची ही कारणे असून बाजार वर जाण्याचा व नमोंच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचा सुतराम संबंध नाही, असे राजाने स्पष्टीकरण दिले.
अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
पुंगीवाला gajrachipungi @gmail.com

‘विकास अधिकाऱ्यांचे नेहमीच सहकार्य’
* ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’च्या २३ मे २०१६ च्या अंकात गाजराची पुंगी सदरात एलआयसी म्युच्युअल फंडाच्या नवीन स्वरूपाची दखल घेतल्याबद्दल आभार. मी मुंबईत वरिष्ठ विपणन व्यवस्थापक (विभाग -३) व एलआयसीच्या गोवा विभागप्रमुख म्हणून काम करताना मला एलआयसीच्या विकास अधिकाऱ्यांचे नेहमीच सहकार्य लाभले. आजवरच्या माझ्या एलआयसीमधील ३२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत माझ्या विभागातील विकास अधिकाऱ्यांच्या सहकार्याचा मोठा वाटा आहे. एलआयसी अथवा एलआयसीच्या सहयोगी कंपन्यांतून काम करताना भविष्यातदेखील एलआयसीचे विकास अधिकारी मला असेच सहकार्य करतील असा माझा विश्वास आहे.
मला वेगवेगळ्या सदरांतून व बातम्यांतून स्थान देऊन ‘लोकसत्ता’ने माझ्या यशाचा आनंद द्विगुणित केला आहे व यापुढेदेखील मला ‘लोकसत्ता’ असेच सहकार्य करेल अशी खात्री वाटते. माझ्या छायाचित्रासहित हे स्फुट प्रसिद्ध झाल्यामुळे त्यात मांडलेली मते माझी आहेत असा कोणाचा गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून हा खुलासा करीत आहे.
सरोज दिखले – मुख्य कार्यकारी अधिकारी, एलआयसी म्युच्युअल फंड