मुंबईतला पाऊस जितका बेभरवशाचा तितकाच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सदेखील बेभरवशाचा आहे. तेजी-मंदीच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या सेन्सेक्सचा वेध घेऊन आपल्या गुंतवणुकीचे गणित मांडण्यासाठी आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या संकेतस्थळाला नित्यनेमाने भेट देणे गरजेचे आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या संकेतस्थळावर रोज संध्याकाळी साधारण ६ वाजण्याच्या सुमारास निर्देशांकाचा ‘पी/ई’ किती आहे व त्यादिवशीची ‘पी/ई’ पातळी नवीन गुंतवणूक करण्यास कितपत सुरक्षित आहे याचे मार्गदर्शन करणारी सुधारित पट्टिका प्रदर्शित होते. ही पट्टिका तीन रंगांत असून हे तीन रंग दिशादर्शन यंत्रणेशी (सिग्नल) सुसंगत आहेत. ज्या वेळी ‘पी/ई’ हिरव्या रंगात असेल तो दिवस नवीन गुंतवणूक करण्यास सर्वात सुरक्षित व जेव्हा ‘पी/ई’ लाल रंगात असेल तेव्हा गुंतवणूक केल्यास किमान ५ ते ७ वर्षे थांबण्याची तयारी ठेऊन गुंतवणूक करणे योग्य ठरते. गुंतवणूकदारांची मानसिकता मोठी मजेशीर असते. जेव्हा निर्देशांकाचे मूल्यांकन सर्वात आकर्षित करणारे म्हणजे दोन-तीन वर्षांच्या तळाला असते तेव्हा गुंतवणूकदार मुळीच गुंतवणूक करीत नाहीत व जेव्हा सर्वात धोकादायक पातळीवर म्हणजेच ५२ आठवडय़ांच्या शिखरावर असते तेव्हा सर्वच म्युच्युअल फंडांत सर्वाधिक गुंतवणूक होत असते. म्युच्युअल फंडांना ८०% निधी जेव्हा ‘पी/ई’ लाल रंगात असतो तेव्हा मिळतो.
म्युच्युअल फंडांबाबत व विशेषत: ‘सिप’बद्दल गुंतवणूकदारांत सजगता निर्माण झाल्यामुळे ‘सिप’ सुरू असलेल्या खात्यांच्या संख्येने एप्रिल २०१६ अखेर ४ कोटी ८० लाखांचा टप्पा पार केला. देशात अस्तित्वात असलेल्या ४३ फंड घराण्यांत एप्रिल महिन्यात तब्बल ४.०९ लाख नवीन ‘सिप’ खाती उघडली गेली. या नवीन खात्यांपैकी १.६ लाख खाती समभाग गुंतवणूक असणाऱ्या म्युच्युअल फंडांची किंवा समभागकेंद्रित बॅलेन्स्ड फंडाची आहेत. एप्रिल महिन्यात ४,४३८ कोटींची गुंतवणूक समभाग गुंतवणूक असलेल्या म्युच्युअल फंडात केली गेली. एप्रिल महिन्यात सेन्सेक्सची वाढ १.०४% असल्याने म्युच्युअल फंडांतून नवीन ‘सिप’ खाती उघडली गेली व ही रक्कम मिळाली.
बाजाराची सध्याची पातळी नवीन गुंतवणूक करण्यास कितपत सुरक्षित आहे हा मोठा प्रश्न आहे. २० मे २०१६ रोजी निर्देशांकाचा ‘पी/ई’ (निर्देशांकाचे उत्सर्जनाशी गुणोत्तर) २१.२३ होते. मागील एका वर्षांचा विचार केल्यास सर्वाधिक ‘पी/ई’ २२ जुलै २०१५ रोजी २३.९६ तर सर्वात कमी ‘पी/ई’ ११ फेब्रुवारी २०१६ रोजी १८.६५ होता. बँक निफ्टीचा विचार केल्यास १२ फेब्रुवारी रोजी बँक निफ्टीचा पी/ई १४.५२ होता. ही पातळी बँकांच्या समभागात गुंतवणूक करण्यासाठी सर्वात सुरक्षित होती. हा विचार करून २२ फेब्रुवारी रोजी एलआयसी म्युच्युअल फंडाच्या बँकिंग अँड फिनान्शियल सव्‍‌र्हिसेस फंडाची शिफारस या स्तंभातून केली होती. १ मार्चपासून १५ मे पर्यंतच्या कालावधीत या फंडाने २२% परतावा दिला आहे.
म्युच्युअल फंडाच्या एकूण समभाग मालमत्तेपैकी ७०% मालमत्ता ही लार्ज कॅप प्रकारच्या फंडाची असून गुंतवणूकदारसुद्धा आपल्या गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती लार्ज कॅप प्रकारच्या फंडांना देतात; परंतु साधारणपणे आयडीएफसी म्युच्युअल फंड घराण्याचे नाव येताच आठवण होते ती या फंड घराण्याच्या मिड कॅप फंडाची व तो फंड म्हणजे – ‘आयडीएफसी प्रीमियर इक्विटी’ येत्या सप्टेंबर महिन्यात ११ वर्षांची वाटचाल पूर्ण करेल. या ११ वर्षांत या फंडाने २०.११%चा परतावा आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे. थोडक्यात २८ सप्टेंबर २००५ रोजी गुंतविलेल्या १०,००० चे २० मे २०१६ च्या ग्रोथ एनएव्ही नुसार ६८१५८.२० इतके झाले आहेत. म्हणूनच केवळ एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक स्वीकारणारा हा जगातील एकमेव फंड आहे. याच फंड घराण्याच्या लार्ज कॅप समभागात गुंतवणूक करणाऱ्या आयडीएफसी क्लासिक इक्विटी फंड या फंडाची शिफारस आज करीत आहे.
लार्ज कॅप फंडांचा मागील तीन वर्षांचा सरासरी परतावा ११.४% असून मल्टी कॅप प्रकारच्या फंडाचा तीन वर्षांचा परतावा १६.२२% आहे. आयडीएफसी क्लासिक इक्विटी हा फंड लार्ज कॅप केंद्रित मल्टी कॅप फंड आहे. या फंडाची कमान देशातील एक अव्वल समभाग फंड व्यवस्थापक समजले जाणारे अनुप भास्कर यांनी हाती घेतल्याने पुढील काही वर्षांत हा फंड अन्य स्पर्धक फंडांपेक्षा अव्वल परतावा देणे अपेक्षित आहे. ५ फेब्रुवारी २०१६पासून अनुप भास्कर यांची नेमणूक आयडीएफसी या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) म्हणून झाली असून ते आयडीएफसी क्लासिक इक्विटी फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत. अनुप भास्कर यांना २२ वर्षांचा गुंतवणूक व्यवस्थापनाचा अनुभव आहे. सुंदरम सीलेक्ट मिड कॅप, यूटीआय मिड कॅप असे आज नावारूपाला आलेल्या अनेक फंडांचे ते फंड व्यवस्थापक राहिले आहेत. यूटीआय म्युच्युअल फंडात असताना ते ३५ हजार कोटींच्या समभाग गुंतवणुकांचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. काही काळ यूटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पहिले आहे. असा अनुभवसंपन्न निधी व्यवस्थापक या फंडाला नव्याने लाभला असल्याने या फंडाची भविष्यातील वाटचाल निधी व्यवस्थापनाच्या लौकिकाला साजेशी असेल याबाबत शंका नाही.
३० एप्रिल २०१६ च्या फंडाच्या गुंतवणूक तपशिलानुसार फंडाने बँका (१७.६%), माहिती तंत्रज्ञान (१४.१%), औषध निर्माण (९.६%), वाहन उद्योग (९.४%) व ग्राहकोपयोगी वस्तू (६.९%) या उद्योग क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे. इन्फोसिस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स आणि मारुती या कंपन्यांचे समभाग फंडाने आघाडीच्या गुंतवणुकीसाठी निवडले आहेत. नवीन निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीस अनुकूल मूल्यांकन असलेल्या व भविष्यात भांडवली वृद्धीची शक्यता असणाऱ्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणे हे या फंडाने धोरण ठरविले आहे. या धोरणात बसणाऱ्या कंपन्या हुडकून त्यात गुंतवणूक करणे यात अनुप भास्कर माहीर समजले जातात. या धोरणाच्या आधारे गुंतवणूक केलेल्या कंपन्यानी सुंदरम सिलेक्ट मिड कॅप व यूटीआय मिड कॅप या फंडाच्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. हाच प्रयोग आता लार्ज कॅप गटात होणार असल्याने भविष्यात अव्वल परतावा देणारा हा फंड पहिल्या पाच फंडात स्थान मिळवू शकेल. जी कंपनी व्यवसायातून होणाऱ्या नफ्याच्या किमान ३०% रक्कम पुन्हा व्यवसायात गुंतविते अशाच कंपनीत हा फंड गुंतवणूक करतो. यासाठी कंपनीची नफा क्षमता, कंपनीच्या एकूण भांडवलापैकी कर्जाचे प्रमाण (Financial Leverage) व परिचालित नफा (Operating Efficiency) हे निकष ठरविले आहेत. हा फंड या निकषात बसणाऱ्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करतो. अनेक ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक विक्रेत्यांचा नफा व्हावा यासाठी छापील किमतीवर सूट देतात. किंवा पैसे देण्याची मुदत वाढवितात. ही सूट देत असल्याने निव्वळ नफा परिचालित नफ्याच्या ३०% हून कमी होतो किंवा पैसे देण्याच्या कालावधीत वाढ केल्यास कंपनीला वाढीव खेळत्या भांडवलाची गरज भासते. म्हणून या कंपन्या व्यवसायातून पुरेशी रोकड निर्माण करू शकत नाहीत. अशा कंपन्यांतून साहजिकच हा फंड निधी गुंतवत नाही. म्हणून फंडाच्या गुंतवणुकीत तकलादू ताळेबंद असलेल्या कंपन्यांचा समावेश नाही. नवीन व्यवस्थापकांनी फंडाच्या गुंतवणुकीत मर्यादित बदल केले असून टप्प्याटप्प्याने अधिक बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. या बदलांचा परिणाम दिसू लागला असून मागील तीन महिन्यांचा परतावा ९.८५% इतका आहे. फंडाला नवीन व्यवस्थापक लाभल्यावर योग्य ते बदल करण्यात एक वर्ष सहज जाते. या बदलाचे परिणाम दिसायला त्यानंतर तीन वर्षे तरी लागतात. म्हणून किमान पाच वर्षे गुंतवणूक ठेवण्याच्या उद्देशाने या फंडात गुंतवणूक केल्यास १३-१५% दराने वार्षिक परतावा मिळणे शक्य आहे.
वसंत माधव कुलकर्णी
shreeyachebaba
@gmail.com