* प्रश्न : माझी पत्नी ऑक्टोबर २०१५ पासून परदेशात नोकरी करीत आहे. तिने आर्थिक वर्ष २०१६-१७ सालचे विवरणपत्र दाखल केलेले नाही. आम्हाला असे सांगण्यात आले की भारतात उत्पन्न नसेल तर विवरणपत्र भरण्याची गरज नाही. हे बरोबर आहे का?

– सदानंद गवळी, ई-मेलद्वारे 

उत्तर : प्राप्तिकर कायद्यानुसार करदात्याचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा (म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपये, अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपये आणि इतरांसाठी २,५०,००० रुपये) जास्त असेल तर विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. कलम ८० अन्वये पात्र वजावटीपूर्वीचे उत्पन्न गणण्यात येते. आपली पत्नी अनिवासी भारतीय असेल तर त्यांना इतर अटींची (भारताबाहेरील संपत्ती वगैरे) पूर्तता करावी लागणार नाही. त्यामुळे भारतात उत्पन्न नसेल तर विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक नाही.

* प्रश्न : माझा मुलगा एका कंपनीत जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत काम करीत होता. या कालावधीतील भविष्य निर्वाह निधीची पूर्ण रक्कम आम्ही ३ मार्च २०१८ रोजी काढून घेतली. आर्थिक वर्ष २०१७-१८ या कालावधीचे विवरणपत्र भरताना मुलाने भरलेल्या त्याच्या हिश्शाची रकमेची कलम ८० सी नुसार तो वजावट घेऊ शकतो काय?

– अरुण शेटय़े, ई-मेलद्वारे 

उत्तर : आपला भविष्य निर्वाह निधी कोणता आहे यावर निधीत जमा केलेल्या रकमेवर वजावट मिळू शकते किंवा नाही हे ठरते. मान्यताप्राप्त आणि वैधानिक भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेल्या रकमेची कलम ८० सीनुसार वजावट मिळते. मान्यताप्राप्त नसलेल्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेल्या रकमेची वजावट कलम ८० सीनुसार मिळत नाही. तसेच निवृत्तीनंतर वैधानिक भविष्य निर्वाह निधीतून मिळालेली रक्कम करमुक्त आहे. निवृत्तीनंतर मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधीतून मिळालेली रक्कम करमुक्त आहे. परंतु यासाठी कर्मचाऱ्याने पाच वर्षे नोकरी केली असली पाहिजे. आपल्या मुलाने पाच वर्षे नोकरी न केल्यामुळे त्यांना मिळालेली रक्कम करपात्र आहे. मालकाने निधीमध्ये भरलेली रक्कम आणि त्यावरील व्याज हे पगारातील उत्पन्नात करपात्र आहे. कर्मचाऱ्याने निधीमध्ये भरलेल्या रकमेवर मिळालेले व्याज हे ‘इतर उत्पन्न’ या सदरात गणले जाते. कलम ८० सीची वजावट घेतली असल्यास वजावटीची रक्कमसुद्धा उत्पन्नात गणली जाते.

* प्रश्न : माझ्या वडिलांनी नांदेड येथे १९९५ मध्ये ३ लाख रुपयांना एक घर खरेदी केले होते आणि ते २०१८ मध्ये २४ लाख रुपयांना विकले. या व्यवहारावर आम्हाला कर भरावा लागेल का? कर न भरण्यासाठी काय करावे लागेल?

– महेश जानोलकर, नांदेड

उत्तर : आपल्या वडिलांनी १९९५ मध्ये घर खरेदी केले होते. हे घर आपण २०१८ मध्ये विकले, त्यामुळे त्यांना झालेला भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा आहे. त्यामुळे त्यांना महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येईल. मागील वर्षांच्या अर्थसंकल्पातील सुधारणेनुसार महागाई निर्देशांकासाठी आधार वर्ष (बेस इयर) १९८१ बदलून २००१ असे करण्यात आले. त्यामुळे १ एप्रिल २००१ पूर्वी खरेदी केलेल्या संपत्तीसाठी १ एप्रिल २००१ रोजीचे ‘वाजवी बाजारभाव मूल्य’ विचारात घेऊन आणि २०१७-१८ च्या महागाई निर्देशांकानुसार खरेदी किंमत गणावी लागेल. उदा. १९९५ मध्ये खरेदी केलेल्या घराचे १ एप्रिल २००१ रोजीचे ‘वाजवी बाजारभाव मूल्य’ समजा ५ लाख रुपये आहे. आधार वर्षांचा म्हणजे आर्थिक वर्ष २००१-०२ सालचा महागाई निर्देशांक १०० आहे आणि आर्थिक वर्ष २०१७-१८ चा निर्देशांक २७२ असा आहे. यानुसार आपली खरेदी किंमत खालीलप्रमाणे :

खरेदी किंमत = ५,००,००० (भागिले) १०० (गुणिले) २७२  = १३,६०,०००

या गणनेनुसार आपल्या घराची खरेदी किंमत १३,६०,००० रुपये इतकी आहे. आणि विक्री किंमत २४ लाख रुपये असेल तर आपल्याला १०,४०,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला आहे. या नफ्यावर आपल्या वडिलांना २० टक्के इतका कर भरावा लागेल. हा कर वाचवायचा असेल तर भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन घरात गुंतवावी लागेल किंवा ५४ ईसी नुसार बाँडमध्ये गुंतवली तर कर भरावा लागणार नाही. बाँडमध्ये गुंतवणूक, घर विक्री केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत करावी लागेल. ३१ मार्च २०१८ पूर्वी बाँड खरेदी केल्यास बाँडचा कालावधी तीन वर्षे असेल आणि १ एप्रिल २०१८ नंतर खरेदी केल्यास कालावधी ५ वर्षे असेल.

* प्रश्न : मी आर्थिक वर्ष २०१०-११ मध्ये १० लाख रुपयांना एक घर खरेदी केले हे घर या वर्षी (२०१७-१८) मध्ये ३० लाख रुपयांना विकले. या विक्रीनंतर मी लगेच नवीन घर ५० लाख रुपयांना खरेदी करणार आहे. या व्यवहारात मला कर भरावा लागेल का?

– शिवाजी ताजणे, ई-मेलद्वारे

उत्तर : कलम ५४ नुसार एक घर विकून दुसरे घर खरेदी केल्यास भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. भांडवली नफ्यावर संपूर्ण वजावट हवी असल्यास भांडवली नफ्याएवढे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे घर ठरावीक वेळेत घेतल्यास आपल्याला कर भरावा लागणार नाही. आपली नवीन घरातील गुंतवणूक भांडवली नफ्यापेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला भांडवली नफ्यातून पूर्ण वजावट मिळेल. हे नवीन घर आपल्याला दोन वर्षांच्या आत (बांधले तर तीन वर्षांच्या आत) घ्यावे लागेल. हे घर आपण ३१ जुलै २०१८ पूर्वी (या वर्षांसाठीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी) घेऊ  न शकल्यास आपल्याला ही रक्कम कॅपिटल गेन स्कीम, १९८८ या खात्यात जमा करावी लागेल.

* प्रश्न : माझे वय ६१ वर्षे आहे. मला निवृत्तिवेतन मिळते त्यातून उद्गम कर (टीडीएस) कापला जातो. माझ्याकडे दोन घरे आहेत, ती भाडय़ाने दिलेली आहेत. मला त्यावर कर भरावा लागेल का?

– केशव गोविंद कुलकर्णी, ई-मेलद्वारे

उत्तर : आपल्याकडे एकापेक्षा जास्त घरे असतील तर, घर भाडय़ाने दिले नसले तरी त्यावर ‘अनुमानित उत्पन्न’ दाखवावे लागते. आपण घरे भाडय़ाने दिली आहेत व मिळणारे उत्पन्न हे करपात्र आहे. यासाठी नगरपालिकेने ठरविलेले मूल्य, त्या भागातील वाजवी मूल्य आणि भाडे नियंत्रण कायद्यांतर्गत आदर्श भाडे विचारात घ्यावे लागते. या मूल्यांपेक्षा आपल्याला प्रत्यक्ष मिळालेले घरभाडे जास्त असेल तर, प्रत्यक्ष मिळालेले घरभाडे करपात्र आहे. या घरभाडय़ातून मालमत्ता कराची वजावट मिळते आणि बाकी रकमेवर ३० टक्के इतकी प्रमाणित वजावटसुद्धा मिळते. या प्रमाणित वजावटीनंतर उरलेली रक्कम आपल्या इतर उत्पन्नात जोडून आपल्या उत्पन्नाच्या स्लॅबप्रमाणे त्यावर कर भरावा लागेल.

pravin3966@rediffmail.com

(लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत.)